काशी विश्वनाथ मंदिराच्या जवळच शनिचर (शनी) व अन्नपूर्णेचं मंदिर आहे. रामाचं तुलसीमानस हे संपूर्ण संगमरवरातील मंदिर, संकटमोचन ,कालभैरव, नवीन विश्वनाथ मंदिर अशी अनेक मंदिरे इथे आहेत. भारतमातेचं देखणं मंदिर फक्त वाराणसीत आहे. काशीत अनेक बुद्ध मंदिरेही आहेत. बुद्धानं जिथं आपली पहिली दीक्षा दिली ते सारनाथ वाराणसीपासून अवघ्या 10 कि. मी. अंतरावर आहे. सम्राट अशोकानं इथं अनेक स्तूप व इमारती बांधल्या. अशोक स्तंभ, मूळ गंधाकुटीविहार, धर्मजाचक स्तूप अशा अनेक वास्तू त्यांनी बांधल्या. तिबेट, चिनी, थाई, बर्मी किंवा जपानी शैलीत बांधलेली अनेक आधुनिक मंदिरे आणि स्तूप इथे आहेत, जे प्रेक्षणीय आहेत.
या शहराला 'बनारस' हे नाव इंग्रजांनी दिलं होतं. इथे 2000 हजार एकर जमिनीवर बनारस हिंदू विश्वविद्यालय पसरलं आहे.बनारसच्या महाराजांनी ही जमीन दान केली आणि विश्वविद्यालयाचा पाया पंडित मदनमोहन मालवियांनी घातला. इथे संस्कृत व हिंदी भाषाव्यतिरिक्त आधुनिक शिक्षण पद्धतीची सुरुवात करण्यात आली. संस्कृत भाषा, भारतीय कला, संस्कृती व संगीत यांसाठी हे विश्वविद्यालय भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. इथलं तोंडात विरघळणारं आणि आपली वेगळी चव जिभेवर व मनात रेंगाळत ठेवणारं बनारस पान आणि बनारस साडी प्रसिध्द आहे. विशेष म्हणजे बनारस साडी विणण्याचं काम मुस्लिम कलाकार करतात. वाराणसीतील हिंदू-मुस्लिम संस्कृती अगदी दृष्ट लागण्यासारखी आहे. वाराणसी ही संत व समाजसुधारकांची भूमी आहे. तसेच साहित्यिकांचीही भूमी आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment