Tuesday, 3 November 2020

गाणारे गाढव


एका गावात एक गाढव राहत होते. त्याचा मालक दुष्ट होता. त्याच्याकडून काम करून घ्यायचा, पण त्याला खायला पुरेसे देत नव्हता. गाढवाची उपासमार होत असे. मग ते मालकाचा डोळा चुकवून गावाभोवतीच्या रानात जाऊन मिळेल ते खाई. असेच एकदा रानात गेल्यावर त्याची एका लांडग्याशी मैत्री झाली. दोघांनी मिळून काकडीच्या मळ्यात जाऊन भरपूर काकड्या खाल्ल्या. दोघांनाही काकड्या आवडल्या. हा दिनक्रम काही दिवस चालू राहिला. गाढव गुबगुबीत दिसू लागले होते. ते खूप आनंदात होते. रात्री लांडग्याबरोबर काकड्या खाताना गाढव म्हणाले, मला आज गावेसे वाटते आहे. मी छान गाणं म्हणतो. लांडगा घाबरला,

तो म्हणाला, असं करू नकोस, तू गाणं म्हटलस तर मळ्याचा मालक जागा होईल आणि आपल्याला मारेल; पण गाढव ऐकायला तयार नव्हते. लांडग्याने त्याला तुझा आवाज चांगला नाही, भलते धाडस करू नकोस, असे परोपरीने विनवले, पण गाढव काही ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी निरूपायाने लांडगा म्हणाला, तुला गायचे तर गा, पण मी पलीकडे जाऊन थांबतो, मग गा. असे म्हणून लांडगा मळ्यातून बाहेर पडला. गाढवाने गायला म्हणजे ओरडायला सुरुवात केली. व्हायचे तेच झाले. मळ्याचा मालक जागा झाला आणि त्याने गाढवाला बदडून काढले.

तात्पर्य : कोणतेही कृत्य करताना परिणामांचा विचार करावा.

●●●●●●●

वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात! वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा!

●●●●●●●

पुण्यात नाटकाचा पहिला प्रयोग संपतो...

लेखक : कसे वाटले नाटक? नाटकात काही बदल आवश्यक आहेत का?

पुणेकर : नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते,

त्याऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा.

लेखक : का?

पुणेकर : म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.


No comments:

Post a Comment