एकादा छंद माणसाच्या आयुष्याला कलाटणी देऊन जातो. त्यामुळे माणसानं कोणता तरी एक छंद जोपासायला हवा. नाशिकच्या 17 वर्षाच्या ओम महाजनला सायकलिंगचा छंद होता आणि आज त्यातूनच त्याने एक विश्वविक्रम केला आहे. त्याने काश्मीर ते कन्याकुमारी अंतर 8 दिवस, 7 तास, 38 मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. काश्मीरमधील श्रीनगरच्या जगप्रसिद्ध लाल चौकातून ओमने 13 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी राइडला सुरुवात केली. ओमने 3 हजार 900 किलोमीटर अंतर 8 दिवस 7 तास 38 मिनिटांत पूर्ण केले. ओम नेहमी सायकलिंगमध्येच असायचा, पण एक प्रकारे ते स्प्रिंटींग प्रमाणे असायचे. त्याने नेहमीच सायकलिंगचे स्वप्न पाहिले आणि लॉकडाऊन सुरू झाल्यावर रेस एक्रॉस अमेरिकामध्ये सहभागी होण्याचे ध्येय ठरवले. नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार होती,पण 600 किलोमीटरच्या पात्रता फेरीत सहभागी होण्यात अडचण निर्माण झाली.त्यामुळे त्याने रेस एक्रॉस इंडियाला प्राधान्य दिले.
मुलांनी शाळा व कॉलेजसाठी सायकलचा वापर करावा ‘बी कूल.... पेडल टू स्कूल’ हे स्लोगन घेऊन ही राइड ओमने केली.शिवाय नाशिक सायकलिस्टचे दिवंगत अध्यक्ष जसपाल सिंग यांना ती समर्पित केली आहे. श्रीनगर - दिल्ली - झांशी ते नागपूर, हैदराबाद - बंगळुरू - मदुराई ते कन्याकुमारी असा त्याचा मार्ग होता. ओमने त्याचे वडील डॉ. हितेंद्र आणि काका डॉ. महेंद्र महाजन यांचे मार्गदर्शन व प्रेरणा घेऊन ही गरुडझेप घेतली. श्रीनगरपासून त्याने सुरुवात केली आणि मध्यप्रदेशमधील संततधार पावसातून मार्ग काढत दक्षिणेच्या दिशेने वळला. तेथून तो आपल्या इच्छित स्थळी पोहचला. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रीनगर ते कन्याकुमारी सर्वात वेगवान सायकल प्रवासाचा विक्रम यापूर्वी ओमच्या काकांच्याच नावे होता. पुढे तो विक्रम भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू यांनी मोडला. पन्नू यांनी 8 दिवस 9 तासांत हे अंतर पार केले. गिनीज बुकमध्ये त्याची नोंद होणे बाकी होते.त्यापूर्वीच नाशिकचेच रॅम विजेते सायकलपटू डॉ. हितेंद्र महाजन यांचा चिरंजीव असलेल्या या ओमने नवा विक्रम नोंदवला. त्यामुळे रेकॉर्ड पुन्हा नाशिकच्याच नावे झाला आहे. ओमचे वडील हितेंद्र आणि काका महेंद्र यांनी एकत्रित संघ तयार करून 2015 मध्ये रेस एक्रॉस अमेरिका स्पर्धा जिंकली होती. त्यांच्या खात्यावर सर्वात जलद गोल्डन क्वॉर्डीलेटरलचा विक्रमही नोंद आहे. कोविड-19च्या संकटामुळे कंसास (अमेरिका) येथे लवकर जाता आले नाही. या ठिकाणी ओमने क्रीडा व्यवस्थापनाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. अजून अभ्यासक्रम सुरू झाला नाही,तोपर्यंत त्याने सरावासाठी वेळ सत्कारणी लावला.ओमचे पुढील लक्ष्य रेस एक्रॉस अमेरिकाचे आहे.ही स्पर्धा जगातील सर्वात कठीण मानली जाते. यात यश संपादन करण्यासाठी12 दिवसांत 4 हजार 800 किलोमीटर सायकलिंग करावे लागते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment