Thursday, 13 August 2020

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे

मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे यांचा आज 13 ऑगस्ट (१८९८) रोजी जन्मदिवस आहे. होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते. त्यांचे ठाकरे यांच्याशी असलेले वादही फार चर्चेत होते,

प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे हे पुरंदर तालुक्यातील कोडीत खुर्द या गावात जन्मले.त्यांचा जन्म १३ ऑंगस्ट १८८९ रोजी झाला. इ.स. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. इ.स. १९२६ मध्ये 'रत्‍नाकर' व इ.स. १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन' व इ.स. १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. जानेवारी १९, इ.स. १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, इ.स. १९६२ पर्यंत ते चालू होते. जून २, इ.स. १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५, इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते. २१ जानेवारी १९४० ला अत्रे यांनी नवयुग हे वृत्तपत्र सुरु केले. त्यावेळी अत्रे कॉंग्रेसमध्ये होते. त्यामुळे कॉंग्रेसची विचारसरणी या वृत्तपत्रातून स्वातंत्र्य मिळेपर्यंत मांडली जात होती.
इ.स. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी इ.स. १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. इ.स. १९३८ साली 'हंस' साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रॅंडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.
अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स' मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. इ.स. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.
अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.
मुंबईत पहिले सहा महिने सॅंढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल) मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. त्यावेळी त्यांना फक्त ३५ रुपये पगार होता. ही शाळा अत्र्यांच्या नाट्यलेखनाची, समाजसेवेची प्रयोगशाळाच होती. जातिभेदाच्या भिंती फोडण्याचा मंत्र अत्र्यांना या शाळेतच मिळाला.
जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी. टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.
आदर्शांची पायमल्ली, मनाविरुद्ध मते मांडली की तुटून पडणे, चारित्र्यहनन, माहितीची शहानिशा करून न घेता प्रहार करणे, अशा अत्र्यांच्या काही उणिवांवर बोट ठेवले जाते. असे असले तरी त्यांच्या काही निष्ठा पक्क्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे सामाजिक बांधिलकी. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला.
आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी आणि शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश) यांनी संपादित केलेली अरुण वाचनमाला नावाची मराठीची क्रमिक पुस्तके शाळेच्या इंग्रजी पहिली ते इंग्रजी पाचवी (हल्लीची पाचवी ते नववी) च्या अभ्यासक्रमांत होती, सन १९३४ साली निघालेल्या या क्रमिक पुस्तकांसारखी सुरेख पुस्तके त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही निघाली नाहीत, असे शिक्षकांचे आणि पालकांचे मत आहे. ही पुस्तके पहायला मिळणेही अशक्यप्राय झाल्याने, डिंपल प्रकाशनाने या पुस्तकांची नवीन पुनर्मुद्रित आवृत्ती आचार्य अत्रे यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त १३ ऑगस्ट २०१७ रोजी बाजारात आणली आहे. आचार्य अत्रे यांचे नवयुग मराठा साप्ताहिकाचा पहिला अंक १९४० २१ जानेवारी रोजी प्रकाशित झाला.
आचार्य अत्रे आणि गिरीश दोघेही हाडाचे द्रष्टे शिक्षक होते. त्यावेळी ते अनुक्रमे कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे मराठीचे अध्यापक होते. अत्रे तर लंडनहून शिक्षणशास्त्रातील उच्च पदविका घेऊन परतले होते; आणि शाळेचे मुख्याध्यापक होते. तेव्हा अशा जाणकारांच्या अनुभवातून ही पुस्तके तयार झाली आणि एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अवघ्या शिक्षणक्षेत्राला दिशादर्शकाचे काम करू लागली. २०१७ सालीही या पुस्तकांतील कल्पना कालसुसंगत असल्याचे जाणवते. पुस्तकांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे ही पुस्तके आधुनिक भाषा-शिक्षणाची व अध्यापनशास्त्राची तत्त्वे लक्षात घेऊन तयार केली आहेत. पुस्तकांची रचना (Design) करताना कला आणि वाङ्मय हा मुख्य दृष्टिकोन ठेवला आहे. पुस्तके मनोरंजक करण्याच्या प्रयत्नात फार सोपी होतात आणि शैक्षणिकदृष्ट्या निरुपयोगी ठरतात. ‘मनोरंजकत्व म्हणजे सुलभत्व नव्हे!’ गद्य-पद्य लेखनातील विविध फुलोरे, छटा आणि तऱ्हा यांचा मनोज्ञ संगम या पुस्तकांत अनुभवायला मिळेल. सारांश, राष्ट्रीय, महाराष्ट्रीय आणि मानवी अशा तिहेरी दृष्टीने या पुस्तकांची केलेली रचना जाणकारांना प्रतीत होईल. १३ जून१९६९ रोजी त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment