मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील नगवा या गावात १९ जुलै १८२७ रोजी एका ब्राम्हण परिवारात झाला. त्यांना लहानपणापासूनच धाडसी कृत्यांची आवड होती. नेमबाजी, तलवारयुध्द इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते. मंगल पांडे त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्माबद्दल अत्यंत संवेदनशील आणि अभिमानी होते. ज्या वेळी १८४९ साली, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरीस सुरुवात केली, त्यावेळी ते २२ वर्षाचे होते. पांडे हे बराकपूर सैन्यदलामधील बंगालच्या ३४ व्या बी. एन. आय तुकडीच्या ५ व्या कंपनीत काम करत होते. कोलकात्याजवळील बराकपूर येथील १९ व्या पलटणीला दिलेली काडतुसे गाय वा डुक्कर यांची चरबी लावलेली आहेत असा समज सैन्यात पसरला होता. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण दातांनी तोडावे लागे. अशा वेळी या आवरणाला लावलेली गाईची वा डुकराची चरबी तोंडात जाऊ शकेल या भीतीने या पलटणीतील शिपायांनी ती काडतुसे स्वीकारण्याचे नाकारले.
इतकेच नव्हे, तर प्रतिकारार्थ त्यांनी शस्त्र उपसले. त्या दिवशी ब्रिटिश अधिकार्यांची संख्या कमी असल्याने ब्रिटिशांनी तो अपमान मुकाट्याने गिळला. त्यांनी ब्रह्मदेश (म्यानमार)हून गोर्या सैनिकांची कुमक मागवून या पलटणीला नि:शस्त्र करून अपमानित अवस्थेत हाकलून द्यायचे ठरवले. याची अंमलबजावणी बराकपूरला करण्याचे ठरले. या अपमानास्पद कारवाईमुळे मंगल पांडेने आपल्या सहकार्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले. ३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती. मात्र १९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. मार्च २९, १८५७ रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. र्मदहो, उठा ! अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा ! तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे !! चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा नि:पात करा!!! हे पहाताच सार्जंट मेजर ह्यूसन याने त्यांना पकडण्याची आज्ञा केली; पण एकही सैनिक जागचा हालला नाही.
No comments:
Post a Comment