Tuesday, 23 June 2020

●●जागर-जागरण●●


नव तंत्रज्ञान
रोबोट्सचा वाढता वावर
एक काळ असा होता की, रोबोट्स फक्त विज्ञानकांमध्ये असायचे. पण आता आपल्या आजूबाजूला हळूहळू
रोबोट्स दिसायला लागले आहेत. रेस्टॉरंट्स, काही बँका, मॉल इथे रोबोट्सना पहायला गर्दी जमते. रुग्णांची काळजी घ्यायला हॉस्पिटल्समध्ये रोबोट्सचा वावर वाढायला लागला आहे. यातले बरेच रोबोट्स कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतात. त्यांना काही साध्यासाध्या गोष्टींचं ट्रेनिंग अगदी सहज देता येते. ट्रेनिंग आणि मग निरीक्षण यांच्या मदतीने हे रोबोट्स कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर निर्णय घेऊ शकतात. हॉस्पिटलमध्ये निर्जतुकीकरण करणे, किंवा रुग्णांना वेळेवर औषध देणे, त्यांचं तापमान घेणं असं करत असताना त्यांच्या अनुभवात भर पडत जाते. या अनुभवावरून त्यांचा प्रतिसाद अधिकाधिक सुधारत जातो. अनुभवातून शिकत जाणं हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्त्वाचं लक्षण आहे आणि त्यासाठी योग्य ते ट्रेनिंग देणं हे तंत्रज्ञांसाठी अत्यंत कौशल्याचं काम आहे.
पण उद्या रोबोट्सचा वापर खूप वाढणार आहे. विशेषतः जिथे सोशल डिस्टन्सिंग पाळायचे आहे तिथे रोबोट्सचा पर्याय आश्वासक आहे. त्यामुळे बुद्धिमान रोबोट्सचं उत्पादन झपाट्याने वाढेल. अशा वेळी रोबोट्सना पद्धतशीर ट्रेनिंग देण्याचं जुने तंत्र कदाचित अपुरे पडेल. म्हणून रोबोट्स केवळ निरीक्षणातून शिकतील का, यासाठी एमआयटी (मॅसॅच्युसेट्स इनस्टट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)मध्ये अलिकडे काही संशोधक काम करत आहेत. माणसांचेही निरीक्षण करणार निरीक्षणासाठी रोबोट्स आज अगदी उच्च दर्जाचे काटेकोर कॉम्प्युटर व्हिजन वापरतात. त्यातून नोंदलेल्या घटनांचे विश्लेषण करायचे. बारीकसारीक सगळ्या कृतींचा अर्थ लावायचा. हे ज्ञान साठवून ठेवायचं. आणि मग आवश्यक असेल तेव्हा गुंतागुंतीची तर्कप्रणाली वापरून संदर्भानुसार योग्य ती कृती करायची- अशी या संशोधनामागची संकल्पना. त्यासाठी संशोधकांच्या या चमूने टेबलवर जेवणासाठी ताटवाट्या यांची मांडणी करायची कृती निवडली. काचेचा ग्लास. उभट मग. छोटी आणि मोठी प्लेट. वाटी. काटा, सुरी आणि चमचा अशा एकूण आठ वस्तू टेबलवर योग्य जागेवर मांडायच्या होत्या. आणि हे शिक्षण घेणार होता एक रोबोटिक आर्म. अर्थात, त्याला निरीक्षणासाठी नजर. म्हणजे कॉम्प्युटर व्हिजन होते हे वेगळे सांगायला नको. संशोधक मंडळीनी या वस्तू या रोबोटिक आर्मसमोर क्रमाक्रमाने मांडल्या.

व्यक्तिविशेष

ऍड. उज्ज्वल निकम
ऍड. उज्ज्वल निकम यांचा जन्म 30 मार्च 1953 ला जळगावला झाला. जन्माच्या दिवशी तिथीने हनुमान जयंती होती. जन्माची पहाटेची वेळ आणि जन्मल्याबरोबर बाळाच्या रडण्याचा खणखणीत आवाज ऐकून डॉक्टर म्हणाले,"हा हनुमानच जन्मला आहे आणि आयुष्यात फार मोठी झेप घेणार आहे." डॉक्टरांचे हे बोल ऍड. निकम यांनी आपल्या कर्तृत्वाने अगदी खरे केले. ऍड. उज्ज्वल यांचे वडील, बॅरिस्टर देवराय निकम हे प्रसिध्द कायदेतज्ज्ञ आणि आई विमलादेवी यांचा स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यात सक्रिय सहभाग होता. उज्ज्वल हेही लहानपणापासून अतिशय धाडसी व निर्भीड होते. त्यांचे वडील शिस्तीचे भोक्ते होते, पण त्यांची शिस्त जाचक नसे. त्यांना वडिलांबद्दल आदरयुक्त धाक होता. वडिलांसोबत उज्ज्वल यांचे अगदी मैत्रीचे नाते होते. प्रभावी संभाषण, वाकचातुर्य आणि बुद्धिमत्ता यांचा मिलाप उज्ज्वल यांच्यामध्ये लहानपासून आहे. वडिलांसोबत ते इतर शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांना जात असत. उज्ज्वल यांना डॉक्टर व्हायचं होतं. त्यांनी दिल्ली मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतली होतीसुद्धा. परंतु अनोळखी वातावरण आणि खाण्यापिण्याचे फार हाल होत. त्यामुळे शेवटी त्यांनी कॉलेजला रामराम ठोकून जळगाव गाठले. नंतर त्यांनी लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. आज ते खतरनाक गुन्हेगारांविरुद्ध लढणारे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे विशेष सरकारी वकील आहेत. अनेकांना त्यांच्यामुळे शिक्षा मिळाली आहे. सतत काही ना काही नवीन करण्याची त्यांची वृत्ती आहे. गुन्हेगारांना जरब वाटावी, असा नावलौकिक त्यांनी मिळवला आहे. त्यांना पद्मश्री हा किताब मिळाला आहे.

सिनेमा
बिनधास्त, बंडखोर कंगना
गॉडफादर नसताना हिंदी चित्रपटसृष्टीत येणं आणि स्वतःला सिद्ध करत स्वतःचं स्थान निर्माण करणं हे अजिबात सोपं नाही. पण हे करून दाखवलं आहे, कंगना राणावतने! कंगना म्हणजे एक बिनधास्त, बंडखोर अभिनेत्री. आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर चित्रपट हिट करून दाखवणारी बॉलिवूडची 'क्वीन'. मात्र इथे कंगना आणि वाद असंही समीकरण झालं आहे. स्पष्टवक्त्या स्वभावामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या अभिनेत्यांना या 'क्वीन'नं आव्हान दिलं आहे. आपल्या बेधडक स्वभावामुळे तिने अनेक वाद निर्माण केले आहेत तर कधी ओढवून घेतले आहेत. आपल्या अभिनय क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्यामुळे 'क्वीन', 'तनू वेड्स मनू', 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' हे चित्रपट एकटीच्या बळावर लोकप्रिय करण्याची किमया तिनं साधली. हिमाचल प्रदेशातील एका लहानशा गावातून आली असली तरी तिला घरून पहिल्यापासूनच स्वातंत्र्य होतं. आजोबा खासदार, वडील व्यावसायिक, आई शिक्षिका, अशा सर्वच क्षेत्रात प्रगत असलेल्या कुटुंबातून ती आली आहे. लहानपणापासून बंडखोर असलेल्या कंगनाने करिअर म्हणून अभिनयाचं क्षेत्र निवडलं. अवघ्या 17 व्या वर्षी 'गँगस्टर' मधून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. पहिल्याच चित्रपटात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार तिने पटकावला. त्यानंतर 2006 मध्ये आलेल्या 'वो लमहें' चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. 'शाकालाका बूम बूम' हा चित्रपट आपटला. या चित्रपटातील तिचा आवाज अन्य एका अभिनेत्रींच्या आवाजात डब केल्याने तिचा आणि दिग्दर्शक सुनील दर्शनशी वाद झाला. 'लाईफ इन अ मेट्रो' चित्रपटात अन्य कलाकार असतानाही अनेकांना तिच्या कामाची दखल घ्यावी लागली. या भूमिकेसाठी तिला 'स्टारडस्ट' पुरस्कारही मिळाला. 2008 मध्ये आलेला 'फॅशन' हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील लँडमार्क. यातील भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'राज द मिस्ट्री कंटीन्यू' ,'काईटस' हे तिच्या फेवरेट भट्ट कंपनीचे चित्रपट आपटले तरी तिला 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' या चित्रपटानं तारलं. 2011 मधील ' तनू वेड्स मनू' मधून तिचा बोलबाला कायम राहिला. पण नंतर तिच्या कारकिर्दीला ओहोटी लागली. 'गेम', 'डबल धमाल', 'रासकल्स', 'मिले ना मिले हम', 'तेज', 'रज्जो' अशा पडेल चित्रपटांची नावे तिच्या खात्यावर पडली. याच काळात तिच्या वैयक्तिक आयुष्यातही वादळं आली. मात्र 2014 तिच्यासाठी पुन्हा लकी ठरलं. 'क्वीन' हा चित्रपट तिच्यासाठी मैलाचा दगड ठरला. आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर तिने दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. तनू वेड्स मनू याचा पार्ट2 गाजला. रंगून, सिमरन हे चित्रपट आपटले.

विचार
मैत्री जपताना
मैत्री ही निस्वार्थ नात्यावर टिकते. काळजी घेणारा आणि सतत मदत करणारा हा खरा मित्र असतो. आपल्या जीवनातील चढउतार मित्रांबरोबर शेअर केला तर तो भावनिकदृष्ट्या तो मित्र आणखीच जोडला जातो. अशा स्थितीत मित्र आपली अधिक काळजी घ्यायला लागतो. मित्राच्या आयुष्यातील अडचणी, प्रश्न जाणून घेण्याचा, ऐकण्याचा प्रयत्न करा. संकटकाळात त्याच्या पाठिशी खंबीरपणे राहा. अशा काळात मित्राला तुमची खरी गरज असते. अशावेळी पाठ फिरवली
तर मित्राचे नाते फार काळ टिकत नाही. मित्रालाही आपल्याकडून मदतीची, सहकार्याची आणि
आधाराची गरज असते. कधी कधी मित्र आपल्याला
अडचणी, प्रश्न सांगण्यास कचरतो. अशावेळी आपणच पुढाकार घेऊन त्याच्या अडचणी समजून घेणे
गरजेचे आहे. तो जर खूपच ताणतणावाखाली असल्याचे जाणवले तर त्याच्याशी बोलून मन हलके
करण्याचा प्रयत्न करा.  करिअरविषयक असो, आर्थिक असो किंवा कौटुंबिक असो. अशा स्थितीत आपण त्याचे पाठिराखे आहोत, अशी प्रतिमा मित्राच्या मनात निर्माण करा. कोणतेही ठोस कारण कळल्याशिवाय मित्राशी हुज्जत, वाद घालू नका. जीवनातील ताणतणावाविषयी मित्र आपल्याला काही बाबी सांगत असेल तर त्या शांतपणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. त्यावर मार्ग काढण्यासाठी पर्याय सुचवा. कोणत्याच निष्कर्षाप्रत चटकन पोचू नका. खचलेल्या मित्राला धीर द्या आणि तो या परिस्थितीतून बाहेर कसा पडेल, याचा विचार करा. मित्राने मिळवलेल्या यशाचे कौतुक केल्यास त्याच्या आनंदात आणखीच भर पडते. नवीन नोकरी मिळणे, बढती मिळणे, परदेश दौऱ्यासाठी निवड, एखाद्या स्पर्धेतील यश, नवीन घर, मोटार खरेदी आदी गोष्टी मित्राने साध्य केल्या तर त्याचे कौतुक करा. त्याचा आनंद आणखी द्विगुणित करण्याचा प्रयत्न करा. मित्राने दिलेली भेट किंवा कौतुक हे अन्य भेटवस्तूपेक्षा कैकपटीने संबंधिताला प्रिय असते.

सुविचार
जो आईची पूजा करतो, त्याची पूजा विश्व करते
अज्ञात

बोधकथा
सूज्ञ कोल्हा
एकदा एक कोल्हा शिकाऱ्यापासून आपला जीव वाचवत पळत होता. तेवढ्यात त्याला झोपडीबाहेर बसलेला एक गुराखी दिसला. “माझ्या मागे एक शिकारी लागला आहे. कृपया मला लपायला जागा द्या. कोल्हा विनंती करत गुराख्यास म्हणाला. शिकारी, हं? गुराखी म्हणाला. ठीक आहे, माझ्या झोपडीत लप जा. धन्यवाद कोल्हा म्हणाला. थोड्याच वेळात शिकारी तेथे पोहोचला. तुम्ही इकडून कुणा कोल्ह्यास जाताना पाहिले का? त्याने गुराख्यास विचारले. नाही. तुम्हाला खात्री आहे का? तो इकडेच गेला. आपला अंगठा झोपडीच्या दिशेने दाखवत तो गुराखी म्हणाला. पण त्या शिकाऱ्याला त्याचा इशारा काही कळला नाही. हो, नक्कीच, शिकारी मागे फिरत म्हणाला. कोल्ह्याला गुराख्याचा इशारा कळला होता. शिकारी निघून गेल्यावर तो झोपडीतून बाहेर आला. संकट टळलं आहे. आता मी माझ्या मार्गाने जातो. कोल्हा
गुराख्यास म्हणाला. किती कृतघ्न आहेस तू. मी तुझा
ऐवढा जीव वाचवला त्याबद्दल तू माझे आभारही मानत
नाहीस गुराखी रागाने म्हणाला. मित्रा! जर मी माझ्या
डोळ्यांनी पाहिले नसते की, तू इशाऱ्याने शिकाऱ्यास
माझे लपण्याचे ठिकाण दाखवत होतास ते व तू
प्रामाणिकपणे वागला असतास तर! मी तुझे निचितपणे
आभार मानले असते, कोल्हा असे म्हणून निघून गेला.
संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment