सुंदरबन हे भारतातील वाघांचे आश्रयस्थान आहे. पश्चिम बंगाल राज्यातील दक्षिण 24 परगणा या जिल्ह्यात सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान बांगला देशाच्या सीमेलगत आहे. या उद्यानातील वैशिष्ट्य म्हणजे इथे जगातील सर्वाधिक वाघ आढळतात. विशेष म्हणजे इथे पांढऱ्या रंगाचे वाघही आढळून येतात.अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्गामुळे,तसेच मोठ्या प्रमाणात आढणाऱ्या वन्यप्राणी आणि पक्ष्यांमुळे याची 'जागतिक वारसा स्थान' म्हणून निवड झाली आहे.
सुंदरबनचे जंगल मुख्यत्वे खारफुटीचे आहे. ज्याला इंग्रजीत मॅनग्रोव्ह असे म्हणतात. जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल म्हणून ते ओळखले जाते. सुंदरबनामध्ये 64 प्रकारच्या वनस्पती आढळतात. जगातील खारफुटीच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजाती येथे आहेत. सुंदरी नावाची वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यामुळेच सुंदरबन नाव पडले आहे. इतर वनस्पतींमध्ये गेनवा, धुंदाल, गर्जन, गोरान या प्रमुख वनस्पती आहेत.
हे उद्यान मुख्यत्वे गंगेच्या त्रिभुज प्रदेशात आहे, ज्यात 54 बेटांचा समावेश होतो. सुंदरबनचे क्षेत्रफळ 1 हजार 330.20 चौरस किलोमीटर आहे. त्यातील खूपच छोटा भाग भारतात येतो. बहुतांश भाग हा बांगला देशात आहे. गंगा नदीचे गोडे पाणी समुद्रात मिळते त्याठिकाणी सुंदरबन आहे. त्यामुळे उद्यानात काही जागी गोडे तर काही जागी खारे पाणी आढळते. त्रिभुज प्रदेश हा मुख्यत्वे हजारो वर्षे गंगा नदीने आणलेल्या गाळामुळे तयार झालेला प्रदेश आहे. तसेच काही ठिकाणी जमीन उंचावली आहे. तर काही जागी कायम दलदल असते. यामुळेच अतिशय वैविध्यपूर्ण असे हे जंगल तयार झाले आहे. पावसाळ्यात प्रचंड पुराने पाण्याची पातळी वाढते.
समुद्राजवळ असल्याने वर्षभर अत्यंत दमट हवामान असते. पावसाळ्याच्या महिन्यात म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये प्रचंड पाऊस पडतो. हिवाळा नाममात्रच असतो. वादळे व चक्रीवादळे ही येथे नेहमीच आहेत.
सुंदरबनचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथील वाघांची संख्या. भारतातील सर्वाधिक वाघ येथे आढळून येतात. जंगल हे खारफुटीचे आणि दलदलमय असल्याने जंगलात प्रवेश करून वाघ पाहणे येथे अवघड असते. तसेच येथील वाघ माणसांच्याबाबतीत अत्यंत आक्रमक आहेत. वाघांच्या माणसांवरील हल्ल्याच्या सर्वाधिक घटना सुंदरबनाच्या प्रदेशात होतात. अभ्यासकांच्यामते खाऱ्या पाण्यामुळे येथील वाघ जास्त आक्रमक आहेत. त्यामुळे ते नरभक्षक बनतात. येथील वाघ माणसांच्याबाबतीत आक्रमक का, याचा मात्र शोध अभ्यासकांना अजूनही लागलेला नाही. काही भक्ष्य न मिळाल्यास येथील वाघ मासेदेखील मारून खातात.
वाघांच्या मुख्य खाद्यामध्ये चितळ व बाराशिंगा ही हरणे येतात. चितळांची संख्याही बरीच आहे. येथील चितळांचे खूर इतर चितळांपेक्षा थोडेसे वेगळे आहेत. दलादलीमध्ये आणि पाण्यामध्ये पोहण्यासाठी अनुकूल बनले आहेत. इतर प्राण्यांमध्ये माकड, रानडुक्कर, मुंगूस, खोकड, रानमांजर, खवले मांजर येतात.
सापांच्या अनेक प्रजाती येथे आढळतात. विविध प्रकारचे पाणसाप, अजगर, अनेक विषारी साप जसे की नाग, नागराज, फुरसे, घोणस, मण्यार, पट्टेरी मण्यार, समुद्री साप तसेच इतर सरपटणाऱ्या प्रजाती म्हणजे घोरपडी, मगरी अनेक प्रकारची समुद्री कासवे तसेच काही जमिनीवरील कासवे येथे आढळतात. पक्ष्यांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. यात मुख्यत्वे पाणथळी पक्ष्यांचा समावेश होतो.
जवळचे गाव- गोसाबा 50 किलोमीटर
जवळचे शहर- कोलकाता 112 किलोमीटर
जवळचे विमानतळ- कॅनिंग 48 किलोमीटर
भेट देण्याचा सर्वोत्तम काळ- नोव्हेंबर ते फेब्रुवारी
लक्षात ठेवा- उद्यानाला भेट देण्यासाठी खास परवाने मिळवावे लागतात. पश्चिम बंगाल वनखात्याकडून ते मिळतात. उद्यानातील गाभाक्षेत्रात मनुष्य वावरावर पूर्ण बंदी आहे.
No comments:
Post a Comment