Wednesday, 5 August 2020

कान्हाची सफर

 'कान्हा नॅशनल पार्क' हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशात आहे आणि सातपुडा जंगलातील मंडला आणि बालाघाट या दोन जिल्ह्यात 940 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे.  येथे बंगालच्या वाघांची संख्या लक्षणीय आहे आणि यामुळेच जंगलातील सफरीदरम्यान वाघ दिसण्याची शक्यता इथे सर्वाधिक आहे. कान्हामध्ये सालाची झाडं खूप आहेत. याशिवाय तेंदू, मोह, वड आणि इतर आपट्याच्या कुळातील अनेक झाडं आहेत. मधूनमधून बांबूही दिसतो. या जंगलात अनेक ठिकाणी गवताळ भाग आहे.
इथे पर्यटकांना 'टायगर शो' दाखवला जातो. तिकीट काढून 'टायगर शो' च्या ठिकाणी जाता येते. हा शो म्हणजे माहूत हत्ती घेऊन अगदी पहाटे वाघाच्या मागावर जातात. एखाद्या वाघाने शिकार मारली असल्यास तो तिथेच बसलेला असतो. माहूत हे हेरून तिथे एक हत्ती उभा करून ठेवतात. हत्ती व वाघ एकमेकांना सारखेच घाबरतात. त्यामुळे दोघेही आपापल्या जागीच थांबतात. मग ही बातमी सर्वांना कळवतात. लोक तिथे जमले की मग हत्तीवरून 4-4 जणांना आत नेऊन वाघ अगदी जवळून दाखवतात. अर्थात हे सगळे वाघाच्या मर्जीवर अवलंबून असते. स्वतःच्या मर्जीप्रमाणे तो तिथे थांबतो. 
कान्हा जंगलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बारशिंगा. 'बारशिंगा' हा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 60 च्या दशकात त्यांची संख्या फक्त 60-65 होती. या जंगलात त्याला अभय मिळालं. आता मात्र इथे त्यांची संख्या चारशेच्यावर गेली आहे.येथे बिबळे, हरीण, गवे, अस्वल, रानटी कुत्री आणि पक्ष्यांच्या अनेक प्रजाती देखील आहेत. हिवाळ्यात बरेच स्थलांतरित पक्षी उद्यानास भेट देतात, म्हणून पक्षी निरीक्षणासाठी हा काळ सर्वोत्कृष्ट मानला जातो. 
या राष्ट्रीय उद्यानाचा उल्लेख प्रसिद्ध लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या 'जंगल बुक' या पुस्तकातही आहे.  'बामणी दादर' हा कान्हाचा सर्वात उंच भाग आहे. 870 मी. उंचावरचा हा भाग पठारी आहे. सर्वत्र गवतच गवत आहे. सर्वत्र दाट आणि हिरवळ पाहायला मिळते. खाली 'सौंप मैदान' आहे. इथे एक तलाव आहे. 'ग्रे लॅग गुज' नावाचं बदकाच्या जातीचे स्थलांतरित विदेशी पक्षी दिसतात.  कान्हा नॅशनल पार्कचा सनसेट पॉईंट पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.  जेथे आपण सांबर आणि गौर सारख्या प्राण्यांमध्ये सुंदर सूर्यास्त पाहू शकतो.  जंगल सफरीमध्ये हत्ती सफरी देखील जीप बरोबर केली जाते.  याद्वारे आपण प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या अगदी जवळून पाहू शकतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment