३२ शिराळा हे सांगली जिल्ह्यातील पश्चिमेकडील एक तालुक्याचे ठिकाण आहे. नागपंचमी याठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, मात्र आता न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमी उत्सव निसर्गप्रेमी व पर्यावरणवादी यामुळे बंधनात अडकला आहे. नागपंचमीवर न्यायालयाने बंधने आणली आहेत. जिवंत नाग पूजा, नागस्पर्धा, जीवंत नागाची मिरवणूक यावर बंधने आली आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार शिराळाकर बंधू नागपंचमी साजरी करत आहेत. जरवर्षी प्रतिकात्मक नागाची पूजा करून प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते.
नागावर जीवापाड प्रेम करणारी माणसं शिराळ्यात आहेत. शिराळा येथे नागपंचमी उत्सव हा धार्मिकता जोपासून विज्ञान निष्ठ पद्धतीने साजरा केला जातो. कोणतीही अंधश्रद्धा नाही. शिराळयात कधीही नाग सापडला तर त्याला मारत नाहीत. वन विभागाच्या देखरेखीखाली त्यास सोडून दिले जाते. नागावर जीवापाड प्रेम करणारी माणसं शिराळ्यात आहेत. आणि आज जगात शिराळ्याची ओळख जिवंत नागाची पूजा करतात यासाठीच आहे.
पूर्वी हा उत्सव शिराळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा तेव्हा नागपंचमीच्या एक महिना अगोदर म्हणजे बेंदूर सणाच्या दिवसांपासून येथील नाग मंडळे नाग पकडायच्या मोहिमेला निघत असत. हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेउन ५-६ तरुणांचा ग्रुप मोहिम फत्ते करत असत. पकडलेल्या नाग, साप यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जाई. आता न्यायालयाच्या आदेशानुसार शिराळाकर बंधू नागपंचमी साजरी करताना दिसतात.
शिराळ्यातील नागपंचमीचा इतिहास प्राचीन आहे. श्री गोरक्षनाथ महाराज यांनी जीवंत नाग पूजेची प्रथा शिराळ्यात सुरू केली. गोरक्षनाथ हे फिरत शिराळा येथे आले होते. भिक्षा मागत फिरत असताना महाजन यांच्या घरी आले. त्यावेळी महाजन यांच्या घरातील भगिनी मातीच्या नागाची पूजा करत होती. त्यामुळे भिक्षा वाढण्यास वेळ झाला. त्यावेळी श्री गोरक्षनाथ यांनी सांगितले, जीवंत नागाची पूजा करा. तेव्हापासून जीवंत नागाची पूजेची परंपरा सुरू होती. मात्र आता ही परंपरा न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बंद झाली आहे. मात्र आजही नागपंचमीच्या दिवशी महाजनांच्या वाड्यातून मानची पालखी निघते.
मिरज इतिहास संशोधन मंडळात १८६९ सालची शिराळा नागपंचमी विषयी पुराव्याची कागदपत्रे सापडली आहेत.१८४८ मध्ये शिराळा येथे नाग आणल्याचा पुरावा सापडला आहे. तसेच शिराळ्याच्या नागपंचमीची साक्ष समर्थ रामदासांनी आपल्या काव्य पंक्तीतून दिली आहे. कृष्णातीरी रामदास आल्यानंतर (शके १५६७-६८, ई.स. १६४५-४६ ) आसपासच्या प्रदेशात भ्रमण केले. कोल्हापूर पासून शहापूर पर्यंतच्या तीर्थक्षेत्रांचे वर्णन करताना ते म्हणतात....
'जागा लक्ष्मीचे सिराळे
तेथे निघते नागकुळे
श्रावण मांसी मुले बाळे खेळविती'
नागपंचमी यात्रा एक दिवस भरत असून राज्यातील भाविकांची मोठी गर्दी आंबामातेच्या दर्शनासाठी पहाटेपासून सुरू असते. नागपंचमी उत्सव गत वैभव मिळावे, जिवंत नागाची पूजेची परंपरा सुरू रहावी यासाठी शिराळकरांचा न्यायालयायीन लढा आजपर्यंत सुरू आहे. न्यायालयीन लढयासाठी सर्व नागराज मंडळे व सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. न्यायालयीन लढा सुरू आहे. शिराळकर बंधूचे नागप्रेम आजही कायम आहे.
No comments:
Post a Comment