माणिक वर्मा, पूर्वार्शमीच्या माणिक दादरकर यांचा जन्म १६ मे, इ.स. १९२६ ला झाला. या हिंदुस्तानी संगीत व सुगम संगीत या संगीतप्रकारांत गायन करणार्या मराठी गायिका होत्या. त्या हिंदुस्तानी संगीतातील किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत. मराठी भाषेतील गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी संगीत शिकल्या. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल इ.स. १९७४ साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.
गजानन दिगंबर माडगूळकर यांनी लिहिलेल्या व सुधीर फडके यांनी चाली बांधलेल्या गीतरामायणातील काही गाणी माणिक वर्मांच्या आवाजात होती. पुणे आकाशवाणी केंद्रावरून इ.स. १९५५ साली प्रसारित झालेल्या या साप्ताहिक संगीतकार्यक्रमात त्यांच्यासह सुधीर फडके, बबनराव नावडीकर, योगिनी जोगळेकर इत्यादी गायकांचा सहभाग होता.
माणिकबाईंचा विवाह अमर वर्मा यांच्याशी झाला. राणी वर्मा, अरुणा जयप्रकाश, चित्रपट-अभिनेत्री भारती आचरेकर व नाट्य-चित्रपट-दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेत्री वंदना गुप्ते या त्यांच्या चार कन्या होत. गायिका सुनीता खाडिलकर या माणिकबाईंच्या कनिष्ठ भगिनी.
माणिक वर्मा यांच्या प्रेरणेतून कलाकारांनी कलाकारांसाठी स्थापन केलेले रसिक मंडळ होते. त्याचे पुनरुज्जीवन सुनीता खाडिलकर यांच्याकडून होणे अपेक्षित आहे.
रंगशारदा महोत्सव योजनेअंतर्गत इ.स. १९९८ सालापासून तीन दिवसांचा माणिक वर्मा संगीत महोत्सव साजरा होतो. माणिक वर्मा यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो.
माणिक वर्मा यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात.स्वत: माणिक वर्मा यांना भारत सरकारकडून १९७४साली पद्मश्री पुरस्कार प्रदान झाला.पुणे भारत गायन समाज हा माणिक वर्मा यांच्या स्मरणार्थ माणिक वर्मा हा पुरस्कार देतो. २0१३साली सुनीता खाडिलकर यांना हा पुरस्कार मिळाला होता. २00३साली, हॉकी खेळाडू धनराज पिल्ले यांना माणिक वर्मा पुरस्काराने सन्मानित केले होते.२00२साली संगीत दिग्दर्शक नौशाद यांना माणिक वर्मा पुरस्कार दिला गेला. स्वरानंद प्रतिष्ठान हे शास्त्रीय किवा सुगम संगीताच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल बहुस्पश्री गायिका माणिक वर्मा पुरस्कार देते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पुणे शाखा दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील व्यक्तीला माणिक वर्मा पुरस्कार देते.
No comments:
Post a Comment