त्यामुळे भारतातील जाडेभरडे कापड महाग मिळू लागले. भारतीय उद्योग मोडून पाडण्याचा ब्रिटिशांचा हा
डाव सत्यशोधक चळवळीचे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी ओळखला. नारायण लोखंडे हे कामगारांना न्याय, हक्क, त्यांना योग्य मोबदला, त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी यासाठी लढा उभारणारे कामगार नेते होते. कामगार चळवळीचे ते जनक होते. देशातील कापड उद्योगाची भरभराट व्हावी आणि कामगारांची स्थितीही सुधारावी, अशी भूमिका लोखंडे यांची होती. त्यामुळे कापडावरील कराविरोधात 'दीनबंधु' या वृत्तपत्रातून त्यांनी आवाज उठवत ब्रिटिशांवर प्रहार केला. ९ फेब्रुवारी १८९६च्या अंकात गरिबांच्या कापडावरील जकातवाढ ही अत्यंत जुलमी व वेडगळ असल्याचे लोखंडेंनी म्हटले. ब्रिटिश सरकार हा खटाटोप लँकेशायर येथील कापड कारखानदारांसाठी करीत आहे, याविरोधात देशभरातून निषेध व्हावा आणि तो सुरू राहावा, सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी व्यापाऱ्यांनी लँकेशायरचे विलायती कापड न आणण्याचा व लोकांनी ते न वापरण्याचा निश्चय करण्याची आवश्यकता असल्याची उपाययोजना लोखंडे सुचवितात. ब्रिटिशांच्या या जुलमाविरोधात समाजसुधारकांसह सर्व देशवासीयांनी एकत्र यावे, असे आवाहनही ते 'दीनबंधु'तून करतात. देशावर मोठे संकट ओढवलेले असताना वृत्तपत्रे मात्र धर्मप्रसार, तसेच एकमेकांवर कोरडे ओढण्यात व्यग्न होती. त्या वृत्तपत्रातील पत्रकारांनाही श्री. लोखंडे यांनी २३ फेब्रुवारी १८९६ च्या अंकातून 'अशा आणीबाणीवेळी सुधारक व विरोधक हे पक्ष करणे केवळ देशबुडवेपणाचे लक्षण आहे. ते टाकून देण्यास शहाण्या पत्रकारांनी मनावर घ्यावे,' असे आवाहन केले होते. देशातील कापडावर जकात लावून ब्रिटिश सरकारने अन्यायी जुलूम केला आहे, असे लोकांना पटवून देऊन विलायती कापडावर बहिष्कार टाकावा, अशी भूमिका वृत्तपत्रातून, वेगवेगळ्या बैठकांमधून लोखंडेंनी मांडली होती. कामगारांबरोबरच स्वदेशीची हाक देणाऱ्या नारायण मेघाजी लोखंडे यांचे कार्य मात्र उपेक्षितच राहिले.
No comments:
Post a Comment