व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे वेगवेगळे अवयव इतर गरजू रुग्णाला देणे म्हणजे अवयवदान होय. त्यानुसार एक व्यक्ती आठ जणांना अवयवदान करू शकतो. मात्र भारतात अवयवदानाचे प्रमाण हे प्रति दहा लाखाच्या मागे 0.८ टक्के एवढे अल्प आहे. जे अमेरिका आणि स्पेनसारख्या विकसित देशांच्या तुलनेत अत्यल्प आहे. त्यामुळे आपल्या देशात मृत्यू पूर्व आणि मृत्यू पच्छात अवयवदान करण्यास प्रेरित करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. एक मेंदू मृत व्यक्तीच्या साह्याने किमान पन्नास रुग्णाच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. मृत्यूनंतर त्याचे डोळे, हाड, त्वचा दान करता येते. एखाद्या आजारामुळे किंवा अपघातामुळे मेंदू निकामी झालेल्या व्यक्तीचे मूत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड, हृदय, फुफ्फुस, आतडे या अवयवासह डोळ्यांच्या कॉर्निया, त्वचा, बोन मॅरो, हृदयाच्या झडपा, रक्तवाहिन्यांचेही दान करता येते. असे अनेक अवयव गरजू रुग्णाला दान केले तर जीवन मरणाच्या दारात उभ्या असलेल्या अनेक गरजवंत रुग्णांचे प्राण वाचविण्यास नवसंजीवनी ठरू शकते. म्हणून अवयवदान हे जगातील सर्वश्रेठ दान आहे असे म्हटले जाते. पण आजही समाजात अवयवदानाचा निर्णय घेण्यास कमालीची उदासीनता दिसून येते. खुळ्या चालीरीती, स्वर्ग-नरकाची खुळचट कल्पना, स्वर्गोत्तर मोक्ष न मिळण्याची भीती, जुन्या चालीरीतींना न सोडण्याचा मोह इत्यादी कारणे अवयवदान न करण्यास आजही अडसर येत आहे. खरं तर मरोत्तर मोक्ष मिळो न मिळो पण आपल्या हयातीत मोक्ष मिळाल्याचे समाधान जर मिळवायचे असेल तर या खुळचट विचारातून बाहेर पडणे गरजेचे आहे. यामुळे पीडित गरजवंतांना आपल्या देशात पुरेशे अवयव पुरवू शकतं नाही; त्यामुळे कित्येकांचे नाहक बळी जातात. अवयवदानाच्या संकल्पपूर्तीतून आपण फक्त जीवनदानच देवू शकत नाही तर त्याहीपलीकडे जातीधर्माच्या बंधनातून मुक्त होत बंधुभावाची संकल्पना आकारास आणू शकतो. ज्याप्रमाणे रक्तदान करतांना त्या व्यक्तीचे रक्त हे कोणत्या धर्माचे, जातीचे आहे, हे पाहिल्या जात नाही त्याप्रमाणे गरजवंतांना अवयवदान देताना एकच धर्म पाळला जातो, तो म्हणजे मानवतेचा धर्म ! आपले अवयव हे कुणाच्या जीवनाला अभय देवू शकते, तर वेळप्रसंगी आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबीयांवर अशी वेळ आली तर त्या गरजेची पूर्ती सुद्धा होणे महत्वाचे असते.
त्यामुळे अवयवदान हे एकमेकांना पूरक असे घटक आहे. अवयवदान आपण कुठल्याही वयात करू शकतो. याला वयाचं बंधन नसते. पण आपल्या जिवंतपणी अवयवदानाचा निर्णय घेत आपल्या जवळच्या नातेवाईकांना याची माहिती आपण देणे गरजेचे असते. आज अवयवदान काळाची गरज असून अवयवदानाचा निर्णय प्रत्येकांनी घ्यायला हवा !
भारतात दरवर्षी पाच लाख लोकांचा अवयव न मिळाल्यामुळे नाहक बळी जातो. यातील दोन लाख यकृताच्या आजारमुळे दगावतात तर पन्नास हजार रुग्ण हृदयाच्या आजाराने दगावतात. दरवर्षी सुमारे दीड लाख जणांना किडनीची गरज असते, परंतु फक्त पाच हजार किडनी लागणार्या रुग्णाची गरज पूर्ण करू शकतो. आपल्या देशात दहा लाख अंध रुग्ण अजूनही नेत्रदानाच्या प्रतीक्षेत आहे. यावरून आपल्या देशात अवयवदानाची गरज किती मोठया प्रमाणात आहे, हे लक्षात येते. आज जगातिक पातळीवर अवयवदानाच्या बाबतीत आपण बरेच मागे आहोत. आता आपण मागे राहून चालणार नाही.
No comments:
Post a Comment