जम्मू-काश्मीरचे रहिवासी असलेले डॉ. शकील अहमद हे भारताच्या 313 वैज्ञानिकांपैकी एक आहेत, ज्यांची स्टॅनफोर्ड विद्यापीठाने अव्वल वैज्ञानिक म्हणून निवड केली आहे. प्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगभरातील पहिल्या दोन टक्के शास्त्रज्ञांची यादी जाहीर केली असून, या यादीत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने भारतीयांच्या नावांचा समावेश आहे. या शास्त्रज्ञांमध्ये डॉ. शकील यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. खरं तर देशाच्या अतिदुर्गम भागातल्या स्थानिकांना शिकवण्यासाठी शकील अहमद यांनी बर्याच मोठ्या ऑफर नाकारल्या. ते पुंछ जिल्ह्यातील मेंढर येथील शासकीय पदवी महाविद्यालयात रसायनशास्त्र शिकवतात. ते त्यांच्या कुटुंबातील पहिल्या पिढीतील सुशिक्षित व्यक्ती आहेत. अहमद यांना पहिल्यापासूनच समाजासाठी काहीतरी करण्याची सुप्त भावना होती. त्यांना शिक्षणासाठी करावा लागलेला संघर्ष माहित होता. वडिलांचे निधन झाले तेव्हा ते केवळ एक वर्षाचे होते. मुळातच हुशार असलेले अहमद यांनी केवळ शिष्यवृत्तीच्या जोरावर आपले शिक्षण पूर्ण केले. मर्यादित साधनं असलेल्या राजौरीमध्ये ते लहानाचे मोठे झाले.
सन 2017 मध्ये अहमद यांनी दिल्ली येथील 'आयआयटी'मध्ये शिक्षण घेतले.याच दरम्यान त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात अध्यापन करण्याची ऑफर आली. त्यांना आपल्या भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात विज्ञान शिकण्यास प्रोत्साहित करायचे होते. पुढे अहमद यांच्या प्रयत्नांचे परिणामही दिसून आले. तीन वर्षांपूर्वी तेथे मोजकेच विद्यार्थी होते, जे रसायनशास्त्रातील तज्ञ होते. आज त्यांच्याकडे केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांची मोठी तुकडी आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात 50 टक्के मुली आहेत. कॉलेज व्यतिरिक्तचा बहुतेक वेळ ते रिसर्चमध्ये घालवतात. सध्या ते पॉलिमर्स विकसित करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या संशोधन कार्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळांची गरज आहे,मात्र तेवढा खर्च पेलवणारा नाही.त्यामुळे त्यांना त्यासाठी दिल्लीला जावं लागतं. तसेच अधिकृत सुटी असली की ते जामिया मिल्लिया इस्लामियाला जातात.
प्रयोगशाळा बनवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च येतो. इतका निधी नाही. जामियातून पीएचडी आणि आयआयटी दिल्लीच्या संशोधनामुळे त्यांना दोन्ही संस्थांच्या प्रयोगशाळांमध्ये काम करण्याची परवानगी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये अहमद यांची तीसहून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाली आहेत. विज्ञान क्षेत्रात त्यांचं नाव प्रस्थापित झालं आहे. ते अमेरिकेच्या केमिकल सोसायटी आणि रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे सदस्य आहेत. पॉलिमर, नॅनो मटेरियल आणि ग्रीन मटेरियल या क्षेत्रात त्यांनी पंधरा पुस्तके लिहिली आहेत. अहमद यांच्या व्यतिरिक्त जम्मू-काश्मीरमधील आणखी दोघा डॉक्टरांनाही त्यांच्या संशोधनासाठी जगातील आघाडीच्या वैज्ञानिकांमध्ये स्थान मिळाले आहे. शेर-ए-काश्मीर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे माजी संचालक डॉ. एम.एस. खुरू आणि इंटरनल-पल्मोनरी मेडिसिन विभागाचे डॉ. परवेझ ए कौल यांचाही स्टॅनफोर्डच्या यादीत समावेश आहे. डॉ. एम.एस. खुरु 'हेपेटायटीस-ई' मधील संशोधनासाठी जगभरात ओळखले जातात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment