Monday, 6 July 2020

बाजीप्रभू देशपांडे

बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्म इसवी सन १६१५ मध्ये झाला. त्यांची अचूक जन्मतिथी इतिहासाला माहित नाही. त्यांचा जन्म पुण्यातील भोर तालुक्यात झाला. लहानपणापासूनच ते खूप कुशलतेने दांडपट्टा चालवत असत. सुरुवातीच्या काळात बाजीप्रभू देशपांडे जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या चाकरीत होते.
शिवरायांची जावळीला चंद्रराव मोरे यांच्यासोबत झालेल्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे यांनी खूप पराक्रम गाजवला. बाजीप्रभू देशपांडेंचा हा पराक्रम पाहून शिवराय खूप खुश झाले. चंद्ररावाचा पराभव झाल्यानंतर बाजीप्रभू कैद झाले. शिवरायांनी त्यांना मोठय़ा मनाने सोडले आणि स्वराज्याच्या कार्यात येण्याविषयी सांगितले. स्वराज्याचा उद्देश समजल्यानंतर बाजीप्रभूंनाही स्वराज्याची गरज पटली आणि ते स्वराज्याच्या कार्यात आले. शिवरायांनी त्यांना सरदारकी बहाल केली.
आदिलशाह शिवरायांच्या स्वराज्य विस्ताराच्या कार्याने बेजार झाला होता. त्याने स्वराज्याचा बंदोबस्त करण्यासाठी सिद्धी जोहर या चिवट सरदाराला पाठवले. शिवराय पन्हाळगडावर आहेत हे कळल्यावर सिद्धीने पन्हाळगडाला वेढा दिला. त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे सुद्धा शिवरायांबरोबर होते. या वेळी वेढय़ातून सुटण्यासाठी एक युक्ती करण्यात आली. शत्रूला फसवण्यासाठी एक पालखी पन्हाळ्याकडून निघाली जेणे करून शत्रूला वाटेल की यात शिवराय निसटण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर दुसर्‍या बाजूला प्रत्यक्ष शिवराय हे वेढय़ातून निसटणार होते. योजनेनुसार बाजीप्रभू देशपांडे हे शिवरायांबरोबर विशाळगडाकडे जाण्यासाठी निघाले. परंतु वाटेतच सिद्धीच्या सैनिकांनी शिवरायांना गाठले. त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवरायांना पुढे जाण्याविषयी व ही घोडखिंड मी लढवतो असे आवर्जून सांगितले. शिवराय तसे करण्यास तयार नव्हते परंतु बाजींनी त्यांना सांगितले राजे एक बाजी गेला तर दुसरे बाजी येतील पण लाखोंचा पोशिंदा राजा पुन्हा होणे नाही. फक्त विशाळगडावर पोहोचल्यावर तुम्ही तोफांना बत्ती द्या, एवढी विनंती त्यांनी राजांना केली. त्यांची कळकळीची विनंती ऐकून राजे विशाळगडाकडे निघाले.
इकडे सिद्धीचे सैनिक घोडखिंडीजवळ आल्यावर बाजींनी पराक्रमाची शर्थ केली व शत्रूला थोपवून धरले. लढता लढता बाजीप्रभू खाली पडले पण त्यांचे कान मात्र विशाळगडावर वाजणार्‍या तोफेकडे होते. तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला अशी जणू पैजच त्यांनी मृत्यूशी लावली होती. विशाळगडावर राजे पोहोचल्याची तोफ वाजली आणि बाजींनी आपले प्राण सोडले. स्वामीनिष्ठा आणि स्वराज्य कार्याची आस धरून त्यांनी आपले जीवन स्वराज्य कार्यासाठी अर्पित केले होते. धन्य ती स्वामीनिष्ठा. धन्य ते बाजीप्रभू देशपांडे आणि धन्य ते शिवराय ज्यांनी गुलामगिरीत खितपत पडलेल्या लोकांचे उद्बोधन करून असे मावळे घडवले.

No comments:

Post a Comment