Friday, 28 August 2020

हजरत निझामुद्दीनचा दर्गा


दिल्ली परिसरात भारताच्या मध्ययुगीन इतिहासाच्या खुणा जागोजागी आहेत. दिल्ली सल्तनत आणि मुघलांच्या साम्राज्याची आठवण करून देणाऱ्या अनेक ऐतिहासिक वास्तू इथे दिसतात. यातीलच एक वास्तू म्हणजे हजरत निझामुद्दीनचा दर्गा. हजरत निझामुद्दीनचा दर्गा अनेकांनी रणबीर कपूरच्या 'रॉकस्टार' या चित्रपटात पाहिला असेल. यातील 'कुन फाया कुन' हे गाणं इथे चित्रित झालं आहे. हे गाणंदेखील निझामुद्दीनलाच उद्देशून म्हटलं आहे. औलिया निझामुद्दीन हे एक सुफी संत होते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला असला तरी त्यांची कर्मभूमी दिल्ली होती. निझामुद्दीन यांचा दिल्लीतल्या तत्कालीन मुसलमान समाजावर मोठा प्रभाव होता. लोकांना प्रार्थना,उपासना या गोष्टींकडे तो वळवू शकत होता. दिल्लीतला निझामुद्दीनचा दर्गा साधारणपणे 1562 मध्ये बांधला गेला. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या एका राजधानी एक्स्प्रेसचे नाव आहे. ऑगस्तकरांती राजधानी एक्स्प्रेस निझामुद्दीन स्टेशनपर्यंत जाते.या स्टेशनपासून 10 मिनिटांच्या अंतरावरच हा प्रसिद्ध दर्गा आहे. सर्वधर्मीय भाविक इथे भक्तिभावाने येत असतात. याच दर्ग्याजवळ आमिर खुसरोची कबर आहे. आमिर खुसरो हा औलिया निझामुद्दीनचा पट्टशिष्य. इतका पट्टशिष्य की औलिया निझामुद्दीन यांनी म्हटलं होतं की, 'माझ्या कबरीच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकानं आमिर खुसरोच्या कबरीचं दर्शन घेतलं पाहिजे. आमिर खुसरोचं भारताच्या इतिहासातलं योगदान खूप महत्त्वाचं आहे. त्यानं तबला आणि सतार ही वाद्ये शोधली. कव्वाली या संगीतप्रकाराचा आणि सदाबहार गझलचा जनकही तोच आहे. सुफी पंथाचा प्रसार करण्यात खुसरोचा वाटा मोठा आहे. त्यानं लिहिलेली अनेक गाणी आजही सुफी पंथाचे अनुयायी गातात. भारतात इस्लामचा प्रसार करण्यात सुफी संतांचा मोठा वाटा होता. ग्रामीण भागातल्या लोकांना जागृत करणे, त्यांच्या आयुष्याला अध्यात्मिक अधिष्ठान देणे हे कार्य सुफी संतांनी केले. परामेश्वरावरचं प्रेम हा सुफीपरंपरेतला महत्त्वाचा गाभा आहे. प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान हा सुफी परंपरेचा अनुयायी आहे. 'दिल्ली 6' या चित्रपटातलं जावेद अली आणि कैलाश खेर यांनी गायलेलं 'मौला मौला मौला मेरे मौला'  हे प्रसून जोशी यांनी लिहिलेल्या गाण्यातली पहिली ओळ  आपल्याला थेट सुफीपरंपरेशी जोडते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment