Thursday, 20 August 2020

कवी ना.घ.देशपांडे


कवी ना.घ. देशपांडे यांचे पूर्ण नाव नागोराव घन:श्याम देशपांडे. त्यांचा जन्म २१ ऑगस्ट १९0९ रोजी झाला. त्यांचा जन्म नागपंचमीच्या दिवशी झाला म्हणून नाव नागोराव ठेवण्यात आले असे म्हणतात.

ना.घ.देशपांडे मराठी काव्यसृष्टीतील एक महत्त्वाचे नाव. एक प्रतिभाशाली कवी म्हणून त्यांची दखल मराठी साहित्य वतुर्ळात घेतली गेली. नाघंच्या घरातील वातावरण धार्मिक होते. त्यांचे सख्खे भाऊ वि. घ. देशपांडे हे हिंदुमहासभेचे नेते होते. मध्य प्रदेशातून खासदार म्हणूनही निवडून आले होते. त्यांचे राहणे परंपरा जपणार्‍या खेडयामध्ये होते. पण नाघंनी प्रेमाची धीट अभिव्यक्ती करणार्‍या कविता लिहिल्या- ज्या त्या काळाच्या पुढच्या होत्या. १९२९ मध्ये लिहिलेला शीळ या कवितेमुळे ते नावारूपाला आले. १९५४ साली शीळ या नावाने त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. १९६३ साली अभिसार. नंतर खूणगाठी, गुंफण, कंचनीचा महाल. खूणगाठीला साहित्य अकादमीचे पारितोषिकही मिळाले. रानारानांत गेली बाई, खरे तर निसर्ग आणि प्रेमाची महती याचे वर्णन करणारे हे स्त्री गीत, पण ते गायले एका पुरुषाने. जी. एन. जोशी यांनी. हे मराठीतील पहिले भावगीत समजले जाते.

ना. घ. देशपांडे यांची नदीकिनारी, नदीकिनारी गं व फार नको वाकू उंच जरी बांधा ही गाणी सुद्धा जी. एन. जोशी यांनी गाजविली. डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको हे ना. घ. यांचे आणखी एक प्रसिध्द गाणे, पण ते नंतर पुढे सुधीर फडके यांच्या आवाजात लोकप्रिय झाले. बकुळफुला, धुंडिते तुला धुंडिते वनात अशी आणखी चार-दोन कवितांची गाणी झाली. आचार्य अत्रे यांनी सुचवूनसुद्धा नाघंनी मराठी सिनेमासाठी गाणी लिहिली नाहीत. नाघंनी महात्मा गांधींवर कविता लिहिल्या आणि त्यांची तुलना बुद्ध आणि येशू यांच्याशी केली, तेवढे महत्त्वाचे स्थान विश्‍वेतिहासात दिले. नेहरूंना उदयाचा यात्रिक म्हणून गौरव करणारी कविता त्यांनी लिहिली. ना.घ. देशपांडे यांचे निधन १0 मे २000 रोजी झाले.

No comments:

Post a Comment