आपल्याकडे जशी दिवाळी उत्साहात साजरी केली जाते त्याच प्रमाणात पारशी धर्मात पतेतीचे महत्त्व आहे. या दिवशी सगळी पारशी कुटुंबं नवीन कपड्यांची खरेदी करतात. घरात गोडधोड पदार्थाची मेजवानी असते. मित्र-नातेवाईक यांना आमंत्रित करून त्यांच्यासोबत या पक्वान्नांचा आस्वाद घेतला जातो. त्यात गोड खीर, गव्हाच्या सुजीचा (रव्याचा) शिरा, दह्यापासून बनविले जाणारे गोड पदार्थ अशी रेलचेल प्रत्येक घरात असते. दिवाळीत जसे आपण एकमेकांना मिठाई देतो. तसेच पारशी लोक एकमेकांना आणि इतर धर्मातील मित्रांनाही मिठाई वाटून सणाचा आनंद साजरा करतात.
पारशी धर्माचे मूळ हे वैदिक संस्कृतीमध्ये दिसून येते. सध्याचे इराण ज्या ठिकाणी आहे, त्याच क्षेत्रात सुमारे आठ हजार वर्षापूर्वी पारशी धर्माची स्थापना झाली असावी. हा काळ वेदांच्या निर्मितीचा काळ आहे. वेदांमध्ये यज्ञाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या यज्ञामध्ये पशूंची दिली जाणारी आहुती पाहून अस्वस्थ झालेल्या पारशी धर्मीयांचे संस्थापक 'इरतुष्ट्र' यांनी या धर्माची स्थापन केली. त्यावेळी यज्ञात बळी देण्यासाठी आणलेल्या काही पशूंना त्यांनी जीवदान दिले होते, असा संदर्भही सापडतो. त्यानंतर या धर्मातील सण-सणावळी कमी करून केवळ तीनच उत्सव साजरे करण्याची पद्धत त्या काळापासूनच सुरू झाली. धर्म संस्थापकाने गाथा लिहून धर्माची मूळ तत्त्वं लोकांपर्यंत पोहोचवली. वेदांची भाषा आणि पारशी गाथा यात बरेचसे साम्य आढळते. अगदी देवतांमधील साम्यापासून ते इतर अनेक दुवे सापडतात. उदाहरणार्थ, देव-दैव, असूर-अहूर, मित्र-मिथ्र, वरुण-वरेण, विवस्वान-विवहवंत, यम-यिम, सोहम्-होम, मास-माह असे दोन्ही धर्मातील कर्मकांडाविषयी साधम्र्य साधणारे अनेक दुवे सापडतात. पारशी धर्म संस्थापकाने लिहून ठेवलेल्या गाथांमध्ये हे दुवे आढळतात. मात्र पारशी साहित्याचे पुढे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पारशी राज्यावर अलेक्झांडरने आक्रमण केले. त्यात फार मोठय़ा प्रमाणावर जाळपोळ करण्यात आली. राजवाडे पेटवले गेले. या सगळ्या जाळपोळीत फार मोठय़ा प्रमाणात पारशी साहित्य नष्ट झाल्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत.
पुढे अति हिमवृष्टीचा भाग असल्यामुळे पारशांच्या काही टोळय़ा खैबर खिंड ओलांडून भारतीय उपखंडात आल्या, तर काही इराकच्या पूर्व भागात स्थिरावल्या. भारतीय उपखंडात आलेला समाज इथेच विसावला. मात्र पुढे इराणवर मुस्लीम आक्रमकांनी केलेल्या हल्ल्यात तिथे स्थिरावलेल्या पारशी समाजावर मोठे संकट आले. मुस्लीम आक्रमकांच्या दबावापोटी त्यातील अनेकांनी मुस्लीम धर्म स्वीकारला तर काही जण आपले कुटुंब (कबिले) घेऊन जगात विखुरले गेले. त्यातील अनेक कुटुंबं भारतात आली. या समाजाची संपूर्ण जगभरातील लोकसंख्या पाहता, ते केवळ दीड-दोन लाखांच्या आसपास आहेत. त्यातील साठ ते पंच्याहत्तर हजार पारशी हे भारतात स्थिरावलेले आहेत. मूळ उगमस्थानी म्हणजेच इराणमध्येही त्यांची संख्या आता खूपच कमी आहे. हा धर्म भारतात आला आणि इथल्या मातीशी, संस्कृतीशी एकरूप झाला. भारताच्या स्वातंत्र्य लढय़ापासून विकासापर्यंत या समाजाचे खूप मोठे योगदान आहे. विचारांमधील आणि कृतीतील पावित्र्य जपणारा, तसेच कोणत्याही कार्यात संपूर्ण झोकून देण्याची वृत्ती असणार्या हा पारशी समाज आहे.
No comments:
Post a Comment