Tuesday, 3 November 2020
न्यूझीलंडच्या पहिल्या भारतीय वंशाच्या मंत्री: प्रियांका राधाकृष्णन
न्यूझीलंडमध्ये जॅसिंडा अर्डर्न या पुन्हा पंतप्रधान झाल्या आहेत.त्यांनी नुकतेच आपले मंत्रिमंडळ स्थापन केले असून यात 50 टक्के महिलांना संधी दिली आहे. भारतीयांसाठी गौरवाची गोष्ट म्हणजे या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या महिलेला स्थान मिळाले असून प्रियांका राधाकृष्णन या न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री ठरल्या आहेत.धोरणात्मकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचे ठरणारे सामाजिक वैविध्य, विकास व जनकल्याण खाते सांभाळण्याची जबाबदारी प्रियंका राधाकृष्णन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या खात्यांसह काहीसे जिकिरीचे, रोजगार खातंही त्यांच्याकडे असणार आहे. प्रियांका केवळ भारतीय वंशाच्या नव्हेत तर त्यांना जन्म चेन्नईमध्ये झाला आहे. आईवडील दोघेही भारतीयच. चेन्नईहून हे कुटुंब सिंगापूरला गेले आणि तिथे शालेय शिक्षण पूर्ण करून प्रियंका वेलिंग्टनमध्ये समाजकार्य पदवी अभ्यासक्रमासाठी न्यूझीलंडला आल्या, तेव्हापासून इथल्याच झाल्या.आर्डर्न ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात, त्या ‘लेबर पार्टी’शी प्रियंका राधाकृष्णन गेली सुमारे आठ वर्षे जोडल्या गेल्या आहेत. समाजकार्याचे शिक्षण घेत असतानाच त्या न्यूझीलंडमधील भारतीय व अन्य स्थलांतरितांच्या संपर्कात आल्या, त्यांचे प्रश्न जाणून घेताना स्थलांतरित कामगार वा नोकरवर्गाच्या समस्या तसेच कौटुंबिक हिंसाचार यांवर लक्ष केंद्रित करण्याचे प्रियंका यांनी ठरवले. ऑकलंड शहरात त्या पूर्णवेळ कामही करू लागल्या. मात्र समाजातील प्रश्न केवळ व्यक्तींमुळे निर्माण झालेले नसतात, तर धोरणांचे पाठबळ त्यांना नसते म्हणूनही वाढलेले असतात, तेव्हा धोरणे बदलण्यासाठी प्रसंगी संघर्ष केला पाहिजे, हे चेन्नईत कामगार चळवळीत असलेल्या आजोबांचे संस्कार आठवून प्रियांकाही त्या वेळी सत्ताधारी नसलेल्या लेबर पार्टीत सहभागी झाल्या. या पक्षात उमेदवार ठरवण्यासाठी ‘गुणवत्ता यादी’ तयार केली जाते. त्या यादीत २०१४ मध्ये प्रियंका २३ व्या, तर त्यानंतरच्या निवडणुकीत (२०१७) बाराव्या आल्या होत्या! या त्रैवार्षिक निवडणुकांची उमेदवारी २०१७ मध्ये त्यांना मिळाली. त्या हरल्या, पण त्यांना पक्षाच्या कोट्यातून खासदारकी देण्यात आली. यंदाच्या निवडणुकीतही अवघ्या ६०८ मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र न्यूझीलंडच्या पक्षनियुक्त खासदार पद्धतीमुळे त्यांना पुन्हा कायदेमंडळात स्थान मिळालं आणि मंत्रिपदाची कठीण परीक्षा देण्यास आता त्या सिद्ध झाल्या आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment