तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांच्या मधोमध नागझिरा अभयारण्य 152.81 चौरस किलोमीटर क्षेत्रावर वसलेले आहे. संस्कृतमध्ये 'नाग' या शब्दाचा अर्थ हत्ती आणि येथील लोक पाण्याच्या झऱ्याला 'झिरा" म्हणतात. म्हणूनच अभयारण्याला 'नागझिरा' असे नाव पडले असावे. जैवविविधतेने नटलेल्या नागझिरा जंगलाला 3 जून 1970 रोजी 'नागझिरा वन्यजीव अभयारण्य' म्हणून घोषित केले गेले.
उष्ण पानगळीचे असलेल्या या अभयारण्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे विद्युत पुरवठा अजिबात नाही. हे जंगल नैसर्गिकरित्या राखले गेले आहे. अभयारण्य परिसरात सुमारे 200 पक्षांची नोंद करण्यात आली आहे. शिवाय वाघासमावेत बिबळा, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, चैशिंगा, नीलगाय, चितळ, सांबर, काकर, रानमांजर, उदमांजर, ताडमांजर, उडणखार, मुंगूस, सर्प गरुड, मत्स्य गरुड, टकाचोर, खाटीक, राखी धनेश, नवरंग, कोतवाल अशा अनेक प्राणी व पक्षयांची नोंद निसर्गप्रेमींना घेतली आहे. नागझिरा वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी 'पिटेझरी' व 'चोरखमारा' अशी दोन गेट आहेत. आत प्रवेश करताच नजरेस पडणारी प्राणी, पक्षी संपदा पाहून मन हरखून जाते.
अभयारण्यात ऐन, साग, बांबू, आवळा, बिब्बा, धावडा, तिवस, सप्तपर्णी यांसारखे शेकडो वृक्ष आहेत. याशिवाय गवताळ कुरणे मोठ्या प्रमाणात असल्याने शेकडो तृणभक्षी प्राणी येथे आढळतात. महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल, हळद्या, नीलपंखी, स्वर्गीय नर्तक, नवरंगी, तुरेवाला सर्पगरूड, व्हाइट आईड बझार्ड यांसारखे शिकारी पक्षी आणि अनेक प्रकारची फुलपाखरे तसेच विविध जातीचे कोळी येथे दिसून येतात. विशेष म्हणजे पट्टेरी वाघाचा नैसर्गिक अधिवास येथे आहे. वाघ, बिबट्या, अस्वले यांचा अभयारण्यात मुक्तसंचार असतो.
No comments:
Post a Comment