गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्ष या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील राजकारणी आहेत. हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून 1962 पासून अनेक दशके शेतकरी कामगार पक्षाकडून निवडून गेले. 2009 च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम 1962 च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता. गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि 1999 मध्ये शेकापने कॉंग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. सत्ता नसतानाही त्यांनी सांगोला मतदारसंघात विविध पाणी योजना आणल्या. आज डाळींब क्षेत्रात सांगोल्याचा जो लौकीक आहे, तो पाहता या तालुक्याकडे कॅलिफोर्निया म्हणून पाहिले जाते. सांगोलावासियांना याबाबत अभिमानच वाटतो. राजकारणात निष्ठेबरोबरच आबांनी
स्वाभीमानही जपला. पदांसाठी आडमार्ग पत्करला नाही. खोटेपणा बिलकूल केला नाही, त्यामुळेच की काय? पदे त्यांच्यापर्यंत चालून आलेली नसावीत. पण देशमुख आबांनी आपल्या कामातून ठसा उमटवला. हे काम पदापेक्षा मानाचे नक्कीच आहे. शाळा, महाविद्यालय स्थापन करून त्यांनी सर्वसामान्यांपर्यत
शिक्षणाची गंगा पोहचवली तसेच सांगोल्यात ग्रामीण रुग्णालये तसेच मोठ्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे उभे करून आरोग्याची सुविधाही उपलब्ध करून दिली. त्यांच्याच प्रयत्नातून दीड कोटीच्या ट्रामा केअर सेंटरचे काम प्रगतीपथावर आहे. देशमुख आबा आणि सांगोला तालुका यांच्या ऋणानुबंधाची वीण एकदम
घट्ट झालीय. आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते राजकारणापासून दूर असले तरी समाजकारण मात्र त्यांना सोडत नाहीय. वयाच्या ९४ व्या वर्षातही आबांचे सामाजिक कार्य सुरूच आहे. नि: स्वार्थपणे काम करत असतात, तेव्हा त्यांच्या व्यक्तीमत्वातील 'ऋषी'पणा स्पष्टपणे दिसत असतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment