Monday, 16 November 2020

मध्य हिमालयीन प्रदेशातील 25 पिके लुप्त


 कुमाऊं क्षेत्रात बलिया बेसिनच्या हवामान बदलावर करण्यात आलेल्या  संशोधनानुसार पारंपारिक शेती, अन्न सुरक्षा आणि लोकांच्या आरोग्यावर महत्त्वपूर्ण परिणाम दिसून आला आहे.  सरासरी तापमानात एक डिग्री सेल्सिअसपर्यंत फरक दिसून आला असून पावसाच्या प्रमाणातही चार मिलिमीटरपर्यंत वाढ झाल्याचं आढळून आलं आहे.  पिकाच्या 25 प्रजाती नामशेष झाल्या आहेत.  काही पिके वेळेआधीच तयार होत आहेत.  साहजिकच त्याचा परिणाम उत्पादनावरही होत आहे.  याव्यतिरिक्त, पारिस्थितिकी तंत्र (इकोसिस्टम) मध्ये वेगवान बदल नोंदविण्यात आला आहे.  या संशोधनात सरकारकडून जमीन वापराच्या धोरणासह  विविध विषयांवर ठोस उपाययोजना तयार करण्याची मागणी होत आहे.

 या संशोधन कार्यासाठी, केंद्र सरकारच्या भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद, विद्यापीठ अनुदान आयोग संशोधन प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प यांनी आर्थिक आणि अन्य मदत केली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आशिया पॅसिफिक नेटवर्क, आंतरराष्ट्रीय जल व्यवस्थापन संस्था यांसारख्या संस्थादेखील यात सहभागी झाल्या आहेत.  संशोधक मोहनसिंग संमाल आणि त्यांचे संशोधन संचालक डॉ. भगवती जोशी यांनी मानवीय शेती, अन्न सुरक्षा आणि मानवी आरोग्यावर होणार्‍या हवामान बदलाच्या परिणामाचा अभ्यास करण्यात आला. अशा प्रकाराचे हे पहिले संशोधन आहे, ज्यासाठी मध्य हिमालयीन प्रदेशात पसरलेल्या बलिया बेसिनच्या सुमारे 82 चौरस किलोमीटर क्षेत्राची निवड केली गेली होती.

भौगोलिकदृष्ट्या हा प्रदेश अत्यंत संवेदनशील भौगोलिक भाग (मध्यम आणि शिवालिक हिमालय) आहे. संशोधनानुसार पांढरा मका, कुळथी डाळ, भट्ट, चनौसी, सकमत, नागरेकोटी, लाल भात, अंजना, के -22, ज्वार, बाजरी, मंडुआ, कौशी, जेथी, तारुन, कुउला, कचनार, गुळार, करुआ, कुकुराचा, बिच्छू गवत किगुडा यासारखी पिके या प्रदेशातून लुप्त झाली आहेत.

एवढेच नव्हे तर तिथल्या राहणीमानानुसार  लवकर तयार होणाऱ्या  पिकांकडे लोक आकर्षित झाले आहेत. अशा पिकांमुळे केवळ महिलांच्या आरोग्यावरच विपरित परिणाम होत नाही तर एका वर्षात अनेक पिके घेतल्यामुळे इथल्या मातीचेही आरोग्य बिघडत चालले आहे. पूर्वी सहा महिन्यांचे पीक घेतल्यानंतर शेतं रिकामी ठेवली जायची, परंतु आता दर दोन ते तीन महिन्यात मका, भाज्या इत्यादी पिकं घेतली जात आहेत.  पारंपारिक शेतीऐवजी हायटेक शेती केली जात असल्याने पिकांवर विविध रोग पडत आहेत. यासाठी संशोधनात भू-उपयोग नियोजन धोरण तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.

 संशोधन अहवाल काय सांगतो-

 या संशोधन अहवालात मध्य हिमालयीन भू-भागाच्या अभ्यास क्षेत्रातील सरासरी तापमानात जवळपास एक डिग्री सेल्सिअसची घट नोंदली गेली आहे.  पावसाच्या प्रमाणातही चार मिमीने वाढ झाली आहे आणि पावसाळ्याच्या दिवसांच्या संख्येत सरासरी 46 टक्के घट झाली आहे. सतत होणारा पाऊस आता चार ते सहा दिवस अगोदरच थांबत आहे. डॉ.भगवती जोशी यांच्या म्हणण्यानुसार हे संशोधन करायला पाच वर्षे चार महिने लागले. 14 ऑक्टोबर 2014 रोजी या संशोधनाचे काम सुरू झाले होते आणि  ते 9 जानेवारी 2020 रोजी पूर्ण झाले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment