Wednesday, 26 August 2020
महाराष्ट्राचं राज्यफूल-जारूळ
जारूळ हा फुले देणारा वृक्ष आहे. हा वृक्ष एप्रिल ते जूनच्या दरम्यान फुलांनी फुलून येतो. महाराष्ट्र दिनी हा वृक्ष फुलांनी फुललेला असतो, म्हणून कदाचित हे फूल राज्यफूल बनले असावे. हा पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो. कोकणात नदीनाल्यांच्या काठांवर जारुळाचे भरपूर वृक्ष दिसतात. कोकणात या वृक्षाला 'मोठा बोंडारा' असे म्हणतात.हा ताम्हण, तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही ओळखला जातो. याचे शास्त्रीय नाव Lagerstroemia speciosa आहे. हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा वृक्ष आहे. भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी तामणाचे वृक्ष वाढतात. कडक उन्हाळ्यात जांभळ्या रंगाच्या फुलांनी फुललेले हे वृक्ष अनेकांचे लक्ष वेधून घेतात. शहरातील अनेक भागांत रस्त्याच्या शेजारी ही झाडे लावली असल्याचे दिसून येते. हे झाड साधारण गोलसर, डेरेदार असते. फूल पूर्ण उमलल्यानंतर सहा ते सात सेंटिमीटर व्यासाचे होते. त्या फुलाला झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या असतात. जारुळाचे झाड सरासरी दहा ते वीस मीटर उंचीचे असते. भारतात त्याचा वापर अधिकतर शोभेसाठी केला जातो. रायगड जिल्ह्यात माणगाव येथे जारुळाचा अंदाजे शंभर फूट उंचीचा वृक्ष आहे. लाकूड लालसर रंगाचे, मजबूत, टिकाऊ, चमकदार असते. टिकाऊपणा आणि उपयोग याबाबतीत जारूळ सागवानाच्या झाडाशी स्पर्धा करते. जारुळाचे लाकूड इमारती, होड्या, घरबांधणी, पूल, मोटारी, विहिरींचे बांधकाम, जहाजबांधणी, रेल्वे वॅगनसह विविध वस्तू बनवण्याच्या कामात वापरले जाते. बंगाल, आसाम, दक्षिण भारत, अंदमान निकोबार आणि श्रीलंकेतील जंगले येथे जारुळाची वृक्ष आहेत. म्यानमार, मलाया, चीन या देशांत नदी काठीही हे वृक्ष आढळतात. भारतीय उपखंडातले जंगली फूल म्हणून याची ओळख असली तरी त्याच्या गुणांमुळे ते फूल युरोप,अमेरिकेतही पोचले आहे. जारूळाचे औषधी गुणधर्मही आहेत. ताप आल्यावर याच्या सालीचा काढा दिला जातो. तोंड आल्यावर याचे फळ तोंडाच्या आतील बाजूने लावले जाते.पाने-फळे मधुमेहावर गुणकारी आहे. पोटदुखी आणि वजन कमी करण्यासाठीही झाडाचा उपयोग होतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment