Sunday, 19 July 2020

रम्य ही स्वर्गाहून लंका

श्रीलंका म्हटलं की इथं आपल्याला गर्द झाडी, रम्य वातावरण अनुभवायला मिळतं. इथे रस्त्यावरून प्रवास करताना गर्द हिरव्या राई, दुतर्फा असंख्य नारळी, पोफळी, केळी डुलताना दिसतील. फणस लगडलेले दिसतील. सोनेरी रंगाचे भलेमोठे नारळ त्या हिरव्या पार्श्वभूमीवर नजरेत भरतात. कोलंबो ही श्रीलंकेची राजधानी. इथून पर्यटनाला सुरुवात होते. महाओया नदीच्या काठी पिन्नावेला येथे आपल्याला हत्ती आणि त्यांची पिल्लं मनसोक्त अंघोळ करताना दिसतील. या ठिकाणी हत्तींसाठी खास वसतिस्थान उभारण्यात आलं आहे. कँडी हे डोंगराराजीत वसलेलं हिरवंगार गाव आहे. गर्द हिरव्या झाडीने वेढलेला,लांबलचक पसरलेला कँडी लेक शेवटचा सिंहली राजा श्रीविक्रम राजेसिंघे यांनी 1798 मध्ये बांधला.
यात बोटिंगची सोय आहे. सहा-सात मजली उंचीचे भव्य बुद्ध मंदिर आहे. प्रशस्त लाकडी जिने, सजावटींनी नटलेली भव्य दालने, उंच छत, लाकडी दरवाजांचे कोरीवकाम, फुलांची सजावट पाहायला मिळते. इथे बुद्धांच्या पवित्र दातांचा अवशेष एका सोन्या-चांदीच्या झळझळीत कलशात ठेवला आहे. तिथल्या उंच छतावरची 32 सोनेरी कमळे मंदिराच्या तेजात भर टाकतात.
नुआरा एलिया समुद्र सपाटीपासून सहा हजार फुटांवर असलेले ठिकाण. डोंगरराजीतून कोसळणारे असंख्य लहान-मोठे धबधबे आहेत. एलियाला जाताना आपल्याला चहाचे हिरवे गालिचे व सिंकोना, सिडार, पाईन, निलगिरी आदी वृक्षराजी व त्यातून उडणारे पक्षी पाहायला मिळतात. इथे मोटारींच्या, घोड्यांच्या शर्यतीची मजा लुटता येते. इथून सीतामाईच्या अशोकवनात जाता येते. या परिसरात आपल्याला आव्हाकोडा हे औषधी फळं आणि विलोभनीय असे कार्नेशिअन फुले पाहायला मिळतात. श्रीलंकेतून ही फुले मोठ्या प्रमाणात परदेशात पाठवले जातात. ब्रिटिशकालीन बंगले, इमारती,क्लब्ज, गोल्फ ग्राऊंड, ट्रीनिटी चर्च, व्हिक्टोरिया पार्क, बांगल्यानंसमोर फुललेले गुलाब आणि कुंपणावरील जांभळी कर्णफुले या सगळ्यांमुळे नुआरा एलियाला छोटं इंग्लंडच म्हटलं जातं.
जवळच दिसणारा निळा-हिरवा डोंगर हा हनुमानाने उचलून आणलेल्या द्रोणागिरी पर्वताचा तुकडा आहे, त्यावर संजीवनी वेली आहेत, असे सांगितले जाते. याठिकाणी राम,सीता आणि हनुमान यांचे मंदिर आहे. पुढे हबाराना हे हिरव्यागार गावातून आपल्याला सिगिरीआ फोर्ट पाहायला जाता येतं. चौदाशे वर्षांपूर्वी काश्यप नावाच्या राजाने नितळ, ताशीव दगडांचा हा किल्ला बांधला. पायथ्याशी सुंदर बागा आणि किल्ल्याभोवती पाण्याचा लांब-रुंद खंदक आहे. इथे कुठे कुठे लेण्यांच्या छतावर प्राचीन चित्रकला पाहायला मिळते. धान्य कोठार,सभामंडप,दगडी सिंहासनाचे अवशेष आहेत.
दंबुला येथे बौद्ध लेणी आहेत. तिथे उभारलेला बुद्धांचा सुंदर,सोनेरी, भव्य पुतळा लांबूनही नजरेत भरतो. इथल्या गुहांमध्ये दोन हजार वर्षांपूर्वीची बौद्ध लेणी दिसतात. छतांवर कालौघात टिकून राहिलेली रंगीत चित्रे आहेत. सांस्कृतिक दृष्ट्या आपल्या खूप जवळ असणारा हा छोटासा देश त्याच्या स्वच्छ हवेमुळे, ताज्या हिरव्या रंगांमुळे मनात भरतो. हा छोटासा पण हिरव्या पाचूने नटलेला देश पाहताना गदिमांनी रचलेले आणि बाबूजींनी अमर केलेले 'रम्य ही स्वर्गाहून लंका' हे गीत आठवल्याशिवाय राहणार नाही. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment