Friday, 14 August 2020

पृथ्वीप्रदक्षिणा घालणारी पहिली भारतीय महिला: उज्ज्वला पाटील धर

एका ध्येयवादी तरुणीने समुद्रमार्गे पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचे स्वप्न मनी बाळगून 1978 मुंबई ते कोलोंबो असा समुद्रमार्गे आपला पहिला प्रवास पूर्ण केला. यामुळे तिचा आत्मविश्वास आता वाढला. आता तिला समुद्रपर्यंटनाची आवड निर्माण झाली होती. 1979 मध्ये तिने इंग्लड ते तांबडा समुद्र असा प्रवास सुरु केला. पण,तिची बोट तांबड्या समुद्रात बुडाली. कसा बसा तिने आपला जीव वाचवला आणि ती भारतात परत आली. पण नंतर तिचा हा प्रवास सुरूच राहिला.  पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या या महिलेने नाव आहे, उज्ज्वला पाटील धर. भारत सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

सांगली जिल्ह्यातील करंजवडे सारख्या एका खेडेगावात, एका शेतकरी कुटुंबात 1955 साली उज्ज्वला पाटील यांचा जन्म झाला. वडील पुरोगामी विचाराचे असल्याने त्यांना बरेच स्वातंत्र्य होते. लहानपणापासूनच ती धाडसी होती. अतिशय जिद्दी आणि महत्वाकांक्षी होती. खो-खो, कबड्डी, हायकिंग, माउंटनेयरिंग, ट्रेकिंग आणि शूटिंग यासारख्या साहसी,आव्हानात्मक खेळात तिने हिरीरीने सहभाग नोंदवला होता. तिने शूटिंगमध्ये तर तब्बल 150 पदक जिंकले आणि राज्य, राष्ट्रीय पातळी, तसेच प्री ऑलंपिक ट्रायल्समध्ये भाग देखील घेतला. तिच्या कॉलेज च्या मित्रांमुळे तिला नौकानयन ची ओळख झाली. त्यात तिला आवड निर्माण झाली.  तिने नेव्हिगेशन चा कोर्स पूर्ण केला आणि ती निघाली आपल्या पहिलवहिल्या समुद्रप्रवासाला.

वयाच्या 23 व्या वर्षी म्हणजेच 1978 साली मुंबई ते कोलोंबो असा प्रवास समुद्रमार्गे पूर्ण केला, तो ही शिडाच्या बोटीतून. तिचा आत्मविश्वास वाढला होता. तिने 1979 साली इंग्लंड ते तांबडा समुद्र असा प्रवास करण्याचे आव्हान स्वीकारले आणि तिची बोट पळत सुटली. काही तांत्रिक गोंधळामुळे नेव्हिगेशन उपकरण अयशस्वी झाले आणि तिची बोट बंद पडली. चार दिवस ती या प्रसंगात सापडली होती. सभोवती केवळ खवळलेला समुद्र आणि जोराने वाहणारा वारा. सुदैवाने एका नॉर्वेजियन जहाजाने तिला वाचवले अन्यथा बोटीसह तिला जलसमाधी मिळाली असती.

या जीवघेण्या प्रसंगातून वाचल्यानंतर एखाद्याने समुद्र पर्यटनाला रामराम केला असता. पण, ती याला अपवाद.  मुळातच धाडसी असल्याने आणि आव्हाने झेलण्याची आवड असल्यानं ती पुन्हा पाण्यात उतरली. 1981 साली तिने इंग्लंड ते मुंबई असा सुएझ कालव्यातून यशस्वी प्रवास केला. या प्रसंगातून एखाद्या संकटाला घाबरून ध्येयापासून पळ काढू नये याचाच बोध मिळतो. आता तिच्या मनात पृथ्वीप्रदक्षिणेच्या स्वप्नाने जन्म घेतला होता. यासाठी मोठा निधी आवश्यक होता. पण, आपल्या जिद्दीने तिने तो मिळविला देखील. 

मिळालेल्या निधीतून तिने आपली बोट तयार करून घेतली आणि 13 जून 1987 साली वयाच्या 32 व्या वर्षी गेट वे ऑफ इंडिया मुंबई पासून तिने जगप्रदक्षिणेला सुरुवात केली. समुद्रातील अनेक समस्यांना तोंड देत, त्यावर मात करत 15 ऑक्टोबर 1988 ला पृथ्वीप्रदक्षिणा करून ती गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे परत आली. तिच्या या प्रवासाने एक नवा विक्रम केला होता. हा प्रवास यशस्वी करून उज्ज्वला ही  समुद्रमार्गे पृथ्वीप्रदक्षिणा करणारी भारताची पहिली महिला ठरली.

उज्वला यांचा हा प्रवास सुगम होता; असं कोणीच म्हणणार नाही. हा पराक्रम ज्या काळात त्यांनी केला, त्याकाळात माहिती तंत्रज्ञान आजच्या एव्हढं पुढारलेलं नव्हतं. खराब हवामान, जोरदार वारे आणि प्रचंड लाटा या साऱ्या आव्हानांवर मात करत त्यांनी पृथ्वीप्रदक्षिणा पुर्ण केली आहे. आपल्यालाही जीवनात वरील संकटांपासून पळ न काढता सामोरे जावेच लागते. त्यावर मात करून, आपलं ध्येय साध्य करण्याची प्रेरणा आपल्याला उज्वला पाटील यांच्याकडून मिळते.

No comments:

Post a Comment