Thursday, 16 July 2020

जुळे नारळ: कोको द मेर

मॉरिशस बेटाच्या उत्तरेस व मादागास्कर या आफ्रिकन बेटांजवळ हिंदी महासागरात सेशेल्स नावाचा एक छोटा देश आहे. या द्वीपसमूहात माहे हे बेट सगळ्यात मोठे आहे. अप्रदूषित समुद्र, सर्वत्र हिरवीगार जंगले, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा देश पर्यटकांना आकर्षित करतो. परंतु येथे महत्त्वाचं  म्हणजे 'कोको द मेर' नावाचे जुळे नारळ मिळतात.  बाहेरील कवच एक, मात्र आत दोन वेगवेगळे नारळ असलेले हे जुळे नारळ. विशेष म्हणजे कोको द मेर (coco de mer) हे झाड संपूर्ण जगात फक्त सेशेल्स या बेटावरच मिळते. इतरत्र उपलब्ध नाही. या नारळांचा औषधी म्हणून उपयोग केला जातो. या झाडाची पूर्ण वाढ व्हायला 30 ते 40 वर्षे लागतात.

या झाडाला जुळे नारळ लागतात. या एका जुळ्या नारळाचे वजन 18 ते 20 किलोग्रॅम असते. नारळाची पूर्ण वाढ व्हायला 6 ते 7 वर्षे लागतात. नारळाची उंची 30 ते 50 सेंटीमीटर एवढी असते. याच्या खोबऱ्याच्या वाटीची जाडी 10 सेंटीमीटर एवढी असते. साध्या नेहमीच्या खोबऱ्याची जाडी अंदाजे 1 सेंटीमीटर असते. इथल्या प्राले या बेटावर नारळाची सात हजार झाडे आहेत. हा बगीचा संयुक्त राष्ट्रच्यावतीने 'वर्ल्ड हेरीटेज' म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या झाडाचे वय अंदाजे अडीचशे वर्षांचे असते. याच्या झावळ्याही वेगळ्या प्रकारच्या असतात. झाडाची उंची 25 ते 30 मीटर असते.
या नारळाचे औषधी आणि सुगंधी गुणधर्म आहेत. गुडघेदुखी, सांधेदुखी यावर याचा उपयोग होतो. या झाडाची माहिती हिंदुस्थानी, चिनी, जपानी, पोर्तुगीज आणि अरब देशांतील लोकांना होती. उतार वयात शिवाजी महाराजांना गुडघी रोगाचा त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांनी त्यांच्या नौदलाच्या सारंगास आफ्रिकेतून जुळे नारळ आणायला सांगितल्याचे संदर्भ  उपलब्ध आहेत. नारळाच्या आकारानुसार एका नारळाची किंमत भारतीय चलनात पंधरा ते पंचवीस हजार एवढी आहे.
पूर्वी हिंदुस्थान आणि चीनमध्ये याचा औषधी म्हणून उपयोग केला जात असे तर इजिप्त आणि जपानमध्ये सुगंधी अत्तर तयार केले जात असे. या नारळाची माहिती  मालदीव बेट, गुजरात, कोकण किनाऱ्यावरील लोकांना आठव्या व नवव्या शतकात होती, असे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत (सांगली)

No comments:

Post a Comment