Thursday, 9 July 2020

बा.भ.बोरकर

झिणिझिणि वाजे बीन----सख्या रे, अनुदिन चीज नवीन!!अशी सुंदर रचना करणारे ""गोमंतक पुत्र सर्व महाराष्ट्र ज्यांना ‘आनंदयात्री कवी’ म्हणून ओळखतो असे कादंबरीकार, ललित लेखक, कथाकार. बा. भ. बोरकर यांचे आज पुण्यस्मरण( ८ जुलै इ.स. १९८४)बोरकरांचा जन्म गोव्यातल्या कुडचडे या गावी ३० नोव्हेंबर इ.स. १९१० या दिवशी झाला. प्रापंचिक अडचणींमुळे त्यांना मॅट्रिकच्या पुढे शिकता आले नाही. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकी पेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली.

इ.स. १९३३ साली मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात 'प्रतिभा' या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. इ.स. १९३४ साली त्यांना बडोद्यातील वाङ्‌मय परिषदेच्या अधिवेशनात उत्कृष्ट कवितालेखन व काव्यगायन ('तेथे कर माझे जुळती')यांबद्दल सुवर्णपदक मिळाले. इ.स. १९४६ साली त्यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामात उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. इ.स. १९५५ ते इ.स. १९७० या काळात त्यांनी पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रांवर वाङ्‌मयविभागाचे संचालक म्हणून काम केले आणि तेथूनच वयाच्या साठाव्या वर्षी ते निवृत्त झाले.
त्यांचे एकाहून एक सरस असे एकूण चौदा कवितासंग्रह प्रकाशित झाले. त्यापैकी “जीवनसंगीत”, “आनंदभैरवी”, “चित्रवीणा”, “गितार”, “चैत्रपुनव”, “कांचनसंध्या”, “अनुरागिणी”, “चिन्मयी” हे होत. काव्यरचनेबरोबर त्यांनी ललितलेख, कादंबरी, कथा, चरित्रात्मक प्रबंध असे इतर लेखन केले आहे. रवींद्रनाथांवर त्यांनी १९६४ व १९७४ मध्ये पुस्तके लिहिली. तसेच स्टीफन झ्वाइगच्या कादंब-यांचे तसेच महात्मा गांधींसंबंधीच्या काही पुस्तकांचे अनुवाद केले. त्यांनी कोकणीतही लेखन केले आहे. त्यांच्या “सासाय” (१९८०) या संग्रहाला साहित्य अकादमी पारितोषिक लाभले.

No comments:

Post a Comment