भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ
(स्मृतिदिन - २८ जुन १९९८)
डॉ.कमला माधव सोहोनी यांचा जन्म बंगळुरूला झाला. योगायोग म्हणजे याच वर्षी त्यांचे वडील नारायण भागवत यांनी बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून रसायनशास्त्र घेऊन एम. एस्सी. केली होती. नुकत्याच सुरू झालेल्या या इन्स्टिट्यूटमधील पहिल्याच तुकडीत नारायणरावांनी प्रवेश मिळवला होता आणि एम. एस्सी. मिळवली. १९१९ साली पत्नीच्या निधनानंतर मुलांसह ते मुंबईत आले. त्यांच्या कन्या दुर्गाबाई भागवत या प्रसिद्ध मराठी लेखिका म्हणून नावाजल्या, तर कमला सोहोनी यांनी रसायनशास्त्रातील शास्त्रज्ञ म्हणून नाव कमावले.
कमला मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून रसायनशास्त्र आणि भौतिकी विषय घेऊन बी.एस्सी. झाल्या आणि मुंबई विद्यापीठातून पहिल्या वर्गात, पहिल्या आल्या. त्यांना ‘सत्यवती लल्लुभाई सामळदास शिष्यवृत्ती’ आणि जुन्या मुंबई प्रांताची टेक्निकल रिसर्च स्कॉलरशिप मिळाली. त्यानंतर त्यांनी वडिलांसारखेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम. एस्सी. करण्यासाठी अर्ज टाकला, पण त्यांना प्रवेश नाकारला गेला. याविषयी शहानिशा करण्यास वडिलांनी कमलाबरोबर बंगळुरूला जाऊन इ़न्स्टिट्यूटच्या संचालकांची - नोबल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांची भेट घेतली. त्यांनी ‘‘ती मुलगी आहे म्हणून आम्ही प्रवेश नाकारला,’’ असे सांगितले. तेव्हा कमलाने उत्तर दिले की, ‘‘तुम्ही मला प्रवेश नाकारून माझ्यावर आणि माझ्यानंतर येणार्या मुलींवर अन्याय करीत आहात. मी मुंबईला परत जाणार नाही. येथेच तुमच्या दारापुढे बसून सत्याग्रह करीन’’. हे ऐकून डॉ. रमण चमकले पण म्हणाले की, ‘‘मी तुला प्रवेश देईन पण एका अटीवर; वर्षभर तात्पुरता प्रवेश देऊन काम ठीक असेल तरच प्रवेश पक्का करीन, नाहीतर तुला काढून टाकीन.’’ कमलाने ते मान्य केले आणि वर्षभर श्रीनिवासय्यांच्या हाताखाली उत्तम काम करून डॉ. रमणकडून वाहवा मिळवली. कडधान्ये, दूध यांतील प्रथिने वेगळी करून त्यांचे अमिनो आम्लात पृथक्करण यावर त्यांनी संशोधन केले आणि त्या कामावर १९३६ साली त्यांनी एम. एस्सी. मिळवली. त्यानंतर वर्षभर त्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये होत्या. त्या वेळी त्यांना मुंबई विद्यापीठाच्या दोन शिष्यवृत्त्या-‘सर मंगळदास नथुभाई’ आणि ‘स्प्रिंगर रिसर्च स्कॉलरशिप’- मिळाल्या. त्याआधारे केंब्रिज विद्यापीठात दाखल होऊन त्यांनी १९३९ साली पीएच.डी. मिळवली. त्यांनी वनस्पतीतील सायटोक्रोमचे अस्तित्व शोधून मूलभूत संशोधन केले. त्याबद्दल नोबल पुरस्कार विजेते डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी पण त्यांच्या कामाची वाखाणणी केली.
१९३९ साली दिल्लीच्या लेडी हार्डिंग्ज महाविद्यालयात त्या जीवरसायनशास्त्र शिकवत होत्या. डॉ. सुशिला नायर यांनी डॉ. कमलांच्या हाताखाली ‘रक्तातील कोलेस्टेरॉल व निरनिराळ्या दुखण्यांत त्याचा होणारा प्रभाव’ यावर संशोधन केले. डॉ. सुशिला नायर यांनी नंतर म. गांधींबरोबर काम केले आणि त्या स्वतंत्र भारताच्या आरोग्यमंत्री झाल्या. १९४२ साली डॉ. कमला कुन्नूर येथील पोषण संशोधन प्रयोगशाळेच्या उपसंचालक झाल्या. येथे त्यांनी जीवनसत्त्वावर संशोधन केले.
सप्टेंबर, १९४५ साली त्यांचा विवाह डॉ. माधव सोहोनी यांच्याशी झाला आणि त्या मुंबईत स्थायिक झाल्या. त्या वेळचे मुंबई नगरपालिकेचे आयुक्त बलसारा होते. त्यांनी डॉ. कमला सोहोनींना मुंबई नगरपालिकेत पब्लिक अॅनॅलिस्टचे काम दिले. येथे दोन वर्षांनी त्यांनी मुंबईच्या रॉयल इ़न्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये जीवरसायनशास्त्र विभाग सुरू केला आणि त्याच्या त्या विभागप्रमुख झाल्या. त्यांच्या हाताखाली १० पीएच.डी. चे विद्यार्थी संशोधन करीत होते. तसेच, डॉ. मगर हे व्याख्यातेही डॉ. कमलांना संशोधन आणि प्रयोगशाळा सुसज्ज करण्यास मदत करायचे. या दोघांनी ‘नीरा’ या भारतीय पेयाची पौष्टिकता आणि कडधान्यातील ‘टिप्सिन इनहिबिटर्स’ यांवर संशोधन केले.
डॉ. कमलांना हाफकिन संस्थेच्या पुनर्रचना समितीवर नेमेले गेले आणि त्यांनी संशोधन आणि उत्पादन विभाग वेगवेगळे करण्याचा सल्ला १९६० साली दिला आणि त्याप्रमाणे आजही हे दोन विभाग वेगळे आहेत. बडोद्यात महाराज सयाजीराव विद्यापीठात जीवशास्त्राचा विभाग सुरू करण्यास त्यांनी मदत केली. त्या इतर अनेक विद्यापीठांच्या समित्यांवर सल्लागारम्हणून होत्या.
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांच्या सांगण्यावरून त्यांनी ताड, माड, शिंदी आणि खजूर या चार प्रकारच्या पाम वृक्षांतील नीरेचे संशोधन केले आणि त्यांच्या या संशोधनाचा गौरव १९६० साली डॉ. राजेंद्रप्रसादांच्या हस्ते, सर्वोत्कृष्ट संशोधनाचे पदक देऊन केला गेला.
१९४२-१९४३ साली आरे कॉलनीची स्थापना झाली. पूर्वी आरेचे दूध काचेच्या बाटलीतून सील करून वितरित व्हायचे. दिनकर देसाई शिक्षणमंत्री असताना, आरेच्या सीलबंद बाटलीतील दुधात अळ्या सापडल्या आणि त्याचे पर्यवसान शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीत झाले. श्री. देसाईंनी हे कोडे उलगडण्याकरिता डॉ. कमला सोहोनींना पाचारण केले. त्यांनी सर्व निरीक्षणांती निष्कर्ष काढला, की ग्राहकांनी परत केलेल्या रिकाम्या बाटल्या न धुतल्यामुळे त्यांत माशा, किडे अंडी घालतात ते दिसत नाही. अशा बाटल्यांत दूध भरल्यामुळे अंड्यांतून बाहेर आलेल्या अळ्या दुधात सापडल्या. त्यामुळे रिकाम्या बाटल्या स्वच्छ धुवून देणे ही अट ग्राहकाला घातली गेली.
डॉ. कमला सोहोनी १९६५ ते १९६९ या चार वर्षांसाठी भारतीय विज्ञान संस्थेच्या (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) संचालिका होत्या. या संस्थेच्या त्या पहिल्या महिला संचालिका होत्या. त्यांनी तडफदारपणे काम केले आणि योग्य निर्णय घेतले. १९६९ साली त्या निवृत्त झाल्या. त्यानंतर कमला सोहोनी जवळजवळ २७ वर्षे ग्रहक चळवळीतर्फे भेसळ प्रतिबंधाचे काम पाहिले. विद्युत उपकरणांवर भारतीय मानकाचा शिक्का असायला हवा, याचा त्यांनी आगह धरला. १९७४ साली मराठी विज्ञान परिषदेतर्फे तळेगावला त्यांचा सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment