अरुण दाते यांचा जन्म ४ मे, इ.स. १९३४ मध्ये झाला. हे एक मराठी भावगीत गायक होते. अरुण दातेंचे वडील रामूभैय्या दाते हे इंदूरमधील प्रतिष्ठेचे गायक होते. त्यांच्या इच्छेनुसार अरुण दाते गायक झाले. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे सुरुवातीला गाणे शिकले. त्यांनी पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. दाते यांनी मुंबईमध्ये कापड अभियांत्रिकीचा अभ्यास सुरू केला. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षीच्या परीक्षेत अरुण दाते नापास झाल्यावर वडिलांनी त्यांना गाणे शिकण्याचे प्रोत्साहन दिले.
अरुण दाते १९५५पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. १९६२मध्ये शुक्रतारा मंदवारा अरुण दाते यांच्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे त्यांना आग्रह करीत. आपण हिंदीभाषिक प्रदेशातील असल्याने आपले मराठी उच्चार शुद्ध नसल्याचे कारण सांगून दाते यांनी सुरुवातीला तीन वर्षे ते गाण्याचे टाळले. शेवटी एकदा ते ध्वनिमुद्रित झाले आणि अफाट गाजले. पुढे अरुण दाते आपल्या कार्यक्रमांतही शुक्र तारा गाऊ लागले. वयाच्या पन्नाशीत त्यांनी भावगीतांवर आपले लक्ष केंद्रित केले इ.स. २0१0पयर्ंत अरुण दाते यांचे शुक्रतारा या नावाने होणार्या मराठी भावगीत गायनाचे २५00हून अधिक कार्यक्रम झाले. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक आल्बमही लोकप्रिय आहेत. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत लोकप्रियता प्राप्त करून दिली असे म्हणले जाते. अरुण दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कविता कृष्णमूर्ती, पुष्पा पागधरे यांबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत.
ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचे ६ मे २0१८ रोजी मुंबईतील कांजूरमार्ग येथील निवासस्थानी निधन झाले.
अखेरचे येतील माज्या शब्द तेच कानी, अपुल्या हाती नसते काही, अविरत ओठी यावे नाम , असाच यावा पहाटवारा, असेन मी नसेन मी, आज मी तुज्यासवे , आज हृदय मम, उष:काल होता होता, काही बोलायचे आहे, गीत आसावले तुझ्यासाठी, जपून चाल पोरी जपून चाल, जेव्हा तिची नि माझी, डोळे कशासाठी, डोळ्यांत सांजवेळी, ती रात्र कुसुंबी बहराची, दिल्या घेतल्या वचनांची, दिवस तुझे हे फुलायचे, दिस नकळत जाई, धुके दाटलेले उदास उदास, भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणिक राणी, भेट तुझी माझी स्मरते, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शुक्र तारा मंद वारा, सूर मागू तुला मी कसा स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला आदी अनेक गाणी अजरामर झाली.
अरुण दाते यांनी शतदा प्रेम करावे या नावाचे एक आत्मचरित्र लिहिले आहे. हे पुस्तक पूर्वी १९८६ साली प्रसिद्ध झाले होते, पण बाजारात मिळत नसल्याने नव्याने प्रकाशित होत आहे. (२६-५-२0१६) अरुण दाते यांनी शुक्रतारा या नावाचे आत्मचरित्र लिहिले असून त्याचे शब्दांकन सुलभा तेरणीकर यांचे आहे. सुरेश ठाकुर यांचाही शतदा प्रेम करावे याच नावाचा ललित लेखसंग्रह आहे. पहिला गजाननराव वाटवे पुरस्कार (इ.स.२0१0), शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार (२0१६) आदी पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.
No comments:
Post a Comment