Sunday, 12 July 2020

शंकरराव चव्हाण : महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक!

दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा 14 जुलै हा जन्मदिवस. आज बरोबर 100 वर्षे झाली. त्यामुळे त्यांचा हा 100 वा जन्मदिवस सर्वत्र थाटामाटात साजरा होत आहे. आपल्या ५० वर्षांच्या सक्रीय राजकारणात त्यांनी स्वच्छ आणि शुद्ध चारित्र्याला आपार महत्त्व दिले. त्यामुळेच गंमतीने 'हेडमास्तर' असेही त्यांना संबोधले गेले.

कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नसताना शंकररावजींनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांच्या राजकीय कार्यकर्तृत्वाची कमान सदैव चढती- वाढती राहिली. लक्ष्मीबाई-भाऊराव हे माता-पिता, ज्येष्ठ बंधू नारायणराव आणि मार्गदर्शक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या शाश्वत संस्कारांच्या मुशीतून शंकररावजींचे व्यक्तिमत्त्व घडले होते. महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जो ठसा महाराष्ट्राच्या पाटबंधारे क्षेत्रावर उमटविला, तो काळालाही मिटविता येण्यासारखा नाही. शंकररावजींनी विविध लघु, मध्यम व मोठे पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करून कोरडवाहू शेतीत रात्रंदिवस राबराब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविली. विष्णुपुरी प्रकल्प योजना आणि जायकवाडी प्रकल्प योजना ह्या तर जणू शंकररावांच्या मानसकन्याच आहेत. अनेक अडचणींवर मात करून शंकररावांनी हे पाटबंधारे प्रकल्प पूर्णत्वास नेले. या प्रकल्पांबरोबरच कोयना, वारणा, कन्हेर, दूधगंगा, तितरी, सूर्या, अप्पर वर्धा, पेंच, मनार, सिद्धेश्वर, येलदरी, निम्न तेरणा, दुधना, अप्पर पैनगंगा, मांजरा, नांदूर मधमेश्वर, लेंडी, खडकवासला, इटियाडोह, पूर्णा, मुळा, काळमावाडी, गिरणा, घोड, सुखी इ. पाटबंधारे प्रकल्पांच्या कालव्यांतून वाहणारे पाणी शंकररावांच्या कर्तृत्वाची गाणी गात आहे. या क्षेत्रात त्यांनी जो अमीट ठसा उमटविला, हे प्रकल्प सिद्धीस नेण्यासाठी शंकररावजींनी जे भगीरथ प्रयत्न केले, त्यामुळे शंकररावजी 'आधुनिक भगीरथ' म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्राच्या 'जलसंस्कृतीचे जनक' असाही शंकररावजींचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येतो, तो अगदी यथार्थ आहे.जायकवाडी आणि विष्णुपुरी प्रकल्प म्हणजे शंकररावांनी मराठवाड्याच्या तृषार्त मातीला बहाल केलेले दोन अमृतकुंभ आहेत, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. 'रान पेटविणे' ही जशी क्रांती आहे, तशीच 'रान भिजविणे' हीसुद्धा एकप्रकारे क्रांतीच आहे. या अर्थाने शंकररावजींचे जलसिंचनाच्या क्षेत्रातील कार्य क्रांतिकारी ठरते.
शंकररावजी ५० वर्षे सत्तेत होते. कुणालाही हेवा वाटावा, अशीच त्यांची राजकीय कारकीर्द होती. इतका दीर्घकाळ सत्तेत राहूनही शंकररावजींनी कधी सत्ता आपल्या डोक्यात चढू दिली नाही. सत्ता हे जनसेवेचे साधन आहे, तो शोभेचा अलंकार नाही, ही जाणीव त्यांनी आजन्म मनीमानसी बाळगली. 'सत्ता ही बहुजनहितार्थ राबवावी,' हा स्वामी रामानंद तीर्थांनी दिलेला कानमंत्र शंकररावजींनी आयुष्याच्या अंतापर्यंत सांभाळला. शंकरराव चव्हाण केंद्रीय मंत्री असताना भाजपाचे नेते सिकंदर बख्त राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. कविवृत्तीच्या सिकंदर बख्त यांनी एकदा म्हटले, ''सरत चाललेल्या पिढीतील शंकरराव चव्हाण हा आशेचा किरण आहे. राज्यसभेत आमची नजरभेट होत नाही, तर आमची हृदयं एकमेकांना भेटतात.'' असा लोहपुरुष होणे नाही!

No comments:

Post a Comment