रबर आणि रबरी वस्तू सर्वपरिचित आहेत. रबराचा शोध फार पूर्वीच लागलेला आहे. पूर्वी नैसर्गिक रबरच वापरत. आता त्याच्या जोडीला कृत्रिम म्हणजेच संश्लेषित रबरही बाजारपेठेत अनेक वस्तुरूपाने येऊन काही गुणधर्मात नैसर्गिक रबरापेक्षा सरस ठरले आहे. ज्या झाडापासून रबर बनवतात त्या झाडाला रडणारे झाड, हिवीया, पॅरा, काऊचू अशी अनेक नावे आहेत. झाडाप्रमाणेच ग्वायूल नामक वनस्पती झुडपांपासून रबर तयार होत आहे.
या झाडांना आणि या लहान वनस्पती झुडपांना खाचा पाडून लेटेक्स किंवा रबराचा चीक मिळवतात. फार पूर्वी म्हणजे १८६० पर्यंत या रबराच्या चिकापासून तयार केलेल्या वस्तू उष्ण हवामानात चिकट होऊ लागत. ज्या रबरी वस्तू पावसाळ्यात आणि हिवाळ्यात चांगल्या वाटत त्याच उन्हाळ्यात फेकून द्याव्या लागत. कारण उष्ण हवामानामुळे त्या चिकट झाल्यामुळे त्यांना घाण वास येऊ लागे. शास्त्रज्ञांना हे एक आव्हानच होते आणि रबर आणि अनेक रबरी वस्तू तयार करणाऱ्या कारखानदारांनी जगातील सर्व शास्त्रज्ञांना आवाहनच केले होते,
उष्ण हवामानात टीकाव धरणाऱ्या रबरनिर्मितीसाठी.
न्यूयॉर्क येथील शास्त्रज्ञ चार्ल्स गुडइयर याने हे आव्हान आणि आवाहन स्वीकारून तो जिद्दीने कामास लागला. बरीच वर्षे विविध प्रकारचे संशोधन करूनही उष्ण हवामानात टीकाव धरणारे रबर काही जमले नाही. तरी चार्ल्स गुडइयर नवनवीन युक्त्या करून चिवट रबरासाठी संशोधन करीतच होता. त्या सर्व संशोधनात कितीतरी वर्षे गेली होती; घरचा पैसा संपूर्ण चार्ल्स कर्जबाजारी झाला होता. त्याचे कुटुंबीय मंडळी त्याच्या या नादापायी कंटाळून केली होती. त्याच्या बायकोची इच्छा होती, चार्ल्सने आता हे संशोधन थांबवावे आणि चार पैसे मिळविण्याची धडपड करून कुटुंबाला सुख द्यावे. पण जिद्दी चार्ल्स गुडईयर या संशोधनात इतका एकरूप झाला होता की त्याला दुसरे काही दिसतच नव्हते. पैसे संपल्यामुळे त्याने घरात प्रयोगशाळा सुरू केली. स्वयंपाकासाठीचा स्टो आणि भांडी रबर संशोधनासाठी वापरली जाऊ लागली. त्याची बायको क्लॅरिसा त्यामुळे तर अधिकच वैतागली पण गुडईयर कसचा ऐकतो ? त्याचे घर रबरमय झाले होते. घर कसचे ते ! न्यूयॉर्क शहरातील एक खोली हेच त्याचे घर. त्याचा पत्ता सांगताना लोक सांगत रबरी बूट, रबरी विजार, रबरी अंगरखा, रबरी टोपी अंगावर असलेला माणूस चार्ल्स गुडइयर आणि ज्याच्या घरात दारात अनेक रबरी वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत व रबराचा दर्प जिथे येईल ते चार्ल्स गुडईयरचे घर! एवढे रबर संशोधनाचे वेड लागले होते चार्ल्स गुडईयरला.
जिद्दी, कष्टाळू चार्ल्स गुडईयरने साऱ्या आयुष्यातील आमदनीची वर्षे हालात काढली. त्याच्या आयुष्याच्या संध्यासमयी १८६० साली त्यावर रबरी संशोधनाची कृपा झाली आणि उष्ण हवामानात टिकाव धरणारे रबर त्याने शोधले. कृपा झाली हे एवढ्यासाठीच म्हणायचे की एका छोट्या अपघाताने चिवट रबर अवतरले! या छोट्या अपघाताला टिपणाऱ्या चार्ल्स गुडईयरच्या तीक्ष्ण नजरेला तेवढाच मान द्यावयास पाहिजे. त्याची शास्त्रीय दृष्टी होती म्हणूनच आपणास सूचना हवामानात टिकणारे खबर मिळाले.
एकदा स्टोव्हवर एका भांड्यात रबर आणि गंधक यांचे मिश्रण उकळत होते. चार्ल्स गुडइयरच्या हातातही गंधकमिश्रित रबराची गोळी होती. त्याच्याशी तो विरंगुळा म्हणून खेळत होता. एवढ्यात काही तरी कारण झाले आणि नेहमीप्रमाणे त्याचे त्याच्या बायकोशी क्लॅरीसाशी भांडण सुरू झाले. क्लॅरीसाने संतापाच्या भरात गुडईयरच्या हातातील गंधकमिश्रीत रबराची गोळी हिसकावून घेतली आणि म्हणाली फेकून द्या हे रबर ! रबरापायी झाला तो सत्यानाश पुरे !! आणि तिने स्वतःच ही गंधकमिश्रीत गोळी फेकून दिली . . . आणि इथेच चार्ल्स गुडईयरच्या सुदैवाने मदतीचा हात पुढे केला.
योगायोगाने ही गंधकमिश्रित रबराची गोळी स्टोव्हवरील उकळत्या गंधकमिश्रीत रबरात पडली आणि काही गंधकमिश्रीत रबर स्टोव्हवर पडून स्टोव्ह विझला. स्टोव्ह विझल्यावर हळूहळू थंड झालेले रबर हवे तेवढे लवचिक, चिवट आणि कितीही तापवले वा थंड केले तरी लवचिकपणा न गमावणारे, न वितळणारे, टणक न होणारे असे रबर तयार झाले होते. हवे तसे रबर मिळाले होते. उष्ण हवामानात टिकणारे आणि हवे ते सर्व गुणधर्म असणारे रबर मिळाले होते. रबर व गंधक यांच्या मिश्रणावर उष्णतेचा परिणाम होऊन हे रबर तयार झाले होते. हे सर्व चार्ल्स गुडिईयरला कळलं. . . अन् आनंदाने तो हे सर्व क्लॅरिसाला सांगणार. . . तर क्लॅरिसा कुठे ? रबर गोळी फेकून ती तरातरा निघून गेली होती. घराबाहेर! पण तीच्या संतापामुळे आणि गंधकमिश्रीत गोळी फेकण्यामुळे हे सर्व घडले होते. चार्ल्स गुडईयर तिच्या मागे धावतच सुटला. हवे ते सापडले . . कष्टाचे फळ मिळालेले. . . यश क्लॅरिसाला सांगण्यासाठी.
गंधकमिश्रित रबरावर उष्णतेचा परिणाम झाल्यावर उष्ण हवामानात टिकणारे रबर मिळाल्याचे ऐकून क्लॅरिसाचा प्रथम विश्वासच बसेना; पण गरम स्टोव्हवर उष्णतेच्या परिणामात तयार झालेले सर्वगुणसंपन्न रबर दाखवल्यावर क्लॅरिसाचा विश्वास बसला. आता या शोधाचा मालकी हक्क (पेटंट) मिळणार आणि आपले कित्येक वर्षाचे दारिद्रय़ संपणार या आनंदाने दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळू लागले.
या पद्धतीला चार्ल्स गुडईयरने 'व्हल्कनायझेशन' हे नाव दिले. गंधक मिश्रीत रबराला उष्णतेच्या परिणामाने उष्ण हवामानात टिकाव धरणारे रबर करणे - म्हणजे 'व्हल्कनायझेशन'! पुढे असे व्हल्कनाईज्ड रबर करण्याचे आणि त्यापासून सर्व प्रकारच्या हवामानात सर्व गुण टिकवून धरणाऱ्या रबरी वस्तू निर्मितीचे अनेक कारखाने निघाले. . . ते केवळ व्हल्कनायझेशन पद्धतीचा शोध लागल्यामुळेच.
सायकलच्या रबरी ट्यूबपासून ते मोटार, ट्रक इत्यादी जड वाहनाच्या ट्यूबचे पंक्चर जोडण्यासाठी 'व्हल्कनायझेशन, हा शब्दप्रयोग आपण नेहमीच ऐकतो. पंक्चर जोडणाऱ्या दुकानाच्या पाटीवर वाचतो आणि 'इथे व्हल्कनायझेशन'चे काम होते' अशी जाहिरातही वाचतो. पण याचा अर्थ अनेकांना माहिती नसतो. उष्णतेच्या परिणामानेच रबरी ट्यूबचे पंक्चर जोडतात. म्हणूनच या कामास अथवा पद्धतीला व्हल्कनायझेशन हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे.
व्हल्कनाईज्ड रबराचा संशोधक आणि साठ पेटंट्सचा मालक चार्ल्स गुडईयर स्वतःच्या वैभवाचे दिवस पाहण्यास मात्र फार काळ जगला नाही. मरताना तो म्हणाला *"मानवाच्या प्रगतीसाठी मी एक काम पार पाडू शकलो याचा मला अभिमान आहे."
No comments:
Post a Comment