Friday, 7 August 2020

म्यानमारमधील सोनेरी श्वेदागॉन पॅगोडा

म्यानमार (ब्रह्मदेश)मधील  रंगून (यांगून) शहराच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा कुठल्याही भागात गेल्यानंतर आकाशाच्या क्षितिजावर उठून दिसणारे, सुवर्णानं झळाळणारे श्वेदागॉन पॅगोडाचे भव्यदिव्य शिखर ही या शहराची ओळख बनलेली आहे. या अतिभव्य, अतिसुंदर पॅगोडाचे या शहरातील अस्तित्व हेच मुळी अडीच हजार वर्षांपूर्वी बौद्ध धर्माशी या भूमीचे जुळलेले नाते सिद्ध करणारी ओळख आहे. कारण श्वेदागॉन पॅगोडाची निर्मितीच मुळी बुद्धाच्या जीवनकाळात झालेली आहे. या पॅगोडाचे धार्मिकदृष्ट्या असलेले महत्त्व आणि भगवान गौतम बुद्ध याचा अन्योन्य संबंध आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी निरांजना नदीच्या किनारी बोधीसत्त्व रूपातील राजकुमार सिद्धार्थ बोधी वृक्षाखाली ध्यानस्थ बसले. अंतिम सत्य काय, हे जाणून घेतल्याशिवाय या स्थानावरून उठायचे नाही, असा मनोनिग्रह करून ध्यानासाठी बसलेल्या सिद्धार्थाला त्या रात्रीच्या एकेका प्रहरात मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत गेली आणि सूर्योदयाच्या पहिल्या किरणांच्या साक्षीनं अंतिम सत्याचा साक्षात्कार झाला. एका विवक्षित उंचीवरील बिंदूजवळ पोहोचलेल्या मनाला विचारांच्या कोलाहलातून निरामयतेचा मार्ग दाखविणाऱ्या ज्ञानाचा साक्षात्कार झाला. आणि सूर्याप्रमाणेच तेजःपुंज दिसणाऱ्या सिद्धार्थाचे गौतम बुद्ध या महामानवामध्ये रूपांतर झाले. त्या अद्भुत घटनेनंतर सात दिवस भगवान बुद्ध त्या पवित्र स्थानावरून उठले नाहीत. सात आठवडे त्यांनी आत्मिक बळावर उपवास केला. त्यानंतर मात्र आपल्या स्थानावरून उठून दुसऱ्या स्थानी एका वृक्षाखाली शांतचित्ताने, प्रसन्न मनाने बसलेल्या बुद्धाला भूक लागली होती. त्याच दरम्यान तेथून पाचशे बैलगाड्यांमध्ये सामान भरून आपल्या मायदेशी परतणाऱ्या व्यापाऱ्याला एक अद्भुत अनुभव आला. त्याच्या गाड्यांपैकी पहिल्या बैलगाडीचे बैल आपसूकच जंगलातील मळलेली वाट सोडून आतल्या भागात गेले. साहजिकच त्या बैलगाडीच्या पाठीमागे जाणाऱ्या दोन्ही व्यापारी बंधूंना झाडाखाली डोळे मिटून शांतपणे बसलेल्या या महान योग्याचे दर्शन झाले. सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या या योग्याच्या तेजाने दिपून गेलेल्या तपूशा आणि भल्लीक या दोघा भावांनी वंदन करून भगवान गौतम बुद्धाला आपल्याकडील मधात बनवलेला गोड पदार्थ देऊ केला. अशा प्रकारे ज्ञानप्राप्तीनंतर ४९ दिवसांचा उपवास सोडण्यासाठी तपूशा आणि भल्लीक यांनी गौतम बुद्धांना अन्न दिले. त्याबदल्यात भगवान बुद्धाने आपल्या डोक्यावरून उपटलेले आठ केस भल्लीकाच्या हातात ठेवले. आणि ते आपल्या सामानासहित घरी सुखरूप पोहोचतील, असा आशीर्वाद दिला. या आठ पवित्र केसांचे अनमोलपण त्या भावांना त्याक्षणी जरी ठाऊक नव्हते तरी त्यांनी ते केस जपून ठेवले. त्यांच्या उक्कालापा या गावी सुखरूप पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या राजाची भेट घेऊन या घडल्या घटनेबद्दलची त्याला माहिती दिली आणि ते आठ केस राजाच्या सुपूर्द केले. राजाने अर्थातच त्या केसांचे महत्त्व जाणून, योग्य जागेची निवड करून त्या पवित्र केसांना मध्यभागी ठेवून त्यावर पॅगोडा बांधला. त्या केसांचे जतन केलेल्या या पॅगोडामध्ये वर्षानुवर्षे पूजा होत राहिली. पण काळाच्या ओघात कधीतरी हे बंद झाले. आणि तो पॅगोडा दुर्लक्षित होऊन विस्मरणाच्या धुक्यात हरवून गेला. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर दोनशे वर्षांनंतर खुद्द सम्राट अशोकाला घेऊन सिलोनमधील दोन बौद्ध भिक्षू या पॅगोडाचा शोध घेत तेथे आले. आणि मग सम्राट अशोकाने या पॅगोडाचा जीर्णोद्धार केला. पूर्वी लयून पॅगोडा म्हणून ओळखला जाणारा हा पॅगोडा आता 'श्वेदागॉन' या नावाने जगभर प्रसिद्ध आहे. यावरून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे गौतम बुद्धाच्या जीवनकाळातच त्याचा धर्म ब्रह्मदेशात पोहोचला होता. खुद्द सम्राट अशोकही ब्रह्मदेशात गेला होता. बौद्ध धर्माच्या खाणाखुणा म्यानमारमध्ये आपल्याला प्रत्येक वळणावर दिसतात. श्वेदागॉन पॅगोडाची भव्यता आणि सौंदर्य केवळ अप्रतिमच! त्याची भव्यदिव्यता शब्दात मावणारी नाही. ती डोळ्यांनी अनुभवावी, हेच खरं.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment