Wednesday, 6 May 2020

समतेचे अग्निस्त्रोत : गौतम बुद्ध

जगाला शांतीचा, अहिंसेचा व समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची वैशाख बुद्ध पौर्णिमा जगभरात विविध ठिकाणी साजरी केली जाते. याच पौर्णिमेला बुध्दांच्या जीवनात पाच अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या, त्या म्हणजे १) राजपुत्र सिध्दार्थ गौतमचा जन्म, २) राजकन्या यशोधरेचा जन्म, ३) राजकुमार सिध्दार्थाचा मंगल परिणय, ४) ज्ञानप्राप्ती, ५) महापरिनिर्वाण. या पाच अतिशय लक्षणीय घटनांमुळे या पौर्णिमेला अलौकिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
त्याचप्रमाणे तथागतांचा सर्वात प्रिय शिष्य म्हणून विश्‍वविख्यात झालेल्या आनंदचा जन्मही वैशाखी पौर्णिमेलाच झाला. यशिवाय सिद्धार्थ गौतमांचे सारथी छन्न व प्रिय घोडा कंथक हेदेखील याच दिवशी जन्माला आले. भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य आणि समतेचा अग्निस्त्रोत म्हणजे गौतम बुद्ध.
बुद्ध हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे. बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे. माझ्यामते गौतम बुध्दांना सर्वोत्तम भूमिपुत्र संबोधित करणे अतिशय योग्य ठरेल.जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी गौतम बुध्दांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. बुध्दाच्या मते दु:खाचे मूळ कारण तृष्णा हेच आहे. तृष्णा म्हणजे इच्छांचे विकृत स्वरूप. तृष्णेमुळे राग व आसक्ती वाढते. तृष्णेचा नाश यातच खरे सुख दडलेले आहे. भगवान बुध्दाने पंचशील तत्त्वांच्या आचरणावर भर दिला. बुध्दाने समानतेचा उपदेश दिला आणि तो अंमलातही आणला. स्त्रियांना धर्म दीक्षेचा अधिकार देणारा बौध्द धम्म हा मानवी इतिहासातील पहिला धर्म होय. भारतीय स्त्रीमुक्तीची बैठक भगवान बुध्दाच्या समतेच्या तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहे. बौद्ध धम्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुता, करुणा, मैत्री, प्रज्ञा, मानवी मूल्ये व विज्ञानवाद या तत्त्वांचा पुरस्कर्ता आहे. बुध्दाच्या मते निसर्ग भेदभाव करीत नाही. आकाश सर्वांसाठी एक आहे. पाणी सर्व तहानलेल्यांची तहान भागवते. पृथ्वी भेदभाव करीत नाही. मग माणसा माणसात भेदभाव कशासाठी? मनुष्य मनुष्याचे शोषण का करतो? समाजामध्ये विषमता का आहे? या विचारातून मनुष्याची दयनीय अवस्था बघून सिध्दार्थांचे मन द्रवीत झाले. वयाच्या २८ व्या वर्षी सर्व ऐश्‍वर्य सोडून ते मानवाच्या मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी घराबाहेर पडले. यासाठी त्यांनी स्वत:चे घरदार सोडून ध्यानमार्ग आणि तपश्‍चर्येचा मार्गही अनुभवला. त्यांना ज्ञान प्राप्त झाले. दया, अहिंसा, शांती, मानवतावाद आणि समानता या चिरंतन तत्त्वांनी जीवनातल्या खडतरतेवर आणि दु:खावर मात करता येते हे त्यांना समजले. तथागतांच्या आयुष्यात वृक्षांचे खूप महत्त्व आहे. बालपणात कपिलवस्तूमध्ये जांभळाच्या झाडाखाली ध्यानस्त बसण्याचा अभ्यास ते करीत असत. देहक्लेशासाठी कठोर तपस्या त्यांनी वटवृक्षाखाली केली. त्यांना ज्ञानप्राप्ती झाली ती पिंपळवृक्षाखाली. त्यामुळे पिंपळवृक्ष हे बोधवृक्ष म्हणून नावरूपास आले व बोधवृक्षाला जागतिक वारसा सूचित समाविष्ट केल्या गेले.त्याचप्रमाणे तथागतांचा जन्म व महापरिनिर्वाण दोन्ही प्रसंग शालवृक्षाखालीच घडले. बौद्ध हा नास्तिकांचा धर्म आहे, कर्मामुळेच जीवनात सुख व दु:ख येतात. म्हणून सर्व कर्मातून मुक्त होणे म्हणजेच मोक्ष मिळविणे अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे. धम्मपदात बुध्द म्हणतात की आरोग्यासारखा श्रेष्ठ लाभ नाही व संतोषासारखे श्रेष्ठ धन नाही. क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते.
कर्मासाठी, मुक्त होण्यासाठी आणि ज्ञानप्राप्ती करण्यासाठी चार आर्यसत्ये समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी अष्टांग मार्गाचा अभ्यास केला पाहिजे. त्याद्वारेच मोक्ष मिळू शकेल असे हा धर्म सांगतो. स्वामी विवेकानंद म्हणतात की भगवान बुध्दांसारखा त्यागी महापुरुष या अवनी तलावावर अन्य कुणी झाला नाही. अवघ्या जगामध्ये बुध्दच एकमेव असे महापुरुष आहेत की यज्ञातील पशुहत्या थांबविण्यासाठी यज्ञात पशुच्या ऐवजी स्वत:चे जीवन बळी देण्याची तयारी दखविली. मानवा-मानवातच काय पण मनुष्य आणि पशु यामध्ये देखील जी विषमता आढळते तिचा बुध्दांनी निषेध केला. त्यांना जातिभेद मान्य नव्हता. त्यांनी सर्व जगाला प्रचंड शक्तिशाली सत्याची शिकवण भेदभाव न करता दिली कारण मानवाची समानता हा त्यांच्या महान संदेशापैकी एक संदेश होता. स्वामीजी म्हणतात की बुध्दांच्या हृुदयाचा लक्षांशही मला लाभला तर मी स्वत:ला धन्य मानले असते. चार आर्यसत्ये, अष्टांगिक मार्ग व निर्वाण ही बौद्ध धर्माची मूळ तत्त्वे आहेत. बुध्दांनी सांगितलेली आर्यसत्ये आचारणात आणल्यास माणूस त्याचे जीवन आनंदात घालवू शकतो.ती आर्यसत्ये म्हणजे १) दु:ख असते, २) दु:खाला कारण असते, ३) दु:खाचे निवारण करता येते, ४) दु:ख कमी करण्याचे उपाय आहेत. तथागतांनी अविश्रांतपणे ४५ वर्षे पवित्र धम्माचा प्रचार केला. बौद्ध धम्मात मुळातच असलेली उच्चकोटीची नीतीतत्त्वे, सत्याचे स्वयंसिध्द अधिष्ठान,उत्तम नैतिक शिक्षण आणि परिपूर्ण सामाजिक गरजांचे पूर्तता करण्याचे सार्मथ्य या उपकारक गुणवैशिष्ट्यांमुळे धम्माचा अत्यंत प्रचार झाला. बौद्ध धम्म प्रज्ञा, करुणा आणि समता अशा तीन सिद्धांताची दीक्षा देतो तसेच हा धम्म मोक्षदाता नाही तर मार्गदाता आहे. माणूस हा त्याचा केंद्रबिंदू आहे. बुद्धांची विचारसरणी ही लोकशाहिची विचारसरणी आहे.

No comments:

Post a Comment