माणसाने मनात आणलं तर तो काहीही करू शकतो. याची उदाहरणं आपण नेहमी पाहतो. माणसाच्या जिद्द, कठोर मेहनत आणि सातत्यापुढे काहीच अशक्य नाही. हेच एका अरब तरुणीने करून दाखवलं आहे. संयुक्त अरब अमिरातीची रहिवासी असलेल्या डॉ. ख्वाला अलरोमेथी या तरुणीने तीन दिवस, 14 तास, 46 मिनिटे आणि 48 सेकंदात सात खंड आणि 208 देशांचा प्रवास करणारी जगातील पहिली महिला ठरली आहे. ख्वालाच्या या विक्रमाची घोषणा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड डे'च्या निमित्ताने नुकतीच करण्यात आली आहे. ख्वालाची ही जगभ्रमंती 13 फेब्रुवारी 2020 रोजी सिडनी-ऑस्ट्रेलिया येथे पूर्ण झाली. कोरोनाचा संसर्ग जगात वाढण्यापूर्वी तिने हा आपला प्रवास पूर्ण केला होता. 'गिनीज बुक'ने आता तिला प्रमाणपत्र दिले आहे. वेगवेगळ्या देशांची संस्कृती जाणून घेण्यासाठी ख्वालांनी हा प्रवास केला. तिला हेही सिद्ध करून दाखवायचं होतं की, अरब देशातील लोकदेखील इतर देशांप्रमाणे विश्वविक्रम करू शकतात.
याआधी हा विश्वविक्रम ज्युली बेरी आणि कसी स्टीवर्ट या अमेरिकन जोडगोळीच्या नावावर होता. त्यांनी 92 तास, 4 मिनिटं आणि 19 सेकंदात 208 देशांतून प्रवास केला होता. मात्र हा विक्रम ख्वालाने मोडीत काढला आणि जगभरात तिचं नाव झालं. विशेष म्हणजे याआधी कोणत्याही तरुणीनं, तेही एकट्यानं असा प्रवास केला नव्हता. सर्वात तरुण,एकट्या प्रवासी-सोलो ट्रॅव्हलर म्हणूनही कमी वेळात जास्तीत जास्त देशात जाण्याचा विक्रम तिने केला. यंदा गिनिज रेकॉर्डची थीमच होती,'डिस्कव्हर युअर वर्ल्ड'! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने ख्वालाचे हास्यमुद्रा असलेले अनेक फोटो आपल्या वेबसाइटवर टाकले आहेत. यात गिनीज बुकने तिचा जगातील विविध सुंदर ठिकाणांसमोर 'हिजाब' घातलेला फोटो प्रसिद्ध केला आहे. तिने हा सगळा प्रवास विमानाने केला आहे. ख्वालाच्या म्हणण्यानुसार, तीन दिवसांत इतका लांबचा वेगवान प्रवास करणे तितकेसे सोपे नव्हते. ती म्हणते की या कार्यासाठी खूप संयम राखावा लागतो. तिला यातून एकच सांगायचं आहे की, महिलादेखील मनात आणलं, तर अशक्य ते शक्य करू शकते. तिला जे हवं ते ती करू शकते. मुळात तिचा देश खूप काही वेगळं करणारा आहे. जगातील सर्वात उंच इमारत असो किंवा तिथल्या पोलिसांकडे जगातील वेगवान कार असो,अनेक गोष्ट तिथे आश्चर्य देणाऱ्या आहेत. मग इथल्या महिलांनी आश्चर्यकारक काही केलं म्हणून बिघडलं कुठं? म्हणूनच तिने हा आश्चर्यजनक प्रवास केला. तिने आपल्या यशाचे श्रेय मित्र आणि तिच्या कुटुंबीयांना देते. ख्वालाला मिळालेला हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तिने आपल्या देशाला आणि समाजाला समर्पित केला आहे. तिला वाटतं की, तिच्या या विक्रमाने प्रेरित होऊन बहुतांश महिलांनी अशा प्रकारचा प्रवास करायला पुढं यावं.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment