महाराजांच्या कीर्तनाने आणि कार्याने असंख्य लोक प्रभावित झाले. महाराजांचे अनुयायी बनले होते. पण याचबरोबर दुसरीकडे काही विरोधकही निर्माण झाले. त्यांच्या लोकप्रियतेमुळे हे लोक अधिक चिडले. शेवटी हा माणूस ढोंगी असून बुवाबाजी करतो, लोकांची फसवणूक करतो असे पत्र या विरोधकांनी महात्मा गांधी यांना पाठवले. तेव्हा गांधीजींनी या महाराजांना स्वतः जवळ राहण्यासाठी बोलावून घेतले. महाराजांच्या सहवासाने व प्रतिभेने गांधीजी प्रसन्न झाले.भजन, किर्तनाने मंत्रमुग्ध झाले. ते महाराजांना पुन्हा पुन्हा भजन म्हणावयास लावत. या भजनाने गांधीजी इतके प्रभावित झाले की एकदा मौन सुटल्याचेही भान त्यांना राहिले नाही. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला 'यह हमारे संत तुकड्या बाबा ' म्हणून महाराजांची ओळख करून देत. हे महाराज म्हणजे महाराष्ट्रातील आधुनिक संत, भक्त व समाजसुधारक तुकडोजी महाराज.
अमरावती जिल्ह्यातील यावली गावी 30 एप्रिल1909 रोजी त्यांचा जन्म झाला. माणिक बंडोजी ठाकूर हे त्यांचे मूळ नाव. या ठाकूर घराण्याचे कुलदैवत म्हणजे पंढरीचा विठोबा.घरातील वातावरण भक्तीमय होते. यामुळे लहानपणापासूनच ध्यान, भजन, पूजन यांची गोडी त्यांना लागली. मराठी तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली. आजोळी वरखेड या गावी समर्थ अडकोजी महाराज हे शतायुषी संत होते. त्यांचा सहवास महाराजांना बालपणापासून लाभला. त्यांनी अडकोजी महाराजांना गुरू केले. इतर मुलांप्रमाणे सामान्य खेळ न खेळता एकतारी व खंजिरीवरून भजन म्हणणे, लोकांसमोर कीर्तन करणे हाच त्यांचा छंद होता. पुढे ते स्वतःच भजन, कीर्तनासाठी कविता रचू लागले. मराठी व हिंदी भाषेत असंख्य भजने, कविता त्यांनी रचल्या.
एके दिवशी गुरू महाराजांनी या माणिकला 'तुकड्या' म्हणून हाक मारली. माणिक जवळ आल्यावर ते म्हणाले,'तुका म्हणे, असे किती दिवस म्हणशील.'तुकड्या म्हणे' असे म्हणत जा. या प्रसंगानंतर 'तुकड्या म्हणे' या ओळीने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. यामुळे ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या चौदाव्या वर्षी रामटेकच्या जंगलात त्यांना कोणा एका महापुरुषाचे दर्शन झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी योग अभ्यास केला.वयाच्या सोळाव्या वर्षांपासून संतांच्या आणि तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी त्यांनी संपूर्ण भारताचा प्रवास केला.
'मनी नाही भाव, देवा मला पाव।
देव अशाने पावत नाही रे, देव काही बाजारातला भाजीपाला नाही रे।'
यासारख्या अनेक अभंगातून पारंपरिक अनिष्ट रूढी, भेदभाव, अंधश्रद्धा, ढोंगीपणा यासारख्या समाज घातक गोष्टींवर त्यांनी कठोर प्रहार करून ईश्वराचे विशुद्ध रूप लोकांसमोर मांडले. कीर्तने आणि खंजीराच्या माध्यमातून समाजसेवा करणे हेच त्यांचे ध्येय होते. सामाजिक सुधारणेबरोबर स्वातंत्र्य आंदोलनातही त्यांनी स्वतःला झोकून दिले. सन 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी आपल्या वणीची तोफ डागली.
'गुलामीसे नहीं बनता। धर्म का शास्त्रावत पालन।।
पहिले तो देश अपनालो।करो फिर धर्म का जपना।।'
हा संदेश देत धर्मजागराणेबरोबरच राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी "जागो उठो बलवीरो, अब तुम्हारी बारी हैं" ही ललकारी दिली. "झुठी गुलामशाही का क्या डर बनाती है?" अशी अनोखी राष्ट्रीय भजने गाऊन सत्याग्रहींना प्रोत्साहित केले.
या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल महाराजांना सहा महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा झाली. मात्र तुरुंगात असतानाही महाराजांची दिनचर्या आदर्शवत अशीच होती. इतर बंदींनाही त्यांनी तसेच धडे दिले. प्रार्थना, भजन यात खंड पडला नाही. या काळात तुरुंगाचे मुख्य अधिकारी येऊन त्यांचे दर्शन घेऊन जात. ते महाराजांना म्हणत,'उगीच आलात आपण!त्यामुळे बंदी लोकही भजनच करतात. मात्र तुम्ही आलात ते आमच्या दृष्टीने चांगले झाले.आमचे भाग्य म्हणून आम्हाला तुमचे रोज दर्शन घडते.' या काळात त्यांनी 'सुविचारस्मरणी' हा ग्रंथ लिहिला.
महात्मा गांधी बरोबरच पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ.राजेंद्र प्रसाद, विनोबा भावे हे तुकडोजींच्या कार्याने प्रभावित झाले होते.
पंडित नेहरू यांनी 1955 मध्ये जपानमधील विश्वधर्मशांती परिषदेसाठी या राष्ट्र संतास भारताचे प्रतिनिधी म्हणून पाठविले होते. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय एकात्मतेचा व विश्वशांतीचा संदेश आपल्या मधुर आणि प्रभावी शब्दांतून दिला. भारतीय पंचशील तत्त्वांचे दर्शन जगास घडविले.
साने गुरुजींची हरिजन मंदिर प्रवेशाची चळवळ असो की विनोबांची भूदान चळवळ तुकडोजी समाज उद्धाराच्या सर्व कार्यात हिरीरीने सहभागी होत. अस्पृश्योद्धार, जातीभेद निर्मूलन यासाठी त्यांनी समाज जागृती केली. शेतकऱ्यांसाठी भारतीय किसान रेल यात्रा काढली. याचबरोबर भारत-चीन युद्धाच्यावेळी प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन त्यांनी सैनिकांना प्रेरणा व प्रोत्साहन दिले. स्वतः रक्तदान करून सैनिकांना धीर दिला. देशभक्तीची प्रेरणा दिली. कोयना भूकंप आणि धरणग्रस्तांची दुःखे व अश्रू पुसण्यासाठी तुकडोजी तिथे गेले. स्वातंत्र्यांनंतर ग्रामनव निर्माणाचा प्रखर विचार त्यांनी दिला.
अमरावतीजवळ मोझरी या गावी गुरुकुंज आश्रमाची त्यांनी स्थापना केली. सर्वधर्म समभाव हे त्यांच्या कार्याचे अंतिम ध्येय होते. या आश्रमात सर्वधर्म प्रार्थना मंदिराची उभारणी केली. आश्रमात 1968 मध्ये अखिल भारतीय आयुर्वेद संमेलन भरवून विद्वत्त सभेपुढे समाजातील रोगी, दुःखी, पीडितांच्या व्यथा, वेदना मांडल्या.दीन दुबळयांविषयी त्यांना तळमळ होती. गावोगावी गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. त्यांची सुमारे 40 पुस्तके प्रकाशित आहेत. 'ग्रामग्रंथ' हे त्यांचे प्रसिद्ध काव्य होय. 'आदेशरचना' या ग्रंथात व्यायामाचे महत्त्व त्यांनी सांगितले आहे. एकूणच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून अभूतपूर्व कार्य केले. नवभारतातील नवसमाज निर्माण करणारे ते एक महान शिल्पकार होते. म्हणूनच लोकांनी त्यांना 'राष्ट्रसंत' ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. सदाचारी दृष्टी देणाऱ्या व ग्रामनवनिर्माणची व्यापक कल्पना देणाऱ्या या आधुनिक संताचा11 ऑक्टोबर 1968 रोजी मृत्यू झाला. आजही राष्ट्रसंत तुकडोजी ग्राम अभियानाच्या माध्यमातून ते अजरामर आहेत.
No comments:
Post a Comment