Friday, 13 November 2020

लोणार सरोवर: आंतरराष्ट्रीय पाणथळ


उल्कापातामुळे निर्माण झालेल्या आणि जैवविविधतेने समृद्ध असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराची आंतरराष्ट्रीय ओळख आता आणखी भक्कम झाली आहे.कारण या खाऱ्या पाण्याच्या सरोवराला 'आंतरराष्ट्रीय पाणथळ' हा दर्जा मिळाला आहे. 'रामसर' मध्ये भारतातील एकूण 41 पाणथळ जागांचा समावेश झाला आहे. आता लोणार सरोवराची यात वर्णी लागली आहे. जगभरातील पाणथळ जागांचे संरक्षण करण्याबाबत उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी इराणमधील रामसर येथे पर्यावरण आणि निसर्ग तज्ज्ञाची परिषद 2 फेब्रुवारी1971 रोजी झाली होती. पाणथळ जागांचे संरक्षण, संवर्धन आणि विकास करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने जागतिक सहकार्य घेऊन कृती करणे हा उद्देश परिषदेत ठरवण्यात आला होता. हे प्रसिद्ध लोणार सरोवर साधारणपणे 50 ते 55 हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. अंदाजे 60 मीटर लांब आणि काही कोटी टन  वजनाच्या लघुग्रहाने आपल्या पृथ्वीवर जोरदार टक्कर दिली. या टकरीत 60 ते 70 लाख टन वजनाच्या अणुबाँब स्फोटाएवढी ऊर्जा निर्माण झाली. याचा परिणाम म्हणजे 1.83 किलोमीटर व्यासाचे आणि जवळपास 150 मीटर खोलीचे आघाती विवर (खोल खड्डा) तयार झाले.  लोणार सरोवर म्हणजेच हे विवर.याच्या सभोवतालच्या परिसराचे पाच विभाग केले आहेत. पहिला म्हणजे उल्कापातामुळे झालेल्या विवराच्या बाहेरचा प्रदेश, उताराचा भाग, तेलाचा सपाट भाग, भोवतालचा दलदलीचा भाग आणि शेवटचा भाग म्हणजे सरोवर. बसाल्ट खडकात (अग्निजन्य) निर्माण झालेले जगातील सर्वात मोठे आघाती विवर, हे सरोवराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यातील पाणी वर्षभर खारटच असते. या पाण्यात जवळपास 11 ते 12 विविध प्रकारचे क्षार आढळतात. क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने या पाण्यात कोणताही जीव जगूच शकत नाही. से.जी.अलेक्झांडर या इंग्रज अधिकाऱ्याने 1823 मध्ये या सरोवराचा अभ्यास केला, मात्र कित्येक वर्षे हे उपेक्षितच होते. त्यानंतर 1965 च्या सुमारास आलेल्या एका वृत्तपत्रीय लेखातून लोकांना  थोडीफार माहिती मिळाली. अनेक संशोधन संस्थांनी 1972 मध्ये केलेल्या संशोधनाअंती लोणार सरोवर आघाती विवर असल्याचे सिद्ध झाले. आणि खऱ्या अर्थाने याची जगाला ओळख झाली. तेव्हापासून आजपर्यंत असंख्य देश-विदेशातील संस्था आणि व्यक्तींनी यावर संशोधन केले. जगात यासारखे केवळ तीन सरोवर असल्याने 'नासा'सारख्या संस्थांनीदेखील याची दखल घेतली. चंद्र आणि मंगळावरील विवरांचा अभ्यास करण्यासाठी आज देश-विदेशातील अभ्यासक इथे भेट देण्यासाठी येतात. सरोवराच्या काठावर तसेच गावच्या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील 15 मंदिरे विवरामध्येच सामावली आहेत.  सभोवताली अनेक पुरातन वास्तूदेखील आहेत. या सर्व मंदिरांचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीने केलेले आहे. घनदाट झाडी, मंदिरे यामुळे इथे अभ्यासकांसोबतच भाविकही गर्दी करतात. सरोवर आणि आजूबाजूच्या निसर्गाचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने हा परिसर वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केला आहे. आता 'रामसर'मध्ये सरोवराचा समावेश झाल्याने या भागाचा आणखी विकास होण्यास मदत होणार आहे.

पाणथळ जागांमध्ये जैवविविधतेचा विकास आणि संवर्धनाचे कार्य सुरू असते. मात्र जगातील अनेक पाणस्थळांचा व्यावसायिक उपयोग केला जातो अथवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशाप्रकारचे नैसर्गिक पाणवठे हे विविध जीवजंतुनचे संरक्षक आणि उत्पादक परिसंस्था म्हणून ओळखले जातात. तलाव, खारफुटी वने, नद्या ,दलदल, प्रवाळ बेटे आणि सरोवरे पाणथळ म्हणून ओळखले जातात. नैसर्गिक ठिकाणांबरोबरच कृत्रिम मिठागरे आणि भातशेतीसुद्धा पाणथळच असते. यावर्षी दख्खनच्या पठारावर असलेले बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आणि उत्तर प्रदेशातील किथम या मानवनिर्मित तलाव या दोन ठिकाणांची 'रामसर'मध्ये समावेशासाठी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार हे दोन्ही पाणथळ आता 'रामसर' च्या संकेतस्थळावर झळकली आहेत. यामुळे लोणार सरोवराला असलेली आंतरराष्ट्रीय ओळख आणखी भक्कम होईल. याबरोबरच जगभरातील पर्यटक आणि निसर्गप्रेमींची पावले लोणारकडे वळतील. शिवाय लोणार सरोवराच्या विकासासाठी आता सरकारला उपाययोजना कराव्या लागणार आहेत. 

या सरोवराचे पाणी खारट असल्याने गोडेपणी अथवा नदीप्रमाणे जीवजंतू येथे आढळत नाहीत. पाणी बाहेर पदन्यास वाव नसल्याने उन्हाळ्यात बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. सरोवराच्या काठावर पक्ष्याच्या 160 प्रकारच्या जाती आढळतात. सरपटणारे 46 प्राणी तसेच 12 प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात. यामध्ये दुर्मिळ असलेल्या राखाडी लांडग्याचाही समावेश आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली

No comments:

Post a Comment