आपला देश प्राचीन काळापासून सोन्याचा देश म्हणून ओळखला जातो. एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता किंवा रावणाची लंका सोन्याची बनली होती असे संदर्भ वारंवार आपल्याला वाचायला मिळतात. मात्र आपला देश सोन्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगात सर्वांत जास्त सोनं दक्षिण आफ्रिकेत आढळतं. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये जगातली सर्वांत मोठी सोन्याची खाण आहे. विटवॉटर्सरँड खोऱ्यातून जगाला सर्वांत जास्त सोनं मिळतं. आणि या खोऱ्याच्या 40 टक्के भागात अजूनही उत्खनन झालेलं नाही. सोन्याची जगातली दुसरी सर्वांत मोठी खाण भारतात आहे, जी दक्षिण कर्नाटकमध्ये कोलार जिल्ह्यात आहे. सध्या 2003 पासून येथील खाण बंद आहे.
कर्नाटकाच्या हुट्टी आणि उटीमध्ये आणि झारखंडच्या हिराबुद्दिनी येथेही खाणी आहेत, मात्र गेल्या काही वर्षांपासून या तीनही खाणींमधलं उत्खनन कमी झालं आहे. त्यामुळे भारताला आता सोनं आयातीवर अवलंबून राहावं लागतं. याशिवाय अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमधील खाणींत बरंच सोनं सापडतं. भारतात सर्वांत जास्त सोनं मंदिरांमध्ये आहे. केरळच्या तिरुवनंथपुरममधील पद्मनाभस्वामी मंदिरात नेमकी किती धन आहे, याचा नेमका अंदाज अजून कोणालाच नाही. पण 2011 मध्ये कोर्टाच्या आदेशानंतर जेव्हा मंदिराचा खजिना उघडला गेला त्यात सोन्याच्या मूर्ती, भांडी, दागिने, नाणी आणि मौल्यवान रत्नं सापडली. त्याची किंमत जवऴपास 100 अब्ज आहे. या खजिन्यातील एक तिजोरी अजून उघडण्यात आलेलीच नाही. आंध्र प्रदेशच्या तिरुपती बालाजी मंदिरामधल्या सोन्याचा साठा सर्वश्रूत आहे. गेल्या वर्षी तिरुपती बालाजी मंदिरानं 1 हजार 311 किलो सोनं पंजाब नॅशनल बँकेत जमा केलं होतं. आकडेवारीनुसार भारताकडे तब्बल 600 अब्ज डॉलर्स किमतीचं सोनं आहे. आणि भारत सरकारने यातला मोठा भाग नागपूरच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात साठवला आहे. भारत जगातील सोन्याची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. भारताची सोनं उत्पादन क्षमता जरी कमी असली तरी जास्तीत जास्त सोनं आयात करून आणि त्याची विक्री करुन भारत जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ बनला आहे. सोनं म्हटलं की फक्त दागिने आठवत असले तरी जगभरात जास्तीत जास्त सोनं हे नाणी आणि बिस्किटांच्या स्वरुपात साठवलं जातं. युरोपात आणि अमेरिकेत सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. सोन्याची किंमत लंडनमधून ठरते. 'लंडन बुलियन मार्केट'मध्ये ज्या दिवशी व्यवहार सुरू असतात त्यादिवशी दोन वेळा सोन्याची किंमत ठरवली जाते -- लंडन वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता आणि दुपारी 3 वाजता ही किंमत ठरवली जाते. या पद्धतीला 'लंडन गोल्ड फिक्स' म्हणतात. अशा पद्धतीने ठरवलेल्या सोन्याच्या दराला जगभरातील इतर मार्केट्समध्ये मान्यता आहे.
No comments:
Post a Comment