भारतासह जगभर पसरलेल्या कोरोना संसर्गाच्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी लस निर्मितीच्या कामात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट गुंतली आहे. ऑक्सफर्डच्या माध्यमातून सिरमकडून विकसित केली जाणारी ही लस लवकरच उपलब्ध होणार असून पहिल्यांदा भारताला प्राधान्य दिले जाणार आहे. मग अन्य देशात ही लस पोहचणार आहे. त्यामुळे सध्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक डॉ.सायरस पूनावाला यांचेही नाव चर्चेत आहे. त्यांना 'किंग ऑफ व्हॅक्सीन' या नावाने ओळखले जाते. देशातील जनतेसाठी अत्यावश्यक तसेच परवडणारी औषधे बनवण्याचा उद्देश उराशी बाळगून 1966 साली डॉ.सायरस पूनावाला यांनी सिरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली.या काळात परदेशातून भारतात मोठया प्रमाणात औषधे आयात केली जात. त्यामुळे या औषधांच्या किंमती जास्त असत. सर्वसामान्य लोकांना ती परवडत नसत. मात्र सायरस यांनी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सर्वसामान्यांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून देत आज संस्थेने मानाचे स्थान मिळवले आहे. संस्थेने रेबीज, गोवर, गालगुंड, रूबेला, डांग्या खोकला, टिटॅनस, घटसर्प, क्षयरोग, रोटा व्हायरस आणि हिपॅटायटिस-बी जीवरक्षक प्रतिबंधक लसींचे अब्जावधी डोस उत्पादन करून अनेक देशांना वितरित केले आहे.
संशोधक वृत्ती नसानसांत भिनलेले डॉ.पूनावाला हे अत्यंत कडक शिस्तीचे मानले जातात. त्यांचा स्वभाव अत्यंत रोखठोक असा आहे. वेळोवेळी त्यांच्यातील सडेतोडपणा व स्पष्टवक्तेपणा अनेकांनी अनुभवला आहे. प्रचंड कष्ट करण्याची क्षमता व कामाप्रती निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या बळावरच त्यांनी संस्थेला आंतरराष्ट्रीय लौकिक प्राप्त करून दिला आहे. डॉ.सायरस आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे दोघेही एकेकाळचे बीएमसीसीचे आणि वर्गमित्र आहेत. या जोडगोळीने आपापल्या क्षेत्रात उतुंग यश मिळवले आहे. त्यांची मैत्री आजही टिकून आहे. अलीकडेच फॉर्ब्सच्या यादीत डॉ. पूनावाला यांना टॉप टेनमध्ये समावेश झाला आहे. भारतातील श्रीमंतांच्या या यादीत मुकेश अंबानी यांचे पाहिले स्थान कायम आहे. तर सिरमचे। सर्वेसर्वा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायरस पूनावाला यांनी सहावे स्थान प्राप्त केले आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ झाली असून पूनावाला यांनी सहावे स्थान प्राप्त केले आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ झाली असून पूनावाला यांची संपत्ती 11.5 बिलियन डॉलर एवढी आहे. त्यांचे पुत्र आदर पूनावाला यांच्याकडे सध्या सिरम या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी आहे. डॉ. सायरस यांना मागील वर्षी 'आयसीएमआर' जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. पुण्यातील मांजरी येथे विस्तीर्ण जागेत पसरलेली सिरम ही संस्था अत्याधुनिक तंत्रज्ञानायुक्त आहे. येथून जगभरातील 170 देशांत औषधांचा पुरवठा केला जातो. जगभरातील 65 टक्के बालकांनी एकदा तरी सिरमच्या औषधांचा डोस घेतला असेल, असे अभिमानाने सांगितले जाते. सायरस यांचा पूर्वी घोड्यांचा व्यवसाय होता. त्यातूनच ते पुढे औषध निर्मितीकडे वळले. मुंबईत ते 750 कोटींच्या घरात राहतात. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment