'एअर इंडिया'च्या पहिल्या महिला पायलट हरप्रीत एडी सिंह यांनी 32 वर्षांपूर्वी या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी महिलांना मार्ग मोकळा करून दिला. त्या आता गव्हर्नमेंट एव्हिएशन सर्व्हिसच्या प्रादेशिक सहाय्यक अलायन्स एअरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्या आहेत.हरप्रीत सिंग यांची 1988 मध्ये 'एअर इंडिया'मध्ये महिला पायलट म्हणून नियुक्ती झाली होती. आरोग्याच्या कारणामुळे त्यांना विमानाचे उड्डाण करता आले नसले तरी उड्डाण सुरक्षेच्या दिशेने त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्या भारतीय महिला पायलट असोसिएशनच्या अध्यक्षही होत्या. एयरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष आणि मुख्यालयात परिषद सदस्य म्हणून त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदवला आहे.
'आयजीआरयूए'कडून 'कॉर्मिशयल पायलट'चा परवाना मिळविण्याबरोबरच त्या एक पात्र प्रशिक्षिकाही आहेत. विमान आणि उड्डाण सुरक्षेशी संबंधित असलेल्या विविध लोकांना तांत्रिक प्रशिक्षण देण्याचं काम करतात. त्या भारतातल्या उड्डाण सुरक्षिततेच्या पहिल्या महिला प्रमुख आहेत. याव्यतिरिक्त, त्या सेवेच्या मानवीय पैलू आणि सहयोगी विभागाच्या प्रशिक्षणासाठी विविध अभ्यासक्रम आयोजित करतात, ज्यामध्ये एअरलाइन्स आणि कॉर्पोरेट संस्थांचे लोक देखील सहभाग घेतात.एक महिला म्हणून 'पहिली' हा शब्द त्यांच्या नावाशी अनेक गोष्टींमध्ये जोडला गेला आहे. त्या 'एअरलाइन्स'मधील गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या पहिल्या महिला प्रमुख आणि 'आयओएसए', 'आयएसएजीओ' आणि 'एलओएसए' साठी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता आणि सुरक्षा मानदंडांच्या पहिल्या मुख्य लेखा परीक्षक आणि मूल्यांकनकर्ता आहेत. त्यांनी सिक्युरिटी मॅनेजमेंट अँड रिस्क मॅनेजमेन्ट मध्ये डिप्लोमा केला आहे. 'एअरलाइन्स'मधील आपत्कालीन प्रतिक्रिया विभागाच्याही त्या पहिल्या महिला प्रमुख म्हणूनही होत्या. त्यांनी 'एअरलाइन्स' सेवेमध्ये मानवीय प्रतिसादासाठी 'एंजल्स ऑफ एअर इंडिया' ला आकार दिला आणि पर्यावरण व्यवस्थापन आणि हरित उपक्रम प्रमुख म्हणूनही काम केले. हरप्रीत यांच्याकडे या सर्व उपलब्ध्या आहेत, ज्यामुळे नागरी विमान वाहतुकीच्या 110 वर्षांच्या इतिहासातील भारतीय एअरलाईन्सच्या सीईओ पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. खुल्या अवकाशात उड्डाण करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी त्या प्रेरणा आहेत. इथे एक गोष्ट जाणून घेणे मनोरंजक ठरेल, ते म्हणजे एअर इंडियामध्ये महिला वैमानिकांची संख्या सर्व भारतीय एअरलाईन्सपेक्षा सरासरीने अधिक आहे. एवढेच नव्हे तर जगभरात महिला वैमानिकांच्या संख्येत सरकारी विमानसेवा खूप पुढे आहे. महिला वैमानिकांची संख्या जगात सरासरी दोन ते तीन टक्के आहे, परंतु भारतात हेच प्रमाण सरासरी दहा टक्के इतके आहे. इतकेच नव्हे तर गेल्यावर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एअर इंडियाच्या 12 आंतरराष्ट्रीय आणि 40 देशांतर्गत उड्डानांचे महिलांनी संचालन केले. यात चालक म्हणून फक्त महिलाच होत्या.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment