Sunday, 1 November 2020
वासुदेव बळवंत फडके
वासुदेव बळवंत फडके हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचा एक आद्य प्रवर्तक. फडक्यांचे मूळ घराणे कोकणातील केळशी (रत्नागिरी जिल्हा) येथील. वासुदेवांचे आजोबा अनंतराव कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. दोन-तीन दिवस किल्ला तटवून अगतिक झाल्यावरच त्यांनी किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या स्वाधीन केला. किल्ल्याजवळ असलेल्या पूर्वीच्या कुलाबा जिल्हय़ातील शिरढोण (रायगड) गावी पुढे फडके कुटुंबाचे वास्तव्य झाले. बळवंतरावांचा मुलगा वासुदेव. त्याचा जन्म शिरढोण येथेच ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला. झाला. सातव्या वर्षापासून त्याच्या शिक्षणास सुरुवात झाली. प्राथमिक शिक्षण शिरढोण येथे झाले. १८५५-६0 या पाच वर्षांत माध्यमिक शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे या ठिकाणी झाले. घरगुती अडचणींमुळे म्हणा किंवा शिक्षणाची आवड बेताची असल्यामुळे म्हणा; पण वासुदेवाने इंग्रजी पाचवीनंतर शिक्षण सोडले आणि नोकरीला सुरुवात केली. पहिली नोकरी जीआयपी रेल्वेत केली. वरिष्ठांपुढे उगाच विनम्र होण्याचा गुण अंगी नसल्यामुळे त्यांची रेल्वेमधली नोकरी सुटली व नंतरची ग्रँट मेडिकल कॉलेजमधील लेखनिकाची नोकरीही फार दिवस टिकली नाही. शेवटी १८६३ मध्ये वासुदेव बळवंत लष्कराच्या हिशेबी खात्यात आले. त्यात ते २१ फेब्रुवारी १८७९ पर्यंत म्हणजे बंडाचा बावटा उभारीपर्यंत राहिले. मुंबईहून त्यांची बदली १८६५ साली पुणे येथे झाली आणि पुणे हीच त्यांची कर्मभूमी ठरली. कचेरीतील वातावरण यांत्रिक आणि वासुदेव बळवंताची वृत्ती तर अत्यंत संवेदनशील आणि बेगुमान. वेळेवर रजा मंजूर न झाल्यामुळे आजारी आईची भेट झाली नाही, तेव्हा वासुदेव बळवंतांनी वरिष्ठांपर्यंत आपली तक्रार नोंदविली. त्यांच्या आयुष्याला क्रांतिकारक वळण लावणारी ही एक महत्त्वाची घटना होय. पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना १८७१ मध्ये झाली व तिच्यामार्फत महादेव गोविंद रानड्यांची स्वदेशी चळवळीवर दोन व्याख्याने झाली. ही व्याख्याने आणि देशी वर्तमानपत्रांचा प्रचार यांनी फडक्यांच्या क्रांतिकारक वृत्तीला खतपाणी पुरविले. ते पुण्यात देशभक्तिपर व्याख्याने देऊ लागले. १८७६-७८ या दरम्यान महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यातच प्लेग-पटकींसारख्या साथीच्या रोगांची भर पडली. गोरगरिबांचे पाण्याचे आणि खाण्याचे फार हाल झाले. शेतकर्यांची गुरेढोरे मेली आणि सर्वत्र मोठा हाहाकार उडाला. वासुदेव बळवंतांनी पुणे, नगर, नासिक या टापूत पायी प्रवास करून लोकांची विपन्नावस्था पाहिली. या दुष्काळास, दारिद्र्यास परकीय सरकार जबाबदार आहे, त्याची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे, असा प्रचार त्यांनी सुरू केला. एकाच वेळी सर्व ठिकाणी उठाव व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे साथीदार त्यांना मिळाले नाहीत. शिवाय पांढरपेशा सुशिक्षित वर्गात त्यांना पाठिंबा मिळेना; तेव्हा मागासवर्गातील रामोशी, धनगर अशांकडे ते वळले आणि स्वत:च्या नेतृत्वाखाली त्यांनी ही मोहीम हाती घेतली. पुण्याजवळील लोणीकंद येथे बंडवाल्यांचे मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले. सरकारी खजिने, सावकार, बनिये यांच्यावर धाडी घालण्याच्या योजना आखण्यात आल्या. शासनाची नाकेबंदी करण्यासाठी रेल्वे, तुरुंग, तार आणि टपाल कचेर्या उद्ध्वस्त करण्याचे ठरले. २२ फेब्रुवारी १८७९ रोजी संध्याकाळी रामोशांच्या मोठय़ा जमावाला जेवण घालण्यात येऊन कोणास चांदीचे कडे, तर कोणास शेलापागोटे, कोणाच्या हातावर पाच-दहा रुपये ठेवण्यात आले आणि जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड उभारल्याचे जाहीर करण्यात आले. पुढील पाच आठवडे या बंडखोरांनी धामारी, दावडी, वाल्हे, हर्णे, सोनापूर, चांदखेड आदी सहय़ाद्रीच्या कुशीतील गावे लुटली. सावकार लुटून पैसा उभारावयाचा आणि नव्या टोळ्या उभारून सरकारला 'त्राही भगवन' करून सोडावयाचे, असा वासुदेव बळवंतांचा विचार होता. त्यांचे निधन १७ फेब्रुवारी १८८३ झाला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment