Tuesday, 4 August 2020

गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स

जगातील आणि मानवी जीवनातील चित्रविचित्र विक्रमांची सचित्र नोंद ठेवणारे एकमेव पुस्तक म्हणजे 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'. मनुष्य किती चमत्कार करू शकतो किंवा विश्वविक्रम प्रस्थापित करू शकतो, याचा प्रत्यक्ष छायाचित्रांसह पुरावा देणारे हे पुस्तक दरवर्षी प्रकाशित केले जाते. 27 ऑगस्ट 1955 ला गिनेस ब्रुअरीचे व्यवस्थापकीय संचालक सर ह्युज बिव्हर यांनी 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' स्थापना केली. पण विश्वविक्रमी नोंदीचे पाहिले पुस्तक 1956 मध्ये प्रकाशित झाले. आज हे पुस्तक जगातील 100 देशांमध्ये37 निरनिराळ्या भाषांमध्ये एकाच वेळी प्रसिध्द होते. पुस्तकांचा खप शंभर दशलक्ष प्रतींपर्यंत पोहोचला आहे. हादेखील एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. 
या पुस्तकाच्या दर आवृत्तीत अनेक प्रकारची नवनवीन भर पडत असते. आपले नाव पुस्तकामध्ये झळकावे म्हणूनही आजही जगभरचे लोक प्रयत्नशील असतात. गिनेस बुकमध्ये जगातील विश्वविक्रमी व्यक्तींची ,प्राण्यांची, नानाविध गोष्टींची फक्त नोंद असत नाहीतर त्यात छायाचित्रांचाही समावेश असतो. विषयावर मांडणी करण्यात आलेली असते. जून 1985 पासून या विश्वविक्रमांची व्हिडिओ पाहण्याची व्यवस्था लंडन येथील पिकॅडिली सर्कस येथे करण्यात आली आहे. भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या विश्वविक्रमी गाण्यांची नोंदही यात आहे. त्यांनी1948 ते 1974 या कालावधीत विविध भारतीय भाषामध्ये 25 हजारांहून अधिक गाणी ध्वनिमुद्रित केली आहेत. 35 सेकंदांमध्ये 144 मनुके खाण्याऱ्या माणसांची विश्वविक्रमी नोंद इथे आहे. 6 मिनिटांमध्ये62 केक फस्त करणारा, 26 लग्ने करणारा इसम अशा अनेक प्रकारच्या चित्रविचित्र माणसांच्या नोंदी आपल्याला या पुस्तकांत वाचायला मिळतात. 
याशिवाय विविध क्रीडा प्रकारांत अनेक उच्चांक नोंद आहेत. थोडक्यात काय तर, आकाशातील उड्डाणे, चंद्रावरील सफरी, हिमालयावरील मोहिमा ,उत्तर व दक्षिण ध्रुवावरील शोध मोहिमा यासारख्या नेत्रदीपक साहसांपासून घोरणे, शिंकणे, लांब केस, नखे, मिशा,दाढी वाढवणे, जगातील सर्वाधिक बुटका, उंच इसम, सर्वाधिक वय असलेला इसम आदींच्या नोंदी आपल्याला वाचायला मिळतात. मानवी कर्तृत्वाचे दोन ध्रुव एकत्र आणण्याचे , त्या कर्तृत्वामधील अचूकता व सत्यता जपत त्याची नोंद घेणे आणि गेल्या 65 वर्षात त्यातील एकाही नोंदीला आक्षेप घेतला जाऊन तो खोटा ठरणे, असे आजपर्यंत कधीच घडले नाही. सर्वात मोठी पगडी परिधान करण्याचा विश्वविक्रम भारतातल्या पंजाबमधील एका इसमाच्या नावावर आहे. नाकाने सर्वाधिक शब्द टायपिंग करणे, सर्वात बुटकी व्यक्ती, सर्वाधिक तास नृत्य, सर्वात मोठी बिर्याणी बनवण्याचा विक्रम, सर्वात महागडा सूट, सर्वात छोटी गाय, सर्वात महागडा विवाह, सर्वाधिक चित्रपट गाणी लिहिण्याचा विक्रम, सर्वात लांब मिशी ठेवण्याचा विक्रम असे काही विश्वविक्रम भारतातल्या लोकांच्या नावावर आहेत. 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात भारतातल्या 80 लोकांचा समावेश आहे. सर्वात लांब केस असलेली किशोरी (निलांशी पटेल), सर्वात बुटकी महिला (ज्योती अमागे,नागपूर),सर्वात लांब नख (श्रीधर चिल्लल, पुणे),कागदाच्या कपांचा सर्वाधिक संग्रह (व्ही शंकरनारायणन, तामिळनाडू), सर्वाधिक प्रदूषित शहर (कानपूर) असे काही विश्वविक्रमी नोंदी आहेत. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment