Sunday, 3 May 2020

प्राण्यांची ओळख- पाणघोडा

पाणघोडा शाकाहारी प्राणी आहे. तो जास्तीतजास्त वेळ पाण्यात राहत असतो. इंग्रजी भाषेत याला हिप्पोपोटोमस म्हणतात. हिप्पो म्हणजे घोडा आणि पोटोमस म्हणजे नदीत राहणारा. याला समखुरी (खुरांची संख्या सम असलेला प्राणी) प्राणांच्या गणाच्या  हिप्पोपोटोमिडी कुलात याचा समावेश होतो. हा अगदी हत्तीसारखा अगडबंब दिसतो. आकारमानाने हत्तीच्या खालोखाल याचा क्रमांक लागतो. हा एक अवजड शरीराचा सस्तन प्राणी आहे.
एके काळी आफ्रिकेतील नाईल नदीपासून गुडहोप भूशिरापर्यंत सगळ्या नद्यांमध्ये याचे वास्तव्य होते. मात्र आता याचे क्षेत्र मर्यादित झालं आहे. हा सध्या सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील भागांत आढळतो. या प्रदेशातील यांच्या भावंडांना हिप्पोपोटोमस ओंफिबियस या नावाने ओळखले जाते. यांच्या शरीराची डोक्यासह लांबी सर्वसाधारणपणे 4 ते 5 मीटर आणि उंची सुमारे 1.5 मीटर असते. वजन सुमारे 3 ते 5 टनांदरम्यान असते. याचे डोके चपटे आणि थोडंस बोटकं असते. डोळे आणि नाकपुड्या वर उचललेल्या असून कान लहान आणि लवचिक असतात. पोहताना डोळे, नाकपुड्या आणि कान पाण्याबाहेर ठेवण्याची याची खासियत आहे. याच्या चेहऱ्याभोवती तुरळक, राठ केस असतात. वरचा ओठ जाड आणि फुगीर असतो. तर सुळे व चौकीचे दात फार मोठे असतात. वैशिष्ट्य म्हणजे या दातांची अखंड वाढ होत असते. याचे सुळे बाकदार असून त्यांची लांबी 60 सेंटीमीटर व वजन 2.3 ते 2.7 किलोग्रॅम असू शकते. भलामोठा आ वासायला याला फार आवडते.
याचे पाय शरीराच्या मानाने अगदी आखूड असून प्रत्येक पायावर एकसारखी चार बोटे असतात. शेपूट तोकडे ( 60 सेंटीमीटर लांब) असते. शेपटावर देखील तुरळक केस असतात. कानाच्या आतील बाजूसही थोडेसे केस असतात. शरीराच्या त्वचेवरील केस इतके बारीक आणि विरळ असतात की त्वचा केसहीन असावी असे वाटते.
त्वचेचा रंग करडा असतो. त्वचा जाड असून काही ठिकाणी तिची जाडी 5 सेंटीमीटर असते. याच्या त्वचेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्वचा ग्रंथीमय असते. तिच्यातील छिद्रांमधून फिक्कट गुलाबी रंगाचा दाट, तेलकट स्त्राव उत्तेजित अवस्थेत किंवा वेदना होत असताना बाहेर पडतो. हा स्त्राव याच्या त्वचेचे ऊन आणि पाण्यापासून संरक्षण करतो.
हा कळप करून राहणारा प्राणी आहे. कळपात 20 ते 30 प्राणी असतात. नदीच्या पाण्यात डुबताना किंवा नदीकाठी फिरताना हे कळपाने वावरतात. पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती व गवत यांचे खाद्य आहे. हा निरुपद्रवी व गरीब वृत्तीचा प्राणी आहे. मात्र पिलांचे रक्षण करताना किंवा जखमी झाल्यावर हा खूपच क्रूर होतो. माणसे यांच्या मांस, दात, कातडी यांची तस्करी करतात. यासाठी याची शिकार करतात. याच्या दातांपासून उच्च प्रतीचा हस्तिदंतसदृश पदार्थ तयार केला जातो.

No comments:

Post a Comment