Tuesday, 24 November 2020

रोहिणी भाजीभाकरे: विश्वविक्रमी उपक्रम


कुठल्याही कामात लोकसहभाग महत्त्वाचा असतो. त्यामुळे लोकांना त्याचे मोल कळते आणि त्यांच्या सहभागातून काम तडीस नेले जाते. असाच प्रयत्न प्रशासकीय स्तरावरून एखाद्या उपक्रमाचा मोठ्या कार्यक्रमातून जनजागृती केल्यास नागरिकांच्या मनावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. हे लक्षात घेऊन महाराष्ट्राची कन्या असलेल्या आणि तामिळनाडू राज्यातल्या सेलमच्या तत्कालीन जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिद्री यांनी लोकसहभागातून जागतिक हात धुवा दिन साजरा केला. आणि त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली. 2018 साली हा उपक्रम राबविला होता. त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. यातून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व चांगल्यारितीने समजले होते. 

जनतेची स्वच्छतेविषयी जाणीव समृद्ध होऊन सुदृढ, निरोगी व आरोग्यदायी, आनंदी जीवनासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने जागतिक स्तरावर 15 ऑक्‍टोबर रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून तामिळनाडू राज्यातील सेलमच्या तत्कालीन जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्राच्या कन्या रोहिणी भाजीभाकरे-बिद्री यांनी 2018 साली एका मैदानावर एकाच वेळी 4 हजार 24 नागरिकांना एकत्र करत, अनुभवी प्रशिक्षणार्थीकडून याबाबत मार्गदर्शन करत नागरिकांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करून घेतली होती. याची नोंद जागतिक गिनीज बुकामध्ये करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छतेच्या विविध कार्यक्रमापैकी वैयक्तिक स्वच्छता हात धुणे हा एक कार्यक्रम आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम 15 ऑक्‍टोंबर रोजी सर्वत्र राबविला जातो. प्रशासकीय स्तरावर या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाते. परंतु इतर नागरिकांकडून या उपक्रमात पाहिजे, तसा प्रतिसाद मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन सेलमच्या तत्कालीन जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिद्री यांनी प्रशासकीय स्तरावर या उपक्रमाचे दोन टप्प्यात आयोजन करून, एका मैदानावर एकाच वेळी 4 हजार 24 नागरिकांना एकत्र करीत अनुभवी प्रशिक्षणार्थी लोकांकडून हात धुण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले होते. बरेच आजार हे हात व्यवस्थित न धुतल्याने कसे कमी होतात व आरोग्याच्या दृष्टीने हात धुणे किती महत्वाचे आहे, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली होती. त्यामुळे एकाच वेळी एकाच मैदानावर चार हजारांपेक्षा अधिक लोकांनी व त्याचवेळी संपूर्ण सेलम जिल्ह्यात बारा लाख लोकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला होता. यामध्ये गृहिणी, विद्यार्थी, वयस्कर व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सर्वांचाच समावेश होता. त्यांच्या या कार्याची दखल जागतिक गिनीज बुकने घेतली आहे. विशेष म्हणजे ही महाराष्ट्रासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे.सध्या कोरोना या महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. यावर उपाय म्हणून शासनाकडून नागरिकांना हात धुण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. परंतु रोहिणी भाजीभाकरे यांनी 2018 साली नागरिकांमध्ये हात-धुण्याबाबत प्रशासकीय स्तरावर मोठा कार्यक्रम घेऊन जनजागृती केली होती. यातून त्यांची भविष्याबाबतची दूरदृष्टी दिसून येते. रोहिणी भाजीभाकरे या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्‍यातील उपळाई बुद्रुक येथील रहिवासी आहेत. त्यांचे हे प्रशासकीय स्तरावरील कार्य नक्कीच  अभिमानास्पद व कौतुकास्पद असेच आहे. 

 

No comments:

Post a Comment