निसर्गसौंदर्य, इतिहासाचा अमोघ ठेवा असलेलं शहर. विविधतेने नटलेले इथलं पर्यटन वैभव देशभरातील पर्यटकांना खुणावतं. तसं हे मध्यवर्ती ठिकाण. कर्नाटक आणि कोकणाशी जोडणारं. मराठय़ांची तिसरी राजधानी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरचे हे पर्यटनाचे वैभव अनुभवयाल हवं.
ऐतिहासिक गड-कोटांनी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी सुजलाम झालेल्या कोल्हापूरचे पर्यटन विश्व विलक्षण आहे. दुर्ग, थंड हवेची ठिकाणे, अभयारण्ये, हेरिटेज वास्तू, धरणे, जंगल सफारीची ठिकाणे असे वैविध्य कोल्हापूरच्या दीडशे किलोमीटरच्या परिसरात आहे. वस्तूत: साडेतीन पीठांपैकी एक शक्तिपीठ श्री अंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी, शिलाहार राजांच्या कालखंडातील प्राचीन खिद्रापूर मंदिरासह अन्य पर्यटनस्थळे म्हणजे धार्मिक पर्यटनाचा गोफच.
छत्रपती राजर्षी शाहूंची नगरी, मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर, कुस्तीपंढरी, गुळाची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ, जगप्रसिद्ध कोल्हापूरी चप्पल, रंकाळा तलाव, आणि तांबडा-पांढरा रस्सा चाखायचा असेल तर कोल्हापुरला पर्यटकांनी नक्की भेट द्यायला हवी. श्री अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, पंचगंगा नदीघाट ही नेहमीची ठिकाणे. इथल्या प्रेक्षणीय स्थळांपैकी एक असलेला रंकाळा तलाव. तलावाच्या मध्यभागी रंगभैरवाचे मंदिर. एका बाजूला संध्यामठ. पश्चिमेस असलेली शालिनी पॅलेसची वास्तू म्हणजे शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे.
मग कलासक्त पर्यटकांना खुणावतात काही अनोखी ठिकाणे. राजारामपुरीतील मांडरे चित्रदालन, ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान, दूध कट्टे पहायलाच हवेत. कोल्हापुरातून बाहेर पडलं की जोतिबाचं तीर्थक्षेत्र. डोंगरावर भिरभिरणारा वारा आणि सुखद गारवा देणारा किल्ले पन्हाळा. ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारा कणेरी मठ, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, खिद्रापूरचे पुरातन मंदिर, गगनबावडा येथील रामलिंग हेही पर्यटकांना खुणावतात.
निसर्ग पर्यटनाला बाहेर पडलं तर मग कोल्हापूरपासून जवळचं गव्यांसाठी आरक्षित असलेले दाजीपूर अभयारण्य आणि भारतातील पहिले मातीचे धरण राधानगरीतले. चांदोली, आंबा, देवराई, मानोली, येळवण जुगाई, उदगिरी, दाजीपूर, बोरबेट, वाकीघोल, पेरणोलीचा सडा असं सह्याद्रीच्या कडेकपार्यांत फिरता येतं. पारगड, सामानगड, रांगणा, शिवगड, गगनबावडा, पावनगड, विशाळगड हे किल्ले इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवत स्फुल्लींग चेतवतात.
श्री अंबाबाई मंदिर
पर्यटनाला निघालेला पर्यटक कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढे मार्गस्थ होत नाही. हेमाडपंथी वास्तूरचनेचे काळ्या दगडातील मंदिर आहे. नगारखाना, प्रवेशद्वारे, दरवाजावरील घंटा, दगडी चौथरे आणि त्या वरील कोरीव काम प्रेक्षणीय आहे. किरणोत्सव हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. भवानी मंडप, जुना राजवाडा परिसर हे आकर्षण आहे.
जोतिबा
वाडी र%ागिरी (ता. पन्हाळा) येथे हे हेमाडपंथी मंदिर काळ्या दगडात असून इथे केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंग या तीन मंदिरांचा समूह आहे. जोतिबाला घातले जाणारे खेटे हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. जवळच यमाई मंदिर आहे.
रामलिंग धुळोबा
कोल्हापुरपासून १५ किलोमीटरच्या अंतरावर हातकणंगले जवळ रामलिंग, धुळोबी ही देवस्थाने आहेत. रामलिंग मंदिर ही एक कोरीव गुंफा असून पुरातन देवस्थान आहे. आतील बाजूस शिवलिंग व गणपती मूर्ती आहे. देवालयाच्या बाहेरील बाजूस हेमाडपंथी शिल्प आहे. कन्नड भाषेतील शिलालेख असून थोड्या अंतरावर धुळोबा देवस्थान आहे. याच परिसरात डोंगरमाथ्यावर अल्लमप्रभूचे देवस्थान मध्ययुगीन बांधणीचे आहे.
खिद्रापूरचे कोपेश्वर
शिरोळ तालुक्यात कर्नाटक-महाराष्ट्र सिमेवर कृष्णा नदीच्या काठी खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर आहे. प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे हे मंदिर आहे. कोल्हापूरपासून ७0 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर बारा राशींचे बारा खांब आहेत. अत्यंत कोरीव नक्षीदार खांब, हत्ती, रामायण, महाभारतातील प्रसंग, राशीचिन्हे, प्राणी यांची कलाकुसर मंदिरावर आहे.
विशाळगड, पारगड
कोल्हापुरपासून ९0 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. गडाच्या चोहोबाजूने मोठे खंदक आहेत. गडावर चार दरवाजा, तळे, वृंदावने, टकमक कडा, रामचंद्र निळकंठ यांचा जुना राजवाडा, हजरत रेहान मलिक दर्गाह, पाताळनगरी आदी ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. निसर्गाची उधळण असलेला पारगडा किल्ला चंदगड ते तिलारी मार्गावर आहे.
चिरेबंदी पायर्या, डोंगरदर्या, हिरवीगर्द झाडी, निरव शांतता या परिसराचे वैशिष्ट्य आहे.
किल्ले पन्हाळगड
पन्हाळा किल्ला शिव छत्रपतींच्या आणि संभाजीराजांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. पुसाटी बुरुज, तबक उद्यान, नायकिनीचा सज्जा, तीन दरवाजा, धान्य कोठार, अंबरखाना, धर्मकोठी, हिरकणी बुरूज, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय या ठिकाणी आहे.
No comments:
Post a Comment