Wednesday, 1 July 2020

वसंतराव नाईक


वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी झाला. ते मराठी राजकारणी होते. डिसेंबर ५, इ.स. १९६३ ते फेब्रुवारी २0, इ.स. १९७५ कालखंडादरम्यान ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व एक कृषितज्ञ. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राज्यभार सांभाळला. वसंतराव नाईककांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्याश्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषविले होते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होते. हरित क्रांतीचे प्रणेते अशी त्यांची ओळख होती.
वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल.एल.बी. ही पदवीही मिळविली (१९४0). विद्यार्थिदशेत त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले व डेल कानेर्गी या दोहोंच्या विचारांची छाप पडली होती. तसेच महाविद्यालयात असताना त्यांचा स्नेह नागपूरमधील घाटे या प्रसिद्ध ब्राह्मण कुटुंबाशी जडला. या स्नेहातुनच पुढे त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह वत्सलाबाई यांच्याशी झाला (१९४१). या विवाहामुळे विदर्भात थोडी खळबळ उडाली व उभयतांना काही वर्षे आपापल्या घरांपासून अलिप्त राहणे अपरिहार्य झाले; पण वसंतरावांनी पूर्ण विचारान्ती हे लग्न केले होते. त्यांची वकिलीही ठीक चालली होती. वत्सलाबाई बी.ए. असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत. वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. हळूहळू त्यांचा वकिलीत जम बसू लागला व आर्थिक स्थितीही सुधारली तसेच त्यांची हळूहळू प्रतिष्ठाही वाढली. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३-४७). याशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (डिग्रस) ते अध्यक्ष होते. १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली (१९५१-५२). ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६-५२). पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२- ५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६0 मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या. प्रथमत: त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वत: फाशी जाईन असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला.
कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत असत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषत: महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय वसंतरावांकडेच जाते. २0 फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली आणि मार्च १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले. वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले. पुढे त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हेसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९७0 च्या दशकात मुंबईतील कम्युनिस्ट-नेतृत्वात कामगार संघटनांचे प्रतिउत्तर म्हणून शिवसेना उभी करण्याच्या त्यांच्या धोरणाला अनेक पत्रकार आणि राजकीय अभ्यासाचे तज्‍जञ, उजवे विचार पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उदयाचे श्रेय देतात.

No comments:

Post a Comment