ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबरीकार म्हणून प्रामुख्याने शिवाजी सावंत यांचा उल्लेख केला जातो.त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या गावी 31 ऑगस्ट 1940 रोजी झाला. वडील गोविंदराव शेतकरी होते. घरची परिस्थिती बेताची असली तरी लहानपणापासूनच शिवाजी प्रचंड ध्येयवादी होता. त्यांना खेळाची, अभ्यासाची आणि व्यायामाची आवड होती. पुढे अखिल भारतीय पातळीवर उत्कृष्ट कबड्डी खेळाडू म्हणून गाजले. वक्तृत्व, निबंध, नाट्य स्पर्धेतही त्यांची कामगिरी उत्तम होती.
आजरा येथील व्यंकटराव प्रशालेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर ते पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. आपल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने त्यांनी नोकरी करत शिकावे, हा उद्देश ठेवून शॉर्टहँड आणि टंकलेखनचा डिप्लोमा पूर्ण केला आणि कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात नोकरी मिळवली. कोर्टात नोकरी मिळाली खरी,पण त्यात त्यांचे मन रमले नाही. शिक्षक आणि लेखक होण्याची त्यांची इच्छा त्यांना कोल्हापूरच्या राजाराम प्रशालेत आणले. शिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच त्यांनी पदवीचे शिक्षण सुरू ठेवले. याच काळात 'मृत्युंजय' या अजरामर कादंबरीचे बीज त्यांच्या मनात रुजले. शाळेत असल्यापासून 'कर्ण' हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. 1963 ला त्यांनी 'मृत्युंजय'च्या कादंबरी लेखनास सुरुवात केली आणि ती 1967 मध्ये प्रकाशित झाली. कादंबरी लेखनासाठी त्यांनी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर महिनाभर मुक्काम केला. कादंबरी प्रचंड गाजली. विशेष म्हणजे या कादंबरीने सर्व विक्रम मोडीत काढले. यावेळी त्यांचं वय अवघे 26 वर्षे होतं.
1974 साली राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या 'लोकशिक्षण' मासिकाचे संपादन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. मग ते पुण्याला स्थायिक झाले. 1986 साली त्यांनी स्वेच्छेने निवृत्ती घेतली आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील 'छावा' कादंबरी लिहायला घेतली. 1979 साली 'छावा' प्रकाशित झाली. याच काळात 'मृत्युंजय' आणि 'छावा' कादंबरीवर आधारित नाटकेही लिहिली. या नाटकांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कर्मवीर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवनावरील 'लढत' ही द्विखंडात्मक कादंबरी लिहिली. तसेच भाई मनोहर कोतवाल यांच्या जीवनावरील 'संघर्ष' सारखी प्रदीर्घ चारित्रकहानी, 'अशी मने असे नमुने','मोरावळा', 'युगंधर एक चिंतन', 'शेलका साज', 'कांचनकण' (ललित), 'करांतीसिंहांची गावरान बोली'(संपादन) अशी पुस्तके लिहिली. प्रा. मिलिंद जोशी त्यांच्या लिखानाविषयी म्हणतात की, शिवाजीरावांची शब्दकळा भरजरी होती. भारदस्त होती. पल्लेदार वाक्यरचनेतून नेमका आशय ते लीलया मांडत असत. त्यांची सुडौल भाषाशैली धबधब्याच्या अविरत गर्जनेशी निगडित असावी.
शिवाजी सावंत यांचा 'मृत्युंजयकार' असा उल्लेख प्रथम आचार्य अत्रे यांनी केला. साहित्य जगतात ते 'राजे' म्हणून परिचित होते. ते आयुष्यभर राजेशाही थाटात जगले. त्यांच्या 'मृत्युंजय' कादंबरीचे अनेक भाषांत अनुवाद झाले आणि गाजलेही. या पुस्तकामुळे राष्ट्रीय पातळीवर त्यांना मान्यता मिळाली. 2002 मध्ये त्यांनी श्रीकृष्णावर 'युगंधर' कादंबरी लिहिली. यासाठी तब्बल 20 वर्षे त्यांचे चिंतन सुरू होते. 'युगंधर'चा हिंदी अनुवादही आला. त्यांची व्याख्याने गाजत होती. मानसन्मान मिळत होते. 1995 मध्ये 'मृत्युंजय' ला साहित्य क्षेत्रातला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 18 सप्टेंबर 2002 रोजी त्यांचे कोकणातील मडगाव येथे निधन झाले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment