१) सांगलीत पुर्वी सहागल्या होत्या म्हणून या गावाचं नाव सहागल्ली वरून सांगली झालं अस म्हणतात. कानडी भाषेत संगळगी असं नाव होतं. त्याचा अपभ्रंश सांगली असा झाला अशीपण थेअरी आहे. पुर्वी मिरज हे पटवर्धनांच संस्थान होतं. त्यांनी सांगलीला आपलं संस्थान केलं. त्यांच्याच बंधूंनी तासगाव आपलं संस्थान केलं. पुर्वीच्या काळी सातारा जिल्हात सांगली यायचं. १ ऑगस्ट १९४९ पासून याची दक्षिण सातारा अशी वेगळी झाली आणि २१ नोव्हेंबर १९६० पासून सांगली जिल्हा उदयास आला.
२) सांगली जिल्ह्याच नाव काढल्यावर पहिल्या प्रथम उल्लेख करावा लागतों तो या जिल्ह्याने लढलेल्या स्वातंत्र संग्रामाचा क्रांन्तिसिंह नाना पाटील, जी.डी बापू लाड़, नागनाथअण्णा नायकवडी, पांडू मास्तर, बर्डे गुरूजी, बाबूराव चरणकर, धोंडीराम माळी, नाथाजी लाड, गौरीहर सिंहासने, बाबूजी पाटणकर, जोशीकाका अशी प्रतिसरकारची मोठ्ठी फौज या जिल्ह्याने बांधली. ज्या क्रांन्तीकारकांनी देशाला क्रांन्तीची भाषा शिकवली ते सांगलीच्या मातीत इंग्रजांविरोधात लढले. अशाच क्रांन्तीकार्यात वसंतदादा पाटलांनी सांगलीचा जेल फोडून पलायन केले. इतिहासाच्या पानांवर प्रतिसरकारचा काळ म्हणजे सांगली जिल्ह्याचा सुवर्णकाळ म्हणता येईल असा होता.
३) एकीकडे रक्तरंजीत लढ़ा तर दूसरीकडे नाट्यपंढरी अशी ओळख सांगलीने निर्माण केली. अर्वाचिन मराठी रंगभूमीवर पहिले नाटक सादर करण्याचा मान सांगलीकडे जातो. सीता स्वयंवर हे पहिले नाटक विष्णुदास भावे यांनी रचलं. सांगलीत ५ नोव्हेंबर १८४३ साली हे नाटक सादर करण्यात आलं. महाराष्ट्रात मराठी रगंभूमी दिन याच दिवशी साजरा केला जातों. अर्वाचिन रंगभूमीवर सुवर्णकाळ निर्माण करणारे नाटककार गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी खाडिलकर हे सांगलीचे. १८८७ साली सांगलीत सदासुख हे नाट्यगृह बांधण्यात आले. इथे बालगंधर्व व दिनानाथ मंगेशकर नाटक सादर करत असत. इतकच काय तर पृथ्वीराज कपूर यानी दीवार, पैसा अंशी हिंदी नाटकंही इथे सादर केली आहेत. दिनानाथ मंगेशकरांनी तर याच्याही पुढे जावून कृष्णार्जून युद्ध चित्रपट सांगलीच्या वास्तव्यात तयार केला पण आर्थिक गणित त्यांना मांडता आले नाही. लता मंगेशकर, आशा, उषा, ह्रदयनाथ यांचे बालपण देखील सांगलीतच गेलं.
४) क्रांन्तीकारकांचा जिल्हा, नाट्यसंस्कृतीचा जिल्हा याच सोबतीने उद्योग व्यवसायाचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख आहे. सहकारासोबत खाजगी उद्योग इथे एकत्र नांदले. चितळे आणि किर्लोस्कर हे त्यापैकी महत्वाची उदाहरणं. किर्लोस्करवाडी हे देशातील पहिले उद्योगिक नगरी म्हणून आकारास आले. १९१० साली कुंडल जवळच्या मोकळ्या जागेवर लक्ष्मणराव किर्लोस्करांनी कारखाना टाकून देशाला पहिला लोखंडी नांगर दिला. इथे स्वदेशी पहिले डिझेल इंजिन तयार करण्यात आलं. चितळेंनी भिलवडी स्टेशन या छोट्याशा गावातून आपला पसारा पुण्यापासून युरोपर्यन्त विस्तारला. त्यांच्यासोबतीनेच PNG गाडगीळ सराफ, अनेक लहानमोठ्या कंपन्या या जिल्ह्यात आकारास आल्या.
) कुस्ती आणि बुद्धीबळ अस एकत्रित मिश्रण असणारं सांगली हे जगातलं एकमेव शहर असावं. कोल्हापूर संस्कृतीप्रमाणेच सांगलीच्या तालीम सुरवातीच्या काळात प्रसिद्ध होत्या. उत्तरोत्तर काळात तालमींना राजकारणाची किड लागली आणि कुस्तीपरंपरा गुंडगिरीकडे झुकत गेली. बुद्धीबळाचा वारसा या शहराला १५० वर्षांपासूनचा आहे. क्रीडामहर्षी भाऊसाहेब पडसलगीकर यांनी ही परंपरा पुढे नेत सांगलीस नावलौकिक मिळवून दिला. उत्तउत्तोम स्पर्धक तर सांगलीत घडलेच पण राष्ट्रीय स्पर्धा भरवण्याचा मान देखील सांगलीस मिळाला.
६) शास्त्रीय संगीत हा देखील सांगलीचा अविभाज्य घटक. एकीकडे पठ्ठेबापूरावांपासून ते काळूबाळूंपर्यन्त लोककला जपण्यात सांगली आघाडीवर राहिली तर दूसरीकडे शास्त्रीय संगीताचे माहेरघर राहिली. किराना घराण्याचे आद्य संस्थापक अब्दुल करीम खॉं यांची मिरज ही कर्मभूमी राहिली आहे. पं. विष्णू दिगंबर पलुसकर, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, विनायकबुवा पटवर्धन, निळकंठबुवा जंगम हे सांगली जिल्ह्यातले. मिरजेच्या उरसात संगीत महोत्सव आयोजित केला जातो. सतार, तंबोरा संवादिनी या तंतूवाद्यासाठी मिरज प्रसिद्ध असून १८५० पासून इथे ही वाद्य तयार केली जातात. मिरजेची सतारमेकर गल्ली यासाठी देशभरात प्रसिद्ध आहे.
७) जिल्ह्याच अजून एक वैशिष्ट म्हणजे मिरजेस हॉस्पीटलची नगरी म्हणून ओळखलं जातं. मिशन हॉस्पीटल सह बरीच मोठ्ठी हॉस्पीटल या शहरात आहेत. उत्तर कर्नाटकापासून ते रत्नागिरी, सिंधदूर्ग, कोल्हापूर, सातारा, सोलापूरपर्यन्तचे रुग्ण इथे येत असतात. याच शहरातील वान्लेस हॉस्पीटलमध्ये देशातील पहिली ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. १८१२ साली अमेरिकन मिशनरीचे डॉ, विल्यम वान्लेस यांनी पाश्चात्य उपचार पद्धतीचा पाया रचला. १८९४ साली मिशन हॉस्पीटलची स्थापना करण्यात आली. डॉ. गोसावी यांच्या प्रयत्नातून कॅन्सरवर उपचार करणारे अद्यावत असे सिद्धीविनायक कॅन्सर हॉस्पीटल सांगली मिरज रोडवर उभा करण्यात आले. मिरजेच्या प्रत्येक गल्लीबोळातून हॉस्पीटलची रांग आहे.
८) या जिल्ह्याचं वेगळेपण म्हणजे पुर्व आणि पश्चिम सांगलीमध्ये जमिनअस्मानाचा फरक पडतो. पश्चिम दिशेने असणाऱ्या शिराळा, वाळवा या तालुक्यांमध्ये मुबळक पाऊस पडतो. कृष्णा वारणेच्या पाण्यामुळे हा भाग समृद्ध आहे मात्र तासगाव कवठेमहांकाळ पासून सुरू होणारा पुर्व भाग जत, आटपाडी, विटा हा कमालीचा दुष्काळी भाग आहे. अस सांगितलं जातं की जो जत जिंकेल तो जग जिंकेल. अशी परिस्थिती पुर्व भागाची आहे. मात्र इथले लोक पुर्वापार उद्योगधंद्यासाठी बाहेर पडले. गलाईकामगार म्हणून देशभर विस्तारले. त्यातून मुबलक अर्थाजन या भागाचे झाल्याचे दिसून येते.
९) सांगली जिल्ह्यात अनेक गोष्टी पहिल्यांदा घडल्या. उद्योग व्यवसाय, नाटक यांचप्रमाणे मुद्रिणसंस्कृतीचा पाया देखील सांगली जिल्ह्याने घातलेला दिसून येतो. १८०५ साली भगवतगिता पहिल्यांदा सांगलीत छापण्यात आली. नागरी भाषेतले मराठीतले पहिले ठसे निर्माण करण्याचा मान सांगलीस जातो.
१०) सर्कशीचे आद्यपुरूष विष्णुपंत छत्रे अंकलखोपचे. त्यांनी या भागात सर्कस चालू करून इथल्या लोकांना एक व्यवसायाचे एक वेगळे छत्र मिळवून दिले. एकट्या तासगाव भागातून त्या काळात सुमारे सत्तरहून अधिक सर्कस निर्माण झाल्या. भारतापासून युरोपपर्यन्त या सर्कसने आपला नावलौकिक केला. म्हैसाळचे देवळ, तासगावचे माळी, सांगलीचे कार्लेकर अशी सर्कस क्षेत्रातील फेमस मात्तबर लोकं.
११) भारतातील मोठ्ठया धरणांपैकी एक मातीच धरण म्हणून चांदोली धरण ओळखलं जातं. शिराळा तालुक्यात हे धरण आहे. शिराळा तालुका भातासाठी आणि नागांसाठी प्रसिद्ध तालुका आहे. इथे नागपंचमीला जिवंत नाग पूजले जात असतं. नागपंचमीच्या काही दिवस अगोदर इथले तरुण नाग शोधण्यासाठी जिल्हाभर भटकंती करत. नाग पकडून त्यांचे पूजन केले जात असे व त्यानंतर त्यांना पुर्वीच्याच ठिकाणी सोडले जात असे.
१२) शिराळ्याच्या शेजारी असणारा वाळवा तालुका फक्त नावापूरता वाळवा आहे. कृष्णा नदीची कृपा या तालुक्यावर राहिल्याने ऊसांचा सलग पट्टा या तालुक्याचं वैशिष्ट मानता येईल. गुंड व मारामारी करणाऱ्यांचा तालुका ही ओळख पुसून स्व. राजारामबापू पाटलांनी इथे शैक्षणिक क्रांन्ती घडवून आणली. याच चालुक्यातील आष्टा या गावातील यात्रा प्रसिद्ध आहे.
१३) पलूस आणि कडेगाव तालुका हे दोन्ही वेगळे तालुके असले तरी मतदारसंघामुळे हे एकत्र बांधल्यासारखेच आहेत. या तालुक्यात सागरेश्वर अभयारण्य आहे. भारतातील हे मानवनिर्मीत असणारे एकमेव अभयारण्य आहे. धों.म. मोहिते यांच्या पुढाकाराने औसाड माळरानावर अभयारण्य निर्माण झाले. त्याच प्रमाणे या तालुक्यात येणारे औदुंबर हे तिर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे.
१४) तासगाव तालुका ओळखला जातो तो द्राक्षांसाठी. इथे पावलोंपावली बेदाण्यासाठी उभारण्यात आलेली कोल्ड स्टोरज पहायला मिळतात. आशिया खंडातील बेदाण्यांसाठी प्रसिद्ध असे इथले मार्केटयार्ड आहे. शेतीतज्ञ प्र.शं.ठाकूर, श्रीपाद दाभोळकर (नरेंद्र दाभोळकरांचे बंधू), वसंतराव आर्वे, आबा म्हेत्रे यांनी या तालुक्याला द्राक्षभूमी म्हणून ओळख निर्माण करून दिली. तास-ए-गणेश ही द्राक्षाची जात इथेच तयार करण्यात आली.
१५) विटा-खानापूर तालुक्याचं वैशिष्ट म्हणजे इथे असणारे गलाई कामगार. सोने गाळण्याच्या व्यवसायात संपुर्ण भारतभर गलाई कामगार विस्तारले. श्रीलंकेपासूने ते श्रीनगरपर्यन्त विटा-खानापूरचा एकतरी माणूस आपणास हमखास भेटतो. त्या त्या भागाशी एकरूप होवून त्यांनी आपल्या परिसराचा विकास केला.
१६) आटपाडी,कवठे-महांकाळ-जत अशा दुष्काळी भागाचं वैशिष्ट म्हणजे इथली माणसं व्यंकटेश माडगुळकरांच्या बनगरवाडी या पुस्तकातील सगळी माणसं याच भागातली. इथे धनगर-लिंगायत व मराठा समाज तुल्यबळ असल्याने जातीचा सत्तासंघर्ष होत राहतो.
१७) भारतातलं पहिलं ग्रामिण साहित्य संमेलन भरवण्याचा मान सांगली जिल्ह्यातल्या औंदुबरला जातो. दरवर्षी मकर संक्रातीच्या दिवशी इथे साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. कवी संधांशू व कथाकार म.बा. भोसले यांनी सुरू केलेली परंपरा आजही अखंड सुरू आहे.
१८) जगातील पहिली कैद्यांची मुक्त वसाहत सांगली जिल्ह्यात आहे. औंधच्या पंतप्रतिनिधींनी या संकल्पनीची सुरवात केली व स्वतंत्र भारतात देखील ही वसाहत चालू राहिली. आटपाडीजवळ स्वतंत्रपूर नावाने ही वसाहत आहे. व्ही.शांताराम यांनी याच विषयावर दो आंखे बारा हाथ नावाचा सिनेमा तयार केला.
१९) जिल्ह्यातले प्रत्येक गाव आपल्या वैशिष्टपूर्ण जत्रा-यात्रांसाठी प्रसिद्ध आहे. मिरज इस्लामपूरचा ऊरूस, शिराळची नागपंचमी, तासगावचा गणपतीचा रथोत्सव, आष्टाची भावईची जत्रा, आरेवाडीची बिरोबाची जत्र, जतची जत्रा, कडेपूरचा ताबूत, विट्याची पालखी अशा अनेक जत्रा फेमस आहेत.
२०) सांगलीच नाव घेतल्यावर आठवण्यासारखी गोष्ट म्हणजे भडंग. सांगली आपल्या खास भडंगसाठी फेमस आहे. गोरे भडंग, भोरे भडंग, कपाळे भडंग, दांडेकर भडंग, गडकरी भडंग असे भडंग इथे फेमस आहेत.
२१) सांगलीच अजून एक वैशिष्ट म्हणजे इथली आमराई. सांगलीचा विकास झाला तो चिंतामणराव पटवर्धनांमुळे. त्यांच्या काळात सांगलीस प्राणीसंग्राहलय, शाळा, कॉलेज, रस्ते, पूल इत्यादी गोष्टी मिळाल्या. त्यांनीच विलिंग्डन कॉलेजच्या स्थापनेत पुढाकार घेतला.
२२) हळद भवनचे पोहे, संबाची भेळ, रामनाथची बासुंदी, रहमैंत्तुलाची बिर्याणी, इस्लामपूरचा मसूर, विहारची पुरीभाजी अशा अनेक गोष्टी सांगलीची शान वाढवतात.
सांगली जन्मभूमी व कर्मभूमी असणारे मान्यवर
नागठाण्याचे नटसम्राट बालगंधर्व, रेठरे हरणाक्षचे पठ्ठे बापूराव, यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव देवराष्ट्रे, अण्णा भाऊ साठे वाटेगावचे, क्रांन्तिसिंह नाना पाटील येडेमच्छिंद्रचे, शंकरराव खरात आटपाडीचे, गीतरामायणकार ग.दि.माडगुळकर व व्यंकटेश माडगुळकर हे माडगुळचे, उमा-बाबू, तात्या सावळजकर सावळजचे, मालेवाडीचे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख, जनकवी पी. सावळाराम येडेनिपाणीचे, नागिण कथा लिहणारे लेखक चारूता सागर मळगावचे, बापू बिरू वाटेगावकर वाळवा बोरगावचे, शिवा-संभा,काळू-बाळू कवलापूरचे, वि.स.खांडेकरांची जन्मभूमी सांगली, आ.ह.साळुंखे खाडेवाडीचे. मारूती माने, क्रिकेटमधले विजय हजारे, बॅटमिंन्टनपट्टू नंदू नाटेकर हे सांगलीचे, क्रिकेटची स्टार स्मृती मंधना, फिल्मस्टार सई ताम्हणकर सांगलीची.
No comments:
Post a Comment