अंधश्रद्धा जशी तुमच्या माझ्यात आहे,तशी अनेक लोकांमध्ये आहे.प्रत्येक क्षेत्रात आहे. मात्र क्रिकेटमधली अंधश्रद्धा जरा वेगळीच आहे. सर्वात अंधश्रद्धा याच क्षेत्रात असल्याचे बोलले जाते. विशिष्ट क्रमांकाची जर्सी वापरणे, १३ नंबर अनलकी असतो असे मानणे. १११ नंबर हा महावाईट असतो असे पूर्ण क्रिकेट विश्वाचे मत आहे. असे म्हणतात की, तो ३ बेल्स नसलेल्या स्टंप सारखा आहे. म्हणूनच अंपायर डेव्हिड शेफर्ड इंग्लंड संघ १११ वर आल्यास एका पायावर थांबायचे. ऑस्ट्रेलियामध्ये ८७ नंबरला सैतानाचा नंबर मानतात. स्टीव्ह वॉ आपले पूर्ण करिअर खिशात लाल रुमाल ठेवून खेळला. जयसूर्या बॅटिंग करताना प्रत्येक बॉल खेळण्यापूर्वी आपल्या बॅटवरून हात फिरवायचा.लसीथ मलिंगा सुद्धा बॉल टाकण्यापूर्वी अनेकदा बॉलचे चुंबन घेताना दिसलाय.
एवढंच नव्हे तर आपला सचिन तेंडुलकर दुसऱ्या देशात दौऱ्यावर असताना सलग फॉर्ममध्ये टिकून राहण्यासाठी रोज रात्री एकाच अन्नाचे सेवन करायचा असे म्हणतात. अशीच अंधविश्वासावर आधारित असलेली क्रिकेटविश्वातील एक गमतीशीर घटना आहे. १९७१ यावर्षी भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता. त्या वेळी वेस्ट इंडिजचा कॅप्टन होता गॅरी सोबर्स. हा गॅरी ज्यांच्या क्रिकेटविश्वातील योगदानामुळे आज सर्वांसाठी आदर्श खेळाडू बनले आहेत. जग त्यांना आता ‘सर गॅरी सोबर्स’ म्हणून ओळखते.तर टेस्ट मॅच सुरू असताना गॅरीने सुनील गावस्करचा स्लीपमध्ये दोन वेळा झेल सोडला.तसेच पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये फलंदाजीत काहीही प्रभाव पाडता आला नाही. एकंदरीत ही सिरीज गॅरी सोबर्ससाठी निराशाजनक ठरू लागली होती.तर दुसरीकडे याच टेस्ट सिरीजमधून सुनील गावस्करने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पहिल्या टेस्ट मध्ये गावस्कर खेळू शकला नव्हता पण दुसऱ्या टेस्ट मध्ये भारताच्या विजयात त्याचा मोठा हात होता. दोन टेस्ट मॅच पार पडल्या. तिसऱ्या मॅच मध्ये मात्र गॅरी सोबर्सला सूर सापडला आणि त्याने शतक ठोकले. वेस्ट इंडिजच्या आशा पल्लवित झाल्या. हाच सिलसिला सोबर्सने चौथ्या आणि पाचव्या टेस्ट मॅचमध्ये सुद्धा कायम ठेवला. तीन मॅचमध्ये तीन शतक काढण्याची हॅट ट्रिक!इकडे भारतीय संघात अस्वस्थता पसरली होती. पहिल्या दोन टेस्ट मध्ये चाचपडत खेळणारा गॅरी असा अचानक फॉर्म मध्ये कसा काय आला याचा विचार सगळे करत होते.अशातच सिरीजचा शेवटचा दिवस उगवला. भारतीय संघ १६६ धावांनी पिछाडीवर होता. गावस्कर आदल्या दिवशी नॉट आउट होता आणि लवकरच वेस्ट इंडिजची मैदानात उतरण्याची पाळी होती.सर्वांना गॅरीचा फॉर्म बघून आधीच धडकी भरली होती. आजही गॅरीने शतक ठोकले तर सिरीज हातातून गेली हे निश्चितच होते. मात्र सगळे चिंतीत असताना भारतीय संघाचा कॅप्टन मात्र निवांत दिसत होता. अजित वाडेकरने बराच विचार करून मनाशी काही आडाखे बांधले होते. आता त्याला कुणी योगायोगाचा भाग म्हणो अथवा अंधश्रद्धा पण, जे होतं ते खरंच होतं.अजितच्या असे लक्षात आले होते की, नेहमीच इनिंग सुरू होण्यापूर्वी गॅरी सोबर्स भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूम मध्ये येत असे. गॅरी तसा मैत्रीपूर्ण स्वभावाचा असल्याने त्याचे कुणाला काही विशेष वाटत नसे.तो येऊन सगळ्यांशी हसत खेळत बोलून जात असे. पण एक मात्र होतं, प्रत्येक वेळी गॅरी सोबर्स सुनील गावस्करच्या खांद्याला स्पर्श आवर्जून करत असे. अजितने आठवून पाहिले असता त्याच्या लक्षात हे सुद्धा आले की,ज्या ज्या वेळी गॅरीने शतक ठोकले त्या प्रत्येक वेळी त्याने सकाळी येऊन गावस्करच्या खांद्याला स्पर्श केला होता! आता कॅप्टन वाडेकरच्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली होती…तर नेहमीप्रमाणे शेवटच्या दिवशी सुद्धा गॅरी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूम मध्ये आला.तो आल्याबरोबर वाडेकरने सुनील गावस्करचे बकोटे धरले आणि त्याला सरळ बाथरूम मध्ये ओढत नेऊन तिथेच कोंडून बाहेरून दाराला टाळे लावले.कुणाच्या लक्षात येण्याआधीच हा प्रकार झाला. इकडे गॅरी सर्वांसोबत बोलत होता पण त्याचे डोळे मात्र त्याच्या ‘लकी मॅन’ ला शोधत होते. पण त्याचे लक तर बाथरूममध्ये कोंडले गेले होते. याची कल्पना वाडेकर सोडला तर दोन्ही संघालाही नव्हती.शेवटी मॅच सुरू होण्याची वेळ झाली तेव्हा अत्यंत नाईलाजाने गॅरी ड्रेसिंग रूम बाहेर गेला. तो बाहेर गेल्यावर वाडेकरने बाथरूमचा दरवाजा उघडला आणि आतून संतापलेला गावस्कर शिव्या देतच बाहेर आला. त्याला समजावता समजावता वाडेकरच्या नाकी नऊ आले.शेवटी गावस्कर कसाबसा शांत झाला खरा, पण त्याच्या खांद्याला स्पर्श करून गॅरी शतक करतो हा अंधविश्वास त्याला बिलकुल पटला नाही.मॅच सुरू झाली.. जेव्हा सोबर्स बॅटिंगसाठी मैदानात आला तेव्हा सर्वांनीच श्वास रोखून धरले होते. पहिला चेंडू पडला आणि… सोबर्स क्लिन बोल्ड बाय आबिद अली ! तीन शतक ठोकणारा गॅरी सोबर्स पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाला होता!गावस्करने आश्चर्यचकित होऊन वाडेकर कडे पाहिले. कॅप्टन अजित वाडेकर डोळा मारून गालात हसत म्हणाला, “बघ, तुला म्हणालो नव्हतो?”ती मॅच बरोबरीत सुटली पण सिरीज मात्र भारताने जिंकली! जर गॅरी खेळला असता तर कदाचित चित्र वेगळे असते. याला अंधश्रद्धा म्हणायचे की योगायोग म्हणायचा हे आता प्रत्येकाने आपल्या श्रद्धेनुसार ठरवावे.
No comments:
Post a Comment