Thursday, 4 June 2020

शिवराज्याभिषेक दिन

छत्रपती शिवाजी महाराजांना समजण्याकरिता त्यांनी युद्धात वापरलेले गनिमी कावा, त्यावेळेस त्यांनी अनुकरलेले राजकारण, समाजकारण, कामांचे नियोजन, दूरदृष्टीने विकसित प्रगतीशील कार्यप्रणाली हे समजणे महत्त्वाचे आहे. आयुष्यात जर कुणी व्यक्ती उद्दिष्टाविना जगला तर तो वायफळ चर्चा, उपद्व्याप प्रसंगी व्यसनाधीन होतो. पण जीवनातील उद्दिष्ट ठरले आहे आणि ते कमी वयात ठरवले, ते साध्य करण्याकरिता योग्य मार्गदर्शक मिळाले तर कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळतेच.
याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे, राजमाता जिजाऊ यांनी शिवबांना ठरवून दिलेले स्वराज्यचे उद्दिष्ट आणि ते साध्य करण्यासाठी लागणारी पूर्ण तयारी, त्याकरिता आखून दिलेले नियोजन, याच नियोजनचा एक भाग म्हणून राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना, वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी युद्धकौशल शिकण्यासाठी पुण्याला पाठवले. आपला शत्रू बलाढय़ आहे, त्या तुलनेत आपण नाममात्र आहो तरीही त्यावर आपण मात करू शकतो ही मानसिकता बनविण्यासाठी त्यांनी शिवरायांना बाळकडू पाजले. सर्वात महत्त्वाचे जिजाऊ साहेबांनी महाराजांना आपल्या संस्कारात अगदी मुळापासून बीज रोवले ते म्हणजे चारित्र्य संपन्नतेचे. अनेक पराक्रमी राजे इतिहासात होऊन गेले, पण पराक्रमाला चारित्र्य संपन्नतेची जोड असणारे बोटावर मोजण्याइतकेच, त्यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख सर्वप्रथम होतो. परकी स्त्री आईसमान असते, तिच्यावर वाईट नजरेने पहायचे नाही, वाईट नजरेने पाहणार्‍याला मग तो कुणीही असो कडक शिक्षा देऊन, इतरांना तसे करण्याचा मनात विचारही न आणण्याइतपत कठोर कायदा महाराजांनी बनविला. तशा कायद्याची आजच्या घडीला आवश्यकता आहे. इतिहासात महाराज्यांच्या चारित्र्य संपन्नतेचे अनेक दाखले आढळतात आणि त्याचा सकारात्मक परिणाम रयतेवर झाला.
अफाट मोगलाईविरुद्ध लढायचे असेल तर मनापासून काम करणार्‍या, प्रसंगी प्राणाचे बलिदान देणार्‍या सकारात्मक विचारांची माणसे एकत्र आणणे आवश्यक आहे, हे महाराजांनी त्यावेळेस ओळखले. एकाच विचाराने, एकाच ध्येयाने प्रेरित झालेले, स्वत:ला त्यात झोकून देणारे मावळे त्यांनी एकत्र आणले. हे काम त्या परिस्थितीत सोपे नव्हते. महाराजांनी प्रत्येक मावळ्याला विश्‍वासात घेतले, दर्‍याखोर्‍यात राहणारा मावळ्याला शिवबा आपला वाटावा एवढे प्रेम महाराजांनी मावळ्यांवर केले, त्यांची काळजी घेतली, त्यांच्यावर मायेची फुंकर घातली. कुणाला भाऊ वाटावा, कुणाला बाप वाटावा तर कुणाला मित्र वाटावा, तर कुणाला खुद्द देवच वाटावा अशी स्वराज्याची मोहिनी प्रत्येकाच्या मनात महाराजांनी तयार केली, त्याचीस फलर्शुती हिंदवी स्वराज्य म्हणजेच रयतेचे राज्य साकारले, जे स्वराज्याच्या प्रत्येकाला आपले वाटायचे. महाराज यातून एक शिकवण देऊन जातात-कार्य कितीही अवघड असू देत,पण तुम्ही योग्य मित्रांची पारख करून त्यांना आपल्या कार्यात सहभागी केले तर यश नक्कीच मिळते.
महाराजांची तल्लख बुद्धी,चातुर्य हे इतिहासात क्षणोक्षणी आपणाला पाहायला मिळते, मग तो अफजलखानच्या वध असू दे, शाहिस्तेखानची बोटे कापून दहशत निर्माण करण्याचा प्रसंग असू दे, बहादूर खानला मूर्ख बनवून त्याचा खजिना लुटण्याचा प्रसंग असू दे, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग असू दे, उंबरखिंडीतील गनिमी कावा असू देत. अशा अनेक प्रसंगात महाराज हे इतर राजांहून वेगळे रसायन होते, असे दिसते. इतर कोणत्याही समकालीन राजाशी त्यांची तुलना केल्यास छत्रपती शिवाजी महाराज हे सरस कसे ठरतात, हे सांगणारे भारतातीलच नव्हे तर परदेशातीलही विद्यार्थ्यांचे पीएच. डी.चे शोधप्रबंध आहेत. आजच्या घडीला अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात एम.बी.ए.च्या अभ्यासक्रमात शिवाजी मॅनेजमेंट गुरू आहे, पाकिस्तानच्या अभ्यासक्रमात महाराजांचा आदर्श राजा म्हणून उल्लेख आहे. व्हिएतनाम एक छोटसे राष्ट्र जे बलाढय़ अमेरिकेशी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहे त्यांचे प्रेरणास्रोत छत्रपती शिवाजी महाराजच आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जा असणारे, भारतीय नौदलाचे संस्थापक, द्रष्टा राजा म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्यांच्या गडकिल्याची अवस्था आज वाईट आहे, ती बघवत नाही. गडकिल्यांची काळजी घेणे, त्याला जपणे ही जबाबदारी जेवढी पुरातत्व विभागाची पर्यायाने प्रशासनाची जेवढी आहे तेवढीच आपलीही आहे,आपला इतिहास जिवंत राहणे गरजेचे आहे. अठरापगड जाती एकत्र करून आजच्याच दिवशी स्वराज्य निर्माण करणार्‍या आणि लोकशाहीची प्रेरणा देणार्‍या स्वयंभू राज्याला स्मरण करून शिवराज्याभिषेकच्या शुभेच्छा.

No comments:

Post a Comment