Tuesday, 23 June 2020

सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ:स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्र विश्वनाथबाबू दत्त ऊर्फ नरेन यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरीदेवी यांच्या पोटी कोलकाता इथं सिमुलीया भागात झाला. नरेंद्रचे वडील कोलकाता उच्च न्यायालयात एटर्नि  होते. विश्वनाथ आणि भुवनेश्वरी देवी दोघंही कृती करणारे सुधारक होते. कालबाह्य रूढींना त्यांनी झुगारून लावलं होतं.
मोठेपणी जगाला शांततेचा संदेश देणारे नरेंद्र लहानपणी मात्र खूप खोडकर आणि रागीट होते. 1871 साली पं. ईश्वराचंद्र विद्यासागर यांच्या शाळेत नरेंद्र जाऊ लागला. शाळेतला तीन वर्षांचा अभ्यासक्रम त्यानं एकाच वर्षात पूर्ण केला होता.
तसंच वयाच्या सोळाव्या वर्षी प्रवेश परीक्षेत तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. त्याला दर्शनशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, कला, साहित्य ,संगीत अशा अनेक विषयांमध्ये रुची होती. नरेंद्रनं शास्त्रीय गायन आणि वादन यांचं शिक्षण घेतलं होतं. गायनाबरोबरच तबला, पखवाज, इसराज आणि सतार ही वाद्यंही तो कुशलतेने वाजवत असे. तसेच वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, तत्त्वज्ञान यांचा सखोल अभ्यास होता. नरेंद्रनं प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचा अभ्यास केला होता. 1884 साली नरेंद्रनं इंग्रजी, गणित, इतिहास, तर्कशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांचा अभ्यास करून बीएची पदवी मिळवली. प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यानं तत्त्वज्ञान विषयात एमए केलं.  नरेंद्र व्यायाम, मैदानी खेळ, वाचन, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणं, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध यातही प्राविण्य मिळवलं होतं.
पुढे नरेंद्रचं लग्न ठरलं. सासरे त्यांना मुलीसह वकिलीचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला पाठवणार होते. सगळं व्यवस्थित असताना अचानक नरेंद्रचे वडील विश्वनाथ यांचं निधन झालं. यानंतर त्यांच्या वाट्याला उपेक्षित जगणं वाट्याला आलं. त्यांना राहतं घर सोडावं लागलं. याच काळात नरेंद्रचे गुरू श्रीरामकृष्ण परमहंस यांचा अपघातात हात मोडला. त्यांना भेटायला जाणं, कायद्याचा अभ्यास करणं नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणं नरेंद्र करत होता. दिवसा मिळेल ती नोकरी आणि रात्री एखाद्या मित्राकडे अभ्यास करणं असं नरेंद्र करत होता. उपाशीपोटी घरी आल्यावर आपण जेवून आलोय असं सांगून कित्येक रात्री नरेंद्रनं पाणी पिऊन काढल्या.
याच दरम्यान नरेंद्रनं सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक समता स्थापन करण्याच्या दृष्टीने वराहनगर मठाची स्थापना केली. या दिवसांत त्यानं संन्यस्त जीवनाला प्रारंभ केला.नरेंद्र वेदान्ताचा अभ्यास करण्यासाठी सहा वर्षे हिमालयात जाऊन राहिला. तसंच वर्षभर तिबेटमध्ये राहून बौद्ध धर्माचाही अभ्यास केला. भाषा, प्रांत,पंथ, जात,धर्म यांची सगळी बंधनं झुगारून दिली. खेत्री संस्थानचा राजा अजितसिंह यांचं नरेंद्र मार्गदर्शन घेत असे. त्यांनीच 10 मे1893 रोजी नरेंद्रचे विवेकानंद असे नामकरण केले. पुढे संपूर्ण जग त्यांना स्वामी विवेकानंद याच नावाने ओळखायला लागलं.
11 सप्टेंबर1893 या दिवशी अमेरिकेतल्या शिकागो शहरात भरलेल्या सर्वधर्म परिषदेतील स्वामी विवेकानंद यांचे भाषण गाजले. 'अमेरिकेतल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो... ' ही इतिहास प्रसिद्ध भाषणाची सुरुवात इथेच झाली आणि विवेकानंद यांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली. तिथे त्यांनी अनेक व्याख्यानं दिली,ती खूप गाजली. विवेकानंदांनी राजयोगावर लिहिलेलं पुस्तक 1896 साली टॉलस्टॉय यांनी वाचलं. 'आधुनिक भारताचा सर्वात श्रेष्ठ तत्त्वज्ञ कोण असेल तर तो विवेकानंद होय', अशा शब्दांत त्यांनी विवेकानंद यांचं कौतुक केलं. त्यांच्या आधुनिक आणि प्रागतिक दृष्टिकोनाचं अनेकांनी कौतुक केलं. त्यांनी विपुल लेखन केलं.
विवेकानंद काळाच्या पुढे बघणारे होते. यंत्रयुग, चंगळवाद, पर्यावरणाची हानी अशा विषयांवर त्यांनी त्यावेळी धोक्याची सूचना दिली होती. अति पैसा खरा आनंद कसा हिरावून घेईल,हेही ते सांगत. मी केवळ हिंदुस्थानचा नाही, तर संपूर्ण जगाचा आहे, असे ते म्हणत. संपूर्ण भारत भ्रमण करून त्यांनी लोकांचे दुःख जाणून घेतले. 4 जुलै 1902 रोजी कोलकात्याजवळच्या बेलूर मठात वयाच्या 39 व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली.

No comments:

Post a Comment