Friday, 11 September 2020
अनेक रोगांवर इलाज म्हणजे 'ड्रॅगन फ्रुट'
'ड्रॅगन फ्रुट' या फळामध्ये ‘प्रोटिन’चे प्रमाण अधिक असते, त्यामुळे अनेक आजारांपासून आपली सुटका होते. पांढऱ्या पेशी कमी झाल्यास डॉक्टर हे फळ खाण्याचा सल्ला देतात. या फळाच्या सेवनाने शरीरातील ‘कोलेस्ट्रॉल’ नियंत्रित ठेवण्यास आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याबरोबरच पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते. मूळ मेक्सिको देशातील ड्रॅगन फ्रूट या फळ पिकाची लागवड पूर्व आशिया खंड, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशिया देशात केली जाते. कंबोडीया, तवान, मलेशिया, फिलिपाईन्स, इंडोनेशिया याचबरोबर उत्तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण चीन, सायप्रस याठिकाणीही याची लागवड होते. आता भारतातही याची लागवड वेगाने वाढते आहे. याशिवाय 'ड्रॅगन फ्रूट’ हे थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल व श्रीलंका या देशात लोकप्रिय आहे. ‘ड्रॅगन फ्रूट’ ही निवडुंग प्रकारातील वेल आहे. वरून लाल रंग व आतील गर पांढरा तसेच वरून लाल रंग व आतील गर लाल तसेच वरून पिवळा रंग व आतील रंग पांढरा अशा तीन प्रकारात हे फळ येते. हे फळ पित्तनाशक असल्याने आशियाई देशात याला ‘पिताया’ या नावानेही संबोधले जाते. या फळामध्ये ‘व्हिटॅमिन सी’चे प्रमाण अधिक आहे. कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि ‘व्हिटॅमिन बी’ याचे प्रमाण या फळात मोठय़ा प्रमाणावर आहे. सौंदर्यप्रसाधनातही या फळाचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. फेसमास्क, केसमास्क यात याचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. हे फळ आंबट असले तरी यामुळे संधीवाताच्या वेदना कमी होतात. दात व हाडे मजबूत होतात. कर्करोगाला अटकाव करणारेही हे फळ आहे.अनेक रोगांवर रामबाण उपाय म्हणून या फळाचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढतो आहे. बाजारपेठेत या फळाची हमखास मागणी लक्षात घेता या फळाची शेतीही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या फळपिकाला फार पाणी लागत नसल्याने दुष्काळी भागात याची लागवड वाढत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment